Automatic Size

Monday, 25 September 2017

निवडुंगाचं प्रेम

प्रितम आज आज्जीकडे आला होता. पण येताना तो श्रद्धाशी भांड भांड भांडून आला होता. दोघांचंही इंजिनीरिंगचे शेवटचं वर्ष संपत आलेले आणि दुधात साखर म्हणजे दोघांचे एकाच कंपनी मध्ये selection पण झालं होत. परितां अजून त्यांच्या भांडणाचाच विचार करत होता. अगदी समोर चालू असलेल्या tv कडे पण त्याचे लक्ष नव्हते. "खरंच एवढंच प्रेम होत का माझ्यावर तिचे? एका कंपनीमध्य दोघे असण्याने किती एकत्र किती वेळ मिळाला असता दोघांना. एवढं चांगलं होत असताना तिने मला आवडत नसतानाही बॅडमिंटन च्या ०२ वर्षाच्या कॅम्प मध्ये जॉईन करायचा निर्णय घेतला. आणि कॅम्प कुठे तर दिल्ली मध्ये. तिचं मुळात माझ्यावर प्रेमच नाही नाहीतर तिनं तिच्या महत्वकांक्षाचाच विचार केला नसता. मी तिला स्वार्थी म्हटल्यावर किती राग आला तिला. सगळ्या चुका स्वतः करून रडारड पण करायची. हे प्रेम म्हणजे खूप कॉम्प्लेक्स गोष्ट आहे. आता वाटतेय या प्रेमात पडलो नसतो तर बरे झाले असते. आणि मी काही चुकीचे बोललेलो नाही, so मी आता जाणार नाही नाक रगडत तिच्याकडे."

तो विचारात असताना, आज्जी किचनमधून बाहेर आली. अरे कन्नड चॅनेल लावून काय पाहत बसलायस. कुठल्या विचारात गढलायस एवढा? सगळं ठीक आहे ना? प्रितम लगेच विचारातुन बावचळत लगेच बाहेर आला. आज्जीला श्रद्धा त्याची बेस्टफ्रेंड आहे एवढंच माहीत होतं. त्यानं काहीतरी विषय काढावा म्हणून विचारलं.

"काही नाही गं.
"ए आज्जी, आपल्या अंगणातली ही मोठी मोठी ४ झाडं कुणी लावलेली गं?" 

आज्जी ला जाणवलं की याचं काहीतरी बिनसलं आहे. 

"का रे? आज कुठे आहे तुझं चित्त? आणि मधूनच तुला झाडं कुठून आठवली तुला?"

"सहज विचारले गं. सांग ना..."

"तुझ्या आजोबांनी लावलेली. आपल्या घरापुढे आपणच झाडं लावणार ना, दुसरं कोण येईल? ३५-४० वर्षे झाली बघ ही झाडे लावून. तुझा बाप त्यावेळी २-३ वर्षांचा असेल. आणि हे फणसाचे झाड तर फक्त मला आवडते म्हणून लावले ह्यांनी."

"अरे वाह, हे झाड म्हणजे तुला लव्ह गिफ्ट दिले म्हणायचे आजोबांनी."

आजी  फटका देण्यासाठी त्याच्याकडे आली, "काही पण बडबड करशील काय रे? कॉलेज अजून संपायचे  आहे, तेवढ्यात लागली तुला हवा? "

"अगं, तसं थोडीच आहे आजी? प्रेम हे प्रेम असतं, लव्ह म्हटलं की ते वाईट होतं का लगेच? आजकाल आम्हा young लोकांनासुद्धा सुचणार नाही असं गिफ्ट आजोबांनी दिलं तुला. मानलं यार आजोबांना."

"विसरलेच रे. माझा पिटु आता मोठा झालाय ते. बर तुला काय करू खायला? २ आठवड्यानंतर हाजीर झालात आपण युवराज, आणि अजून खायची फर्माईश आली नाही ती?"

"राजमाता.. अरर नाही राजआज्जी.. माफी असावी. आम्ही २ आठवडे स्वारी वर होतो. पण आज मला आमच्या जेवणात पिठलं आणि भाकरी हवी आहे, ती पण एकदम झणझणीत."

"हो.. म्हणजे युवराजांना मागच्या वेळ सारखे जुलाब पण होतील हं. मग त्यांचे पिताश्री त्यांना आणि राजआज्जी ना चांगले सुनावतील."

"काय गं तू पण? प्रत्येक वेळी तसच होणार काय? आता सवय झालीय मला तिखट खायची. आणि मागच्या वेळेस बाबा तुला का बोलला मला समजलं नाही. मीच तुला आग्रह केलेला ना तिखट देण्यासाठी. मला मम्मी जशी खाड खाड वाजवते तशी तूझ्या मुलाला का मारत नाहीस?'

आजीने एक पाठीत चापट देत, "जास्त बोलू नकोस आता. अरे तो काय लहान आहे का आता खाड खाड वाजवायला?"

"बरं जाऊदे. मला आज पिठलं भाकरी पाहिजे हे मात्र नक्की. मला एक सांग. अजून काय काय करायचे आजोबा तुझ्यासाठी?"

