.post img {

Automatic Size

Showing posts with label Story. Show all posts
Showing posts with label Story. Show all posts

Monday, 20 July 2020

पृथ्वीचे पत्र

दादा,

कसा आहेस रे? तशी तुझी किरणं वरवरची खबरबात सांगतातच. पण मनातल्या गोष्टी स्वतःच सांगायला हव्यास ना. नाहीतर, तुझ्या मनात काय चाललं असेल याचे तर्क लावत बसते आणि मन भूतकाळातल्या पापूद्र्यात हरवत जातं. काळाच्या पडद्यामागे, एकेठिकाणी बालपण गवसलं आणि हुरहुर वाटू लागली बघ. बालपणीच्या आठवणींनी मन दाटून येतं.

तसे सृष्टीचे निर्माते आपल्याला आईबाबा म्हणून लाभले. पण माझ्या नखऱ्यांनी मात्र आईबाबांच्या किती नाके नऊ आणले होते ना. आधी तर किती तरी वर्ष तापटच होते मी, आगीचा गोळाच जणू. जरा काही मनाविरुद्ध झालं की नाकावर ज्वालामुखीच जागृत व्हायचा. आई नेहमी म्हणायची, "दादा बघ कसा शहाण्यासारखा वागतो. स्वतः कितीही त्रासात असला तरी तसा दाखवत नाही. उलट दुसऱ्याला जगण्यास चालना देतो." या सुचनांमुळं सुरुवातीला राग यायचा, पण हळूहळू तू जसा कळायला लागलास, तेव्हापासून तुझा आदरच वाटला. आता तू म्हणशील, "इतकं आभार प्रदर्शन करतेयस, माझ्याकडून काही हवंय का?" पण नाही रे. तू आमच्यासाठी आजपर्यंत जे काही केलंस. ते बोलावसं वाटलं. नऊही लहान भावंडाचं आयुष्य स्वतःच्या प्रकाशाने उजळणारा तू. प्रत्येकजण कितीही दूर असला, तरी तूझ्याशी एका अदृष्य धाग्याने बांधला गेलाय. नाहीतर आम्ही अंतराळात कुठल्या कुठे गुडूप झालो असतो. तुझे केवळ आभार मानून चालणार नाहीच, आमचं आयुष्यच सदैव तुझ्या पायी अर्पण आहे.

आज तुझे आभार मानावे वाटले कारण मी आता अनुभवतेय की आपल्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाला सांभाळणे म्हणजे किती तारेवरची कसरतच असते. जे, आई बाबा आणि तुही केलंस. हल्ली माझा व्याप भयंकर वाढलाय रे. तुझी भाचेकंपनी आता खूपच अवकळ झालीये. लहानपणी मुलं बरी असतात. आपल्यावर अवलंबून असली तरी निरागस असतात. पण मोठेपणी मात्र निरागसता हरवून एक क्रूर व्यावहारिकता येते. मानवाचं अगदी असंच झालंय. बाकी सगळेजण शिस्तीत वागतात पण हा हुशार, शहाणा म्हणत आता खूपच स्वार्थीपणे वागतोय. झाड मात्र अगदी तुझ्यासारखं आहे बघ. दुसऱ्यांसाठी जगत राहतं. मानवाला मात्र, सगळं विश्व आपल्या मालकी हक्काचं असावं असं वाटतंय. कधी शिक्षा केलीच तर अजून उफाळून उठतो. कळतच नाही, याला समजवावे तरी कसे. तसा तो वाईट नाही रे. मायाळूसुद्धा आहे, सुंदरतेची दृष्टी आहे. पण ऐशोरामात राहावं या महत्वकांक्षेने इतका पछाडलