.post img {

Saturday, 19 May 2018

अनोळखी चेहऱ्यांची ओळख... (प्रवास वर्णन)

मागच्या महिन्यात गावी गेल्यावर, 6 सीटर रिक्षाच्या पाठीमागच्या सीट वर बसण्याचा योग् आला. गावी त्या रिक्षाला प्रेमानं डूगडुग असं म्हणतात. महाराष्ट्रात भाग बदलेल तसं तिला टमटम, डूगडुगी, वडाप इत्यादी नावं आहेत. तसं ते नाव पडण्यामागचं कारण अजून मला समजलं नाहीये. कदाचित ती खूपच हळू हळू चालते म्हणून असेल. मागची सीट (त्याला हौदा असं पण म्हणतात) म्हणजे तसे दोन लाकडी बॉक्स एकमेकांसमोर ठेवलेले असतात. थोडी उंच माणसं असतील तर त्यांच्या गुढघ्याला गुढघे टच होतील एवढीशी जागा. आणि एखादा स्पीडब्रेकर किंवा खड्डा आला की तुम्ही धाडकन वरती उडून पुन्हा जागेवर खाडकन विराजमान व्हाल, एवढी रिलॅक्स सीट. तसे कॉलेज ला असताना भरपूर वेळा तो प्रवास केला होताच. पण नंतर घरी बाईक घेतल्यावर तो प्रवास बंदच होता. आता एवढ्या दिवसातुन वेळ आलीच होती तर बसण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि आता हायवे एकदम गुळगुळीत असल्यामुळं, "धाडकन" आणि "खाडकन" व्हायचा जास्त चान्स नसतो.

त्यादिवशी भर दुपार होती. रखरखत्या उन्हात गाडी चालली होती. अधून मधून कुठला स्टॉप आला की ड्रायव्हरचं ओरडणं चालायचं. सगळे प्यासेंजर घाम पुसण्यात आणि कुणी रुमालाने वारं घेण्यात दंग होते. एका हातात रुमाल असला तरी दुसऱ्या हातात मोबाईल होताच. कदाचित एखादं थंड हवा देणारं अँप आहे का शोधत असतील. हल्ली मोबाईल हातात असल्याशिवाय टाईमपास होतच नाही. मी पण त्यातलाच आहे, काही वेगळा नाही. त्यादिवशी मी मोबाईल मध्ये डोकावलो नव्हतो. मोबाईल हातात घेऊ वाटत नव्हता, असं काही नव्हतं. पर ये जालीम बॅटरी ने साथ छोडा था. 10% वरच होती. 10% वर आली की मग जनाची नाही तर मनाची लाज वाटून आणि मजबूर होऊन मोबाईल ठेऊन देतो. मी ही तो खिशात ठेऊन दिला. मनात गहन प्रश्न होतं, की आता अर्धा तास कसा घालवायचा? खरंच सध्या एवढी अवघड परिस्थिती आली आहे की आयुष्यात हा प्रश्न पण पडू शकतो.

मग टाईमपास म्हणून पाठीमागून येणाऱ्या गाड्यांवर नजर पडली. ही डूगडूग तशी हळू चालते. म्हणून पाठीमागच्या गाड्या तिला ओव्हरटेक करून आरामात पुढं जातात. ही आपली जास्त लोड न घेता कासवाच्या गतीनं साईडच्या लेन मधून चालली होती. मागे पाहताना सहज लक्षात आलं, की प्रत्येकाची आयुष्याची स्टोरी किती वेगळी असेल ना. या गर्दीतल्या प्रत्येक माणसाचं एक स्वतंत्र आयुष्य असतं. मला माझी स्टोरी जेवढी मोठी वाटते, तेवढीच त्यांना सुद्धा असेल. प्रत्येकाला या क्षणी कुठलं तरी ठिकाण गाठायचंय. बाईक किंवा एस टी ने जाणारा मध्यमवर्गीय असो की आलिशान कार मधून जाणारा श्रीमंत माणूस, प्रत्येकाच्या मनात मला पुढं जाऊन काय काय करायचेय याची गोळाबेरीज चालली असेल. काही काळजीमध्ये असतील किंवा काही आनंदात असतील. आपण एखादया ओळख न असणाऱ्या व्यक्तीला नुसतं पाहून त्याच्या रंगरूप, कपडे, गाडी आणि चेहऱ्याच्या भावावरून जर जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर? मग आमच्या पाठीमागून येणाऱ्या वाहन आणि वाहनचालकांकडे निरीक्षण करायला लागलो, तर खरंच खूप वेगवेगळे चेहरे भेटले.


एका जुन्या M80 बाईक वरून एक इसम चालला होता. सावळा वर्ण उन्हामुळं आलेल्या घामानं चमकत होता. गाडी च्या हँडल ला एक जुनाट पिशवी अडकवलेली. जास्त काही भरलेलं नसावं. निवांत चालला होता, पण काहीतरी गहन विचारात होता. चेहरा भोळा वाटत होता. म्हणजे एखादा माणूस असतो ना, जो घरातल्या सगळ्यांची जबाबदारी घेतो, स्वतःची कमी पण सगळ्यांची काळजी घेईल असा काहीसा वाटत होता. अचानक त्याला टाइमाची आठवण आली, त्यानं घड्याळ पाहिलं आणि चमकला. उशीर झालेला असावा. गाडीची गती वाढवून त्यानं ओव्हरटेक केलं. त्याची गती जास्त नसल्यामुळं, तो आम्हाला ओव्हरटेक करता करता त्याला 2 बाईक नी गाठलं.

आता मागे होती पल्सर. आणि त्यावर एक तरुण दाम्पत्य होतं. पल्सर च्या बाजूला भली मोठी बॅग अडकवल्यामुळं, हे विवाहितच आहेत, याबद्दल काही शंका नव्हती. आणि एक तर तो तिला माहेरी सोडायला चालला असेल, किंवा माहेर वरून pick करून घरी चालला असेल. ती त्याला बिलगून बसली होती. खरं तर त्यामुळं तिला ऊन लागत नव्हतं, मायेची सावली म्हणतात ना ते हेच असावं. त्यांचं काहीतरी बोलणं चाललं होतं. कदाचित घरातल्या काही गोष्टी असतील. म्हणजे तोच वेळ मिळतो ना गावातल्या दाम्पत्याला घरच्या गोष्टी डिसकस करायला. तिच्या काही तक्रारी असतील, त्याच्याविषयी किंवा घरातल्या कुणाविषयी तरी. तिला पण ह्या गोष्टी मांडायला नवऱ्याशीवाय कोण असतं. तो जे काही सांगत होता, समजावण्याचा सूर वाटत होता. ते आमच्या पुढं निघून गेले. त्यावेळी पाहिलं तर तिनं त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन डोळे मिटले होते.

तेवढ्यात एक जुन्या मॉडेलचा टाटा ट्रक आम्हाला ओव्हरटेक करू लागला. मधूनच त्याचा ओव्हरटेक करायचा मुड गेला असावा किंवा आपलं टॉप स्पीड एवढंच आहे याची जाणीव झाली असावी. मग तो ना पुढं ना मागे, आमच्या गाडीच्या समांतर चालू लागला. तेवढ्यात मागून एकदम रेसिंग कार च्या त्वेषात एक SUV आली. कदाचित renault duster असावी. त्या ड्राइवर ला समोर आमची दूगडुग आणि ट्रक समांतर चालल्या मुळे पुढे जायला जागाच नाही. जागेवर त्याचं स्पीड 120-130 वरून 30 वर आला. त्याच्यासाठी हा जणू अपमान होता. त्याचा अश्वमेध रोखण्यासाठी जणू समोर लव (डूगडूग) आणि कुश (ट्रक) उभे होते. त्याची अवस्था पाण्यावाचून तडफडणाऱ्या माश्यासारखी होती. इकडून तिकडून पुढे जायचा प्रयत्न चालू होता. नंतर त्याने जेव्हा हॉर्न चा जोरात सपाटा लावला, की मला वाटलं आता एक तर ट्रक तरी बाजूला होईल किंवा कार च्या हॉर्न चे बटन तरी खराब होईल. तसा ट्रक वाल्यांचा attitude चा नाद नसतो. ते अगदी मस्तवाल हत्ती प्रमाणे निवांत चाललेले असतात. मग मागून स्वतः टाटा किंवा अंबानी जरी हॉर्न वाजवत आले तरी त्यांची ती चाल बदलत नाही. कधी कधी दोन ट्रक जर एका बाजूला एक चालले असतील तर जणू गावातले दोन फक्कड दोस्त खांद्यावर हात टाकून निवांत चालल्या सारखे वाटतात. त्या परिस्थितीत मात्र मागून पंतप्रधान, वादळ, सुनामी, यम अशी अगदी कल्पनेतली कोणतीही गोष्ट पाठीमागून हॉर्न वाजवून पुढे जायचा प्रयत्न करत असेल तर पाच दहा मिनिटांनी नैवैद्यासारखी थोडीशी जागा बहाल केली जाते. तर मग आपल्या मूळ विषयाकडे वळू. शेवटी आमच्या डूगडूग ने नमतं घेऊन पाठीमागच्या SUV ला साईड दिली. व ती पण तडफडणारा मासा पाण्यात जशी उडी घेईल तसा सुसाट निघून गेला.

इकडं माझ्या निरीक्षणाचा कार्यक्रम बिनादिक्कत चालू होतं. माझा स्टॉप यायला अजून 5 मिनिटे तरी बाकी होती. बऱ्याच गाड्या ओव्हरटेक करून जात होत्या आणि गमती पाहायला मिळत होत्या.

आता पाठीमागे एक बर्फ़ाची वाहतूक करणारा छोटा हत्ती आला. छोटा हत्ती म्हणजे टाटा ace नावाचा छोटा ट्रक, हे नावच जगजाहीर आहे आणि त्याबद्दल मला वेगळं सांगायला नको. बर्फाचं होणारं पाणी दोन्ही बाजूला ठिबकत चाललं होतं. ठिबकत कसलं, पाण्याची धारच लागली होती. असं वाटलं की यार त्या ट्रकमधील बर्फाच्या कंपार्टमेंट मध्ये जाऊन बसावं मस्त. ते बर्फाचं गार गार फीलिंगची कल्पना करूनच दिल गार्डन गार्डन झालं.  पण एक आहे, या उन्हाचा त्रास होतोय म्हणून अशा परिस्थितीत बर्फावर बसायला आपल्याला नक्की आवडेल. पण किती वेळ? जास्तीत जास्त 1 मिनिट?? नंतर कळ मारायला लागेल ना?? म्हणजे माणसाला कुठलीच गोष्ट जास्त झाली की सहन होत नाही, मग ती चांगली असो की वाईट. असो. अजून एक गोष्ट मला पाहायला मिळाली म्हणजे, त्या बर्फ नेणाऱ्या गाडीचा ड्रायव्हर मात्र घामाच्या धारा पुसत होता. किती विरोधाभास हा. हे म्हणजे असं झालं की, एखाद्याच्या घरात बक्कळ पैसा आहे पण त्याला तो वापरताच येत नाहीये उपाशीच बसायला लागतंय. अशी ही जिंदगी.

तेवढ्यात आमच्या डूगडुगला जोरात ब्रेक लागला. ड्रायव्हर ची जोरात हाक ऐकू आली. "चला ....लाष्ट स्टॉप...उतरून घ्या लवकर.. सुट्ट पैसं द्याचं बघा..."
मी उतरलो... आणि त्या ड्रायव्हर दादाला सुट्ट दहा रुपय काढून दिलं...


आज रणरणत्या उन्हात पण विना मोबाईलचा एवढा टाईमपास होऊ शकतो हे कळालं. माणसांचं निरीक्षण करणाऱ्याला आजकाल लोक येडाच म्हणतील. पण कधीकधी नजर चुकवून अनोळखी माणसं वाचून पण खूप मजा येते. आणि शिकायला ही मिळतं. सफर तर कुठलाही सुहाना होऊ शकतो, मनाची मजा करण्याची तयारी असेल तर....


आपण हा लेख वाचलात. खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा...

1 comment:

  1. विशाल खुप भारी प्रवास अधोरेखित केला डुगडुगी सोबतचा . मोबाईला खिशात ठेऊन बाहेरच जग न्याहाळताना हा प्रवास पण अविस्मरणीय होऊन जातो .
    ते बर्फाचं गार गार फीलिंगची कल्पना करूनच दिल गार्डन गार्डन झालं. हे वाक्य खुप आवडलं 👌👌

    ReplyDelete