.post img {

Automatic Size

Showing posts with label Book Review. Show all posts
Showing posts with label Book Review. Show all posts

Wednesday, 16 August 2023

दिवार में एक खिडकी रहती थी (पुस्तक रसग्रहण)

#विशालाक्षर
#पुस्तक_रसग्रहण
#दिवार_में_एक_खिडकी_रहती_थी

मी वाचलेली पहिलीच हिंदी कादंबरी.. तीही विनोदकुमार शुक्ल यांचीच मिळावी हे भाग्य. मला नेहमी असंच वाटतं की पुस्तकं आपल्याला नशिबाने लाभतात. जी पुस्तके मिळत जातात त्यावरून आपलं आयुष्य कुठल्या पायवाटेवरून चालले आहे याची खात्री होते.. 

"दिवार में एक खिडकी रहती थी" हे विलक्षण शीर्षक, पुस्तक हातात घ्यायला भाग पाडतं. स्वप्नांच्या जगातली खिडकी रघुवर प्रसाद आणि सोनसी या नवदाम्पत्याच्या आयुष्यातला एक साधासा प्रवास, विलक्षण बनवते. परंतू लेखक येथे स्वप्न आणि वास्तव जगत यातली रेषा इतकी पुसट ठेवतात की आपण ते वर्गीकरणच करू शकत नाही. लेखक पहिल्या पानावरच एक कविता लिहितात.." उपन्यास में एक कविता रहती थी..." खरंच या कादंबरीत कविता लपलेली आहे. ती कविता म्हणजे आपल्या नेहमीच्या वाचक डोळ्यांना एक वास्तव आणि स्वप्नाच्या काठावर नेऊ शकणारी खिडकी आहे. 

यात नात्यांमधे एक ओलावा आहे. मुळं जोडली गेलेली असली की आपल्या माणसाचा त्रास वाटत नाही. म्हणूनच कदाचित सोनसीची सासू चार दिवस राहून परतू लागते तेव्हा दोघींच्या डोळ्यात आसवं जमा होतात. त्यांची रिक्षा दिसेनाशी होईपर्यंत सोनसी दारातच थांबते.  ही अशी आयुष्ये इव्हेंटफूल नसली तरी समाधानी असतात. कुठलेही तरंग नसलेल्या शांत तळ्यासारखं.

रघुवर प्रसाद एक शिक्षक आहे. तो दोन्ही हातांनी एकाच वेळी लिहू शकतो. घरून विद्यालयात जाण्याकरीता ते टेम्पोने जातात. त्या टेम्पो प्रवासाचा एक सुंदर पॅराग्राफ...

“टैम्पो में हमेशा की तरह गाँव की औरतों और बूढ़ों की भीड़ थी। एक बूढ़ा डंडा लिये हुए बैठा था। विद्यार्थी नहीं थे इसलिये रघुवर प्रसाद ने अंदर घुसने की कोशिश की। टैम्पो वाले ने जगह बनाने के लिये कहा। टेम्पो में जगह होती तो मिलती। ऐसा नहीं था कि बाहर मैदान से थोड़ी जगह ले लेते और टैम्पो में रख देते तो जगह बन जाती। बिना जगह के वे टैम्पो में घुस गये। जब टैम्पो चली तब उनको लगा कि दम नहीं घुटेगा। लड़्कियों-औरतों के बीच बैठे हुए आगे जब उनको कोई विद्यार्थी देखेगा तो अटपटा नहीं लगेगा, क्योंकि विद्यार्थी सोचेगा कि रघुवर प्रसाद के बैठने के बाद औरतें बैठी होंगी। औरतों के बाद रघुवर प्रसाद बैठे होंगे ऐसा विद्यार्थी क्यों सोचेगा।…"

काही दिवसांनी त्याच मार्गावर रघुवर प्रसादला हत्ती वरून जाणारा साधू दिसतो आणि त्याला तो साधू रघुवरला विद्यालयात ने-आण करण्यासाठी स्वतः गळ घालतो. हत्तीच्या माध्यमातून लेखक, आयुष्यात येणाऱ्या भव्यदिव्य आणि औत्सुक्यपूर्ण गोष्टींची जाणीव करून देतात.. त्याबाबत काही सुंदर ओळी....

“हाथी के जाने से एक बड़ी जगह निकल आयी थी। यह तो था कि हाथी आगे-आगे निकलता जाता था और पीछे हाथी की खाली जगह छूटती जाती थी।”

शुक्ल जी भाषा मांडतात, ती जाणिवेच्या एका वेगळ्याच प्रतलाला स्पर्श करणारी आहे. रोजच्याच obious म्हणून सोडल्या जाणाऱ्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकल्यावर खूपच आतल्या झोनमध्ये नेऊन ठेवतात.

“रघुवर प्रसाद कल की तैयारी में किताब खोलकर बैठ गये। पत्नी खाना बनाते-बनाते पति को देख लेती थी। हर बार देखने में उसे छूटा हुआ नया दिखता था। क्या देख लिया है यह पता नहीं चलता था। क्या देखना है यह भी नहीं मालूम था। देखने में इतना ही मालूम था कि इतना ही देखा था।”

रघुवर आणि सोनसीमधलं प्रेम निरांजनाइतकं प्रशांत आहे. त्यातली गोडी खूप भावते. त्यांच्या अवतीभोवती मन रेंगाळत राहतं. सोनसी जेव्हा काही दिवसांकरीता माहेरी जाते तेव्हा चिठ्ठी लिहिण्याबाबतचे  संवाद आकाशातल्या चांदण्यांशी गप्पा मारणारे असतात. त्याची चिठ्ठी वाचताना सोनसीला वाटते की रघूवरने दोन्ही हातांनी चिठ्ठी लिहिली असल्यामुळे त्याच्या आलिंगनात बसूनच आपण चिठ्ठी वाचतोय. कमाल आहे हे सगळं..!!

इतकं सांगितल्यावर देखील असं वाटतंय की पुस्तकाबाबतचा नक्की फील मी ऍक्युरेट सांगूच शकलेलो नाही.....  

फक्त सूर्यास्त झाल्यानंतरचा काळोख किती गडद होता हे सांगण्यासाठी लेखकाच्या ओळी देतो...

"अंधेरा घना था. एक सूर्यके डूबनेसे इतना अंधेरा नही होगा. कमसे कमी दो सूर्य डुबे होंगे.."

या ओळी सूचणं म्हणजे कहरच..!!


©विशाल पोतदार

#विनोदकुमार_शुक्ल

Monday, 2 October 2017

आपण सारे अर्जुन... संभ्रम ते पूर्णत्व... व्.पु.काळे

व.पु. काळे यांचं लेखन सहजसोपं असलं तरी मनात खोलवर रुजतं. कधी ते विचार कथारूपात येतात तर कधी स्वैर व स्वच्छंद चिंतनरुपात. अशाच विचारांची पुरचुंडी असणारं पुस्तक 'आपण सारे अर्जुन' माझ्या मनाच्या नेहमीच जवळ राहील.

नियतीनं ब्रेन ट्युमर सारख्या दुर्धर आजाराने आपल्या पत्नीला ग्रासलावर, वपुंसारखा कणखर लेखकही काहीकाळ उन्मळून पडला. त्या विषण्य अवस्था असणाऱ्या काळात, ओशोंची गीतेची प्रवचणं त्यांच्या ऐकण्यात आली. आपण स्वत:च अर्जुन आहोत, नव्हे तर प्रत्येक माणूस हा अर्जुन आहे. त्याला अर्जुनाप्रमाणेच आपण पदोपदी कोंडीत सापडल्याची, गोंधळल्याची, संभ्रमाची जाणीव होते, असेही त्यांना कळून चुकले. संभ्रमावस्थेचा वेध घेणाऱ्या लेखमालेचं बीज मनात ओलावा धरू लागलं. त्यातूनच 'आपण सारे अर्जुन’ हे ३० वैचारिक लेख असणारं पुस्तक आपल्या भेटीस आलं.

भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नसून तो मानसशास्त्रावरचा एक उत्तम ग्रंथ आहे हे त्यांना उमगले. तेव्हा त्यांच्या मनात महाभारताने महाभारताला शेवट नाही, फक्त सुरुवात आहे अशीही एक कल्पना वपु भारावून मांडतात. पण एक महत्वाची खंत व्यक्त करतात. भगवद्गीते सारखा महत्वाचा मार्गदर्शक ग्रंथ युवकांपर्यंत पोहोचला नाही. भारतातील ९९ टक्के लोकांनी, भगवद्गीता जाणून घ्यायची सोडा, उघडूनपण पाहिली नसेल. भारतात, अध्यात्म हे म्हातारे झाल्यावर जेव्हा करायला काहीही नसते त्यावेळी अभ्यासण्याची गोष्ट आहे. म्हणजे, आदर्श आणि सुखी जीवन जगावे कसे, याचे मार्गदर्शन आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजताना आणि ज्या वयात, आपण सकाळी काय नाश्ता केला हे दुपारी लक्षात राहत नाही, अशा वयात घ्यावे.
हास्यास्पद..!!

धनुर्धारी अर्जुन. शाळेतल्या 'छान छान गोष्टी' पासून ते आजीच्या कथेमध्ये तो असायचा. प्रवचनापासून ते टी. व्ही. तल्या महाभारतामधे आपण तो पाहिलाय. तो विरोत्तम होता. एक महान धनुर्धारी होता. सुशिल, नम्र, आदर्श असा मुलगा..शिष्य.. भाऊ.. नवरा आणि महत्वाचे म्हणजे कृष्ण त्याचा सखा होता..

हे सगळं आपल्याला मुखोद्गत आहे असे म्हणायला हरकत नाही. मग वपुनी असे काय वेगळे सांगितलेय..? आपण सारे अर्जुन?  म्हणजे? हे सगळे गुण आपल्यात  आहेत? नाही..!!  हे सगळेच्या सगळे गुण क्वचितच एखाद्या महापुरुषात असतील. पण "आपण सर्व" आणि "अर्जुन" यामधे एक साधर्म्य आहे.

संभ्रम.. गोंधळ..!

कृष्णाने गीता कोणत्या क्षणी सांगितली? इतकं भयानक युद्ध समोर ठाकले होते. लाखो योध्ये एकमेकांचा जीव घेण्यास आसुसले होते. आणि अशा नाजूक  क्षणी पांडवसेनेतील अर्जुनासारखा अतिशय महत्वाचा योद्धा एका दुःखाने ग्रासला जातो. कुठल्याही युद्धामध्ये तर समोर शत्रु असतात, अगदीच शत्रु नसले तरी शत्रुचे मित्रपक्ष असतात. पण इथे तर त्याच्या विरोधात, सर्व त्याचे "स्वकिय" होते. गुरु द्रोणाचार्य, पितामह भीष्म हे तर त्याचे वंदनीय आदरस्थान होते. अर्जुन घोर संभ्रमावस्थेने ग्रासला गेला. त्याने कृष्णाला प्रतिप्रश्न केला, "कृष्णा... माझ्या माणसांना मारून मला "राज्य" मिळवायची खरच गरज आहे का? जरी युद्ध जिंकून मिळवले हे राज्य. तर त्या राज्यात प्रवेश करण्यासाठी मला माझ्या वंदनीय गुरूंच्या प्रेतावरून जावं लागेल. नको मला हे युद्ध.. नको हा रक्तरंजित विजय."

आणि आपली ही अर्जुनावस्था क्षणाक्षणाला होत असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरू होऊन जगातल्या आपल्या अस्तित्वावर येऊन ठेपते.

- आज ही भाजी करू की ती करू?
- 'बॉस खूपच त्रास देतोय, दुसऱ्या कंपनीत जाऊ की नको?'
- रविवारी ट्रिप ला जाऊ की आराम करू?
- तो किंवा ती माझी काळजी करत नाही मग मी पण तसेच करू?
- मुलांसाठी संभ्रम असतो, आईची बाजू घेऊ की बायकोची? तर आईसाठी असते, नवऱ्याची ची बाजू घेऊ की मुलांची?
- श्रीमंताचा संभ्रम.. 'एखादा भिक मागतोय, देऊ की नको?' गरीबाचा संभ्रम.. 'हाताला काही काम नाही, भीक मागायची वेळ तर नाही येणार?'
- स्वताच्या मुलाने चोरी केली, 'त्याला शब्दाने समजावू की माराने?' 
- तो मला लाच मागतोय, 'देऊ की विरोध करू?' किंवा 'तो मला लांच देऊ करतोय, फुकटचा पैसा आहे, घेऊ की तत्वानिष्ठ राहु?'

अशा अनेक असंख्य संभ्रमावस्था मांडता येतील. इतकी मोठी लिस्ट सेव्ह करायला इंटरनेटच्या सर्वरची पण अर्जुनावस्था होईल. 

अर्जुन संभ्रमात पड़ला कारण त्याने "विचार" केला. तो विचारोत्तम होता. आपण बऱ्याच वेळा विचार करतो, ती फ़क्त चिंतेच्या रूपाने. पुस्तकाच्या सुरुवातीलाच वपु जाहीर करतात की ही कादंबरी नव्हेच कारण लेखक म्हणून ह्या विचारांना त्यांनी कुठल्या विशिष्ट चौकटीत बसवलंच नाही. या पुस्तकामधे जीवनतल्या विविध छटांचा विचार योग्य दृष्टीने करुन, जीवन मोठे कसे करावे याचा विलक्षण आढावा घेतला आहे.

राजकारणातल्या अराजकतेवर बोट ठेवतानाच, दुसरीकडे त्यात डोळसपणे भाग न घेता नुसत्या टीका करणाऱ्या मतदारांना ते धृतराष्ट्राची उपमा देतात. तसेच महाभारतात किंवा आजच्या जगाची विभागणी विचारी, विचारहीन आणि निर्विचारी या भागात करता येते. अर्जुन विचारी होता म्हणून संभ्रमात पडला. दुर्योधन, भीम विचारहीन होते म्हणून युद्ध करायला लगेच तयार झाले. कृष्ण निर्विचारी होऊन परिस्थितीकडे पाहण्याची क्षमता होती म्हणून तो या सर्व जगाचा अर्थ लावू शकला. सैनिकांना विचारहीन बनवलं जातं तेव्हाच ते शत्रूपक्षातील आपल्याला तसूभरही ओळख नसलेल्या अनोळखी सैनिकांचा जीव घेऊ शकतात. 'मी जर त्याचा जीव नाही घेतला तर तो माझा घेईल' एवढा एकच विचार युद्धात असतो. तोच प्रसंग उद्योगधंद्यात गुलामाप्रमाणे वागवल्या जाणाऱ्या कामगारांच्या बाबत. अर्जुन संभ्रमात पडला कारण त्याने तो रक्तपात घडण्याआधी पुनर्विचार करायचे ठरवले म्हणून तो दुर्योधनापेक्षा श्रेष्ठ ठरतो. पण त्याचबरोबर युद्धात आपले स्वकीयच मारले जात आहेत तेव्हा हे राज्य मिळवून दाखवायचे कुणाला हा प्रश्न पडल्यामुळे तो श्रीकृष्णाच्या निर्भेळ दृष्टिपर्यंत तो पोहचू शकत नाही. अर्जुन(मनुष्य) हा दुर्योधन (पशु) आणि कृष्णप्रवृत्ती (परमेश्वर) मधील दुवा आहे.

कुटुंबातील मतभेदावर भाष्य करताना वपु विवाहसंस्थेलं अपेक्षांचं अचूक वर्म दाखवतात. विवाह होण्यापूर्वी ठेवलेल्या अपेक्षा 'शुभविवाह' होइपर्यंत पुरतात. पुढे 'शुभसंसार' या स्थितीपर्यंत पोहचविण्याची ईच्छा असली तरी जबाबदारी कुणी घेत नाही. तसेच मानवी गुण आणि अवगुण हे एकमेकांच्या अपेक्षांच्या चष्म्याने पाहून ठरवले जातात.

या पुस्तकातील माझ्या आवडत्या काही ओळी..

"अंधारात वीज चमकली की वाट उजळून निघते; पण नंतरचा अंधार जास्त गडद होतो. नजर तोपर्यंत अंधाराला सरावलेली असते. प्रकाशाचा क्षण अपरिचित असतो. मनाची पूर्वतयारी नसताना विजेचा लोळ येतो आणि जातो."

"क्षणाला क्षण घट्ट चिकटून असतानाही पुढच्या क्षणी काय घडणार आहे, हे आपल्याला माहीत नसणं म्हणजे अंधारच नव्हे काय?"

हे पुस्तक वाचून तरी एकदा आपल्या देशातील काही युवक तरी भगवद्गीता जाणून घ्यायला तयार होवोत ही प्रार्थना..

अर्जुनाला त्याचा संभ्रम दूर करायला सखा "कृष्ण" भेटला. आपल्याला ही भेटु शकतो. चांगल्या मनाने जग पहां. जरूर मिळेल. मला "पुस्तक" हां "कृष्ण" मिळाला. आयुष्याचा सारथी.

In case of copyright violation of this picture, please contact the blogger.
हां लेख वाचल्याबद्दल धन्यवाद..!!

आपल्याला आवडल्यास जरूर कळवा आणि शेअर करा.

तेथे गरुड उतरला (The Eagle has landed).. Book on Attempt of Churchill Assassination

ग्रंथालयातील पुस्तके चाळत असतानाजुनाट कव्हर चे एक पुस्तक दिसलेजे एका इंग्लिश कादंबरी "The Eagle Has Landed" चा अनुवाद आहे. लेखिका "मोहनतारा पाटील" यांचे मी याआधी कधीच नाव ऐकले नव्हते. थोडेसे उघडून पाहिले तर नाझी जर्मनीतल्या कुण्या अधिकारयाच्या शौर्याची कहाणी असल्याचे समजले. Obviously, एक भावना सांगत होती की हिटलर च्या एखाद्या कुर्माची साक्ष असावी. तरी पण आपले मन जे नको वाटते तेच घेते ना. घेतले मी ते पुस्तक. जसे जसे मी वाचायला लागलोते अधिकच मनाचा वेध घ्यायला लागलेआणि नकळत ते पूर्ण कधी झाले हे सुद्धा कळाले नाही. म्हणतात ना "शौर्य" हे "शौर्य" च असते. मग त्यापुढे शत्रू सुद्धा आदराने नतमस्तक होतो. 


तात्पर्यग्रंथालयामुळे आपल्याला अश्या, "उत्तम" पण कौतुकास पात्र न ठरू शकलेल्या पुस्तकांची ओळख होते. पुस्तके खरेदी करताना मात्र आपण श्यक्यतो गाजलेली पुस्तके घेण्याला भर देतो.

थोडेसे कथेविषयी...
१९४३ मध्येनाझी सैनिकांनी इटली चे हुकुमशहा "मुसोलीनी" यांची दोस्त राष्ट्रांच्या तावडीतून सुटका करून जर्मनी मध्ये आणले. या घटनेनंतर हिटलरचा आत्मविश्वास इतका द्विगुणीत झालाकि आपण मुख्य शत्रूच्या वजीरालाच युद्धावरून नाहीसे केलेतर महायुद्धाचे पारडे जर्मनी च्या बाजूने झुकेल असे सहज बोलून गेला. हिटलर च्या एका सहज बोलून गेलेल्या इच्छेखातरत्याच्याही नकळतएका अधिकाऱ्याने (कर्नल रॅडल)पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे अपहरण करण्याचा डाव मांडला. या प्लॅन मध्ये लियाम डेव्हलीनजोना ग्रे आणि कूर्त स्टायनर या तिघांनी केलेली अभूतपूर्व पराक्रमाची पराकाष्ठाहा या पुस्तकाचा आत्मा आहे. लियाम डेव्हलीन, (एक आयरीश मुक्तीचळवळीचा भूमिगत कार्यकर्ता)जोना ग्रे (जर्मनीची इंग्लंड मधील गुप्तहेर) आणि  कूर्त स्टायनर (छत्रीदारी सैनिकांच्या एका कमांड चा अधिकारीज्याला एका ज्यू मुलीला जीवदान दिल्यावरून जर्मन सेनेमधून कोर्ट मार्शल होऊन शिक्षा भोगावी लागते) , अशी यांची पार्श्वभूमी.

इंग्लंड च्या एका कमी सूरक्षा व्यवस्था असणाऱ्या समुद्र किनारया लगतच्या छोट्या निसर्गरम्य गावात पंतप्रधान विन्स्टन चर्चिल दोन दिवसाच्या विश्रांती साठी येण्याची गुप्त बातमीजोना ग्रे मार्फत कर्नल रॅडल यांच्यापर्यंत पोहोचते. आणि हिटलर ने सहज उद्गारलेली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता दिसू लागते. आणि "तेथे गरुड उतरला" या सांकेतिक शीर्षकाखाली पूर्ण प्लान तयार होतो. खरेच हे "अशक्य ते साध्य" होते की नाहीयाची उत्सुकता असेल तरयासाठी नक्की पुस्तक वाचा.

मूळची इंग्रजी भाषिक कादंबरी जॅक हिगिन्स या लेखकाची आहेजी १९७५ मध्ये प्रकाशित झाली. विशेष म्हणजे हिगिन्सना या अपहरनाच्या गोष्टीची माहितीत्या घटनेला तब्बल ३० वर्ष उलटून गेल्यानंतर अपघाताने समजली.  त्यावरची संपूर्ण व खरी माहिती मिळवण्यासाठी त्यांना किती परिश्रम घ्यावे लागलेयाचेही वर्णन पुस्तकामध्ये नमूद आहे. या लेखकाने जर हि कादंबरी लिहिली नसती तर एक यशोगाथा नेहमीसाठी दफन झाली असती. सौ मोहनतारा पाटील यांनी अगदी भावगंधीत रीतीने मराठी या पुस्तकाचा अनुवादन १९८२ मध्ये केला. 


सन १९७६ मध्ये मूळ पुस्तकावर आधारीत "The Eagle Has Landed" हा इंग्लिश चित्रपट बनवला गेला. Michael Caine (Kurt Steiner), Donald Sutherland (Liam Devlin), Jean Marsh (Joanaa Grey) यांच्या अप्रतिम अभिनयामुळे अविस्मरणीय होतो. युद्धपटा वर असणारा Aggressiveness या चित्रपटात अजून चांगल्या रीतीने दाखवता आला असता. पण हा चित्रपट तुमच्या WishList मध्ये जरूर असावा.

नोट: पूर्ण आर्टिकल वाचल्याबद्दल धन्यवाद. काही सुधारणा अपेक्षित असतील तर जरूर Comment मधून कळवा.