.post img {

Automatic Size

Monday 2 October 2017

आपण सारे अर्जुन... संभ्रम ते पूर्णत्व... व्.पु.काळे

व.पु. काळे यांचं लेखन सहजसोपं असलं तरी मनात खोलवर रुजतं. कधी ते विचार कथारूपात येतात तर कधी स्वैर व स्वच्छंद चिंतनरुपात. अशाच विचारांची पुरचुंडी असणारं पुस्तक 'आपण सारे अर्जुन' माझ्या मनाच्या नेहमीच जवळ राहील.

नियतीनं ब्रेन ट्युमर सारख्या दुर्धर आजाराने आपल्या पत्नीला ग्रासलावर, वपुंसारखा कणखर लेखकही काहीकाळ उन्मळून पडला. त्या विषण्य अवस्था असणाऱ्या काळात, ओशोंची गीतेची प्रवचणं त्यांच्या ऐकण्यात आली. आपण स्वत:च अर्जुन आहोत, नव्हे तर प्रत्येक माणूस हा अर्जुन आहे. त्याला अर्जुनाप्रमाणेच आपण पदोपदी कोंडीत सापडल्याची, गोंधळल्याची, संभ्रमाची जाणीव होते, असेही त्यांना कळून चुकले. संभ्रमावस्थेचा वेध घेणाऱ्या लेखमालेचं बीज मनात ओलावा धरू लागलं. त्यातूनच 'आपण सारे अर्जुन’ हे ३० वैचारिक लेख असणारं पुस्तक आपल्या भेटीस आलं.

भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नसून तो मानसशास्त्रावरचा एक उत्तम ग्रंथ आहे हे त्यांना उमगले. तेव्हा त्यांच्या मनात महाभारताने महाभारताला शेवट नाही, फक्त सुरुवात आहे अशीही एक कल्पना वपु भारावून मांडतात. पण एक महत्वाची खंत व्यक्त करतात. भगवद्गीते सारखा महत्वाचा मार्गदर्शक ग्रंथ युवकांपर्यंत पोहोचला नाही. भारतातील ९९ टक्के लोकांनी, भगवद्गीता जाणून घ्यायची सोडा, उघडूनपण पाहिली नसेल. भारतात, अध्यात्म हे म्हातारे झाल्यावर जेव्हा करायला काहीही नसते त्यावेळी अभ्यासण्याची गोष्ट आहे. म्हणजे, आदर्श आणि सुखी जीवन जगावे कसे, याचे मार्गदर्शन आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजताना आणि ज्या वयात, आपण सकाळी काय नाश्ता केला हे दुपारी लक्षात राहत नाही, अशा वयात घ्यावे.
हास्यास्पद..!!

धनुर्धारी अर्जुन. शाळेतल्या 'छान छान गोष्टी' पासून ते आजीच्या कथेमध्ये तो असायचा. प्रवचनापासून ते टी. व्ही. तल्या महाभारतामधे आपण तो पाहिलाय. तो विरोत्तम होता. एक महान धनुर्धारी होता. सुशिल, नम्र, आदर्श असा मुलगा..शिष्य.. भाऊ.. नवरा आणि महत्वाचे म्हणजे कृष्ण त्याचा सखा होता..

हे सगळं आपल्याला मुखोद्गत आहे असे म्हणायला हरकत नाही. मग वपुनी असे काय वेगळे सांगितलेय..? आपण सारे अर्जुन?  म्हणजे? हे सगळे गुण आपल्यात  आहेत? नाही..!!  हे सगळेच्या सगळे गुण क्वचितच एखाद्या महापुरुषात असतील. पण "आपण सर्व" आणि "अर्जुन" यामधे एक साधर्म्य आहे.

संभ्रम.. गोंधळ..!

कृष्णाने गीता कोणत्या क्षणी सांगितली? इतकं भयानक युद्ध समोर ठाकले होते. लाखो योध्ये एकमेकांचा जीव घेण्यास आसुसले होते. आणि अशा नाजूक  क्षणी पांडवसेनेतील अर्जुनासारखा अतिशय महत्वाचा योद्धा एका दुःखाने ग्रासला जातो. कुठल्याही युद्धामध्ये तर समोर शत्रु असतात, अगदीच शत्रु नसले तरी शत्रुचे मित्रपक्ष असतात. पण इथे तर त्याच्या विरोधात, सर्व त्याचे "स्वकिय" होते. गुरु द्रोणाचार्य, पितामह भीष्म हे तर त्याचे वंदनीय आदरस्थान होते. अर्जुन घोर संभ्रमावस्थेने ग्रासला गेला. त्याने कृष्णाला प्रतिप्रश्न केला, "कृष्णा... माझ्या माणसांना मारून मला "राज्य" मिळवायची खरच गरज आहे का? जरी युद्ध जिंकून मिळवले हे राज्य. तर त्या राज्यात प्रवेश करण्यासाठी मला माझ्या वंदनीय गुरूंच्या प्रेतावरून जावं लागेल. नको मला हे युद्ध.. नको हा रक्तरंजित विजय."

आणि आपली ही अर्जुनावस्था क्षणाक्षणाला होत असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरू होऊन जगातल्या आपल्या अस्तित्वावर येऊन ठेपते.

- आज ही भाजी करू की ती करू?
- 'बॉस खूपच त्रास देतोय, दुसऱ्या कंपनीत जाऊ की नको?'
- रविवारी ट्रिप ला जाऊ की आराम करू?
- तो किंवा ती माझी काळजी करत नाही मग मी पण तसेच करू?
- मुलांसाठी संभ्रम असतो, आईची बाजू घेऊ की बायकोची? तर आईसाठी असते, नवऱ्याची ची बाजू घेऊ की मुलांची?
- श्रीमंताचा संभ्रम.. 'एखादा भिक मागतोय, देऊ की नको?' गरीबाचा संभ्रम.. 'हाताला काही काम नाही, भीक मागायची वेळ तर नाही येणार?'
- स्वताच्या मुलाने चोरी केली, 'त्याला शब्दाने समजावू की माराने?' 
- तो मला लाच मागतोय, 'देऊ की विरोध करू?' किंवा 'तो मला लांच देऊ करतोय, फुकटचा पैसा आहे, घेऊ की तत्वानिष्ठ राहु?'

अशा अनेक असंख्य संभ्रमावस्था मांडता येतील. इतकी मोठी लिस्ट सेव्ह करायला इंटरनेटच्या सर्वरची पण अर्जुनावस्था होईल. 

अर्जुन संभ्रमात पड़ला कारण त्याने "विचार" केला. तो विचारोत्तम होता. आपण बऱ्याच वेळा विचार करतो, ती फ़क्त चिंतेच्या रूपाने. पुस्तकाच्या सुरुवातीलाच वपु जाहीर करतात की ही कादंबरी नव्हेच कारण लेखक म्हणून ह्या विचारांना त्यांनी कुठल्या विशिष्ट चौकटीत बसवलंच नाही. या पुस्तकामधे जीवनतल्या विविध छटांचा विचार योग्य दृष्टीने करुन, जीवन मोठे कसे करावे याचा विलक्षण आढावा घेतला आहे.

राजकारणातल्या अराजकतेवर बोट ठेवतानाच, दुसरीकडे त्यात डोळसपणे भाग न घेता नुसत्या टीका करणाऱ्या मतदारांना ते धृतराष्ट्राची उपमा देतात. तसेच महाभारतात किंवा आजच्या जगाची विभागणी विचारी, विचारहीन आणि निर्विचारी या भागात करता येते. अर्जुन विचारी होता म्हणून संभ्रमात पडला. दुर्योधन, भीम विचारहीन होते म्हणून युद्ध करायला लगेच तयार झाले. कृष्ण निर्विचारी होऊन परिस्थितीकडे पाहण्याची क्षमता होती म्हणून तो या सर्व जगाचा अर्थ लावू शकला. सैनिकांना विचारहीन बनवलं जातं तेव्हाच ते शत्रूपक्षातील आपल्याला तसूभरही ओळख नसलेल्या अनोळखी सैनिकांचा जीव घेऊ शकतात. 'मी जर त्याचा जीव नाही घेतला तर तो माझा घेईल' एवढा एकच विचार युद्धात असतो. तोच प्रसंग उद्योगधंद्यात गुलामाप्रमाणे वागवल्या जाणाऱ्या कामगारांच्या बाबत. अर्जुन संभ्रमात पडला कारण त्याने तो रक्तपात घडण्याआधी पुनर्विचार करायचे ठरवले म्हणून तो दुर्योधनापेक्षा श्रेष्ठ ठरतो. पण त्याचबरोबर युद्धात आपले स्वकीयच मारले जात आहेत तेव्हा हे राज्य मिळवून दाखवायचे कुणाला हा प्रश्न पडल्यामुळे तो श्रीकृष्णाच्या निर्भेळ दृष्टिपर्यंत तो पोहचू शकत नाही. अर्जुन(मनुष्य) हा दुर्योधन (पशु) आणि कृष्णप्रवृत्ती (परमेश्वर) मधील दुवा आहे.

कुटुंबातील मतभेदावर भाष्य करताना वपु विवाहसंस्थेलं अपेक्षांचं अचूक वर्म दाखवतात. विवाह होण्यापूर्वी ठेवलेल्या अपेक्षा 'शुभविवाह' होइपर्यंत पुरतात. पुढे 'शुभसंसार' या स्थितीपर्यंत पोहचविण्याची ईच्छा असली तरी जबाबदारी कुणी घेत नाही. तसेच मानवी गुण आणि अवगुण हे एकमेकांच्या अपेक्षांच्या चष्म्याने पाहून ठरवले जातात.

या पुस्तकातील माझ्या आवडत्या काही ओळी..

"अंधारात वीज चमकली की वाट उजळून निघते; पण नंतरचा अंधार जास्त गडद होतो. नजर तोपर्यंत अंधाराला सरावलेली असते. प्रकाशाचा क्षण अपरिचित असतो. मनाची पूर्वतयारी नसताना विजेचा लोळ येतो आणि जातो."

"क्षणाला क्षण घट्ट चिकटून असतानाही पुढच्या क्षणी काय घडणार आहे, हे आपल्याला माहीत नसणं म्हणजे अंधारच नव्हे काय?"

हे पुस्तक वाचून तरी एकदा आपल्या देशातील काही युवक तरी भगवद्गीता जाणून घ्यायला तयार होवोत ही प्रार्थना..

अर्जुनाला त्याचा संभ्रम दूर करायला सखा "कृष्ण" भेटला. आपल्याला ही भेटु शकतो. चांगल्या मनाने जग पहां. जरूर मिळेल. मला "पुस्तक" हां "कृष्ण" मिळाला. आयुष्याचा सारथी.

In case of copyright violation of this picture, please contact the blogger.
हां लेख वाचल्याबद्दल धन्यवाद..!!

आपल्याला आवडल्यास जरूर कळवा आणि शेअर करा.

No comments:

Post a Comment