आजी खिडकीबाहेर दोन्ही झाडाच्या मध्ये पहात स्वतः मध्ये हरवून गेली. 

"आजी कुठे हरवलीस? सॉरी मी आठवण करून दिली का गं आजोबांची?"


"तसं नाही पिटु. त्यांची आठवण तर सदैव आसपास असतेच त्यासाठी निमित्त लागत नाही. पण आज खूप दिवसाने एक खूप जुनी गोष्ट आठवली यांची."

"सांग ना काय?"

"अरे आमचं लग्न झालं त्यानंतर २ वर्षांनंतरची दिवाळी आली होती. त्या दिवाळीत आमच्या नणंद बाईंनी ४ गजरे आणले होते. मी अगदी १७-१८ वर्षांची असेन, मला वाटलं त्यांना एक गजरा मागावा. त्यावेळी तुझ्या आजोबांचे कामपण सुटले होते नवीन काम शोधता शोधता दमछाक होत होती. माझ्या नणंद बाईनी वाकडे तोंड करत म्हणाल्या, "दादाकडं नाहीत वाटतं पैसे, बायकोला गजरा आणून द्यायला?" कुत्सित पणे हसल्या मला. माझे डोळे पाणावले, पण लगेच मी डोळे पुसले. त्यांना सांगितलं तर खूप रागावतील, म्हणून काही बोलले नाही. पण तुझ्या आजोबांच्या नजरेतुन हे सुटले नाही."  

आजी भानावर आली, "अरे, काय मी पण जुन्या गोष्टी उगाळत बसलेय. तू बोअर होत असशील ना. आणि आज तू तुझा प्रिय लॅपटॉप आज आणला नाहीस येताना."

"अगं नाही होत बोअर मला. एवढं चांगलं सांगत असताना का थांबलीस? सांग ना मग काय केले आजोबांनी? तुझ्यावर रागावले का त्यांच्या बहिणीवर?" 

"बरं सांगते. आज बऱ्याच दिवसांनी या म्हातारीचं कुणीतरी एवढं प्रेमानं ऐकून घेतंय. मग सांगते. अरे तुझे आजोबा म्हणजे एकदम गरीब स्वभावाचे आणि कमी बोलणारे. ते कशाला कुणाला रागावतायत. त्यांनी चक्क गावातून कुणाकडून तरी मोगऱ्याचे दोन वेलच आणले लावायला. लावल्यानंतर म्हटले, आजपासून ह्या मोगऱ्याची जी पण फुलं येतील ती तुझी. मी तर अवाक झाले. पण मनातून खूप खूप खूष झाले. आयुष्यात पहिल्यांदा मला माझा स्वतःचा मोगरा मिळाला. त्यानंतर ७-८ वर्षातच ते गेले. तेवढ्या वर्षाच्या संसारात मला त्यांनी माझी अर्धी राहिलेली शाळा पूर्ण शिकायला लावली. मी शिक्षिका झाले. त्यांना सगळे हिणवायचे, की तू असा अडाणी कामगार आणि तुझी बायको मास्तरीन की रे. ते म्हणायचे की अरे मोगऱ्याच्या वेलाकडेला निवडुंग असेल तर मोगऱ्याचा वेल सुरक्षित राहतो. मी निवडुंग असलो तरी मला दुःख नाही, जोपर्यंत माझा हा मोगरा सुगंध देतोय."

"माहिती नाही कसे पण या खिडकीत उभा राहिले की अजून त्या मोगऱ्याचा सुगंध येतो. पिटू तुला येतो का रे इथे सुगंध?" 

बोलता बोलता आजीच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हलकेसे हसू पण होते. प्रीतम ला माहिती होते की आजी आता वेगळ्याच जगात आहे. त्याने आजीला घट्ट मिठी मारली. आज खूप दिवसातुन त्याच्या डोळ्यात पाणी आले होते.


"आजी मला नाही येत गं मोगऱ्याचा सुगंध. तुला तो येतो, कारण तो तुझ्या हृदयात आहे. आम्हा मुलांना खऱ्या प्रेमाचा अर्थ कळण्यासाठी अश्या गोष्टी खरंच कळायला हव्यात. आम्ही लोकं जाता येता सदैव I Love U बोललो तर तेच प्रेम असं समजतो. मी जरा बाहेर जाऊन येतो. मला सुद्धा माझ्या मोगऱ्यासाठी निवडुंग बनावं लागेल. मी आज संध्याकाळी झोपायला इकडेच येईन. आणि तुला माझी पण लव्ह स्टोरी सांगेन."

आजीने हसत त्याच्या गालाचा मुका घेतला. त्याने लपवलं असलं तरी त्याची लव्ह स्टोरी तिच्या नजरेतून सुटली नव्हती. ते तिला याधीच कळाले होते.

प्रितम पळतच बाहेर गेला. त्याला त्याचं प्रेम गमवायचं नव्हतं. त्याला माहिती होतं की ती त्याची वाट पाहत आणि रडत नेहमीच्या भेटीच्या ठिकाणी थांबली असेल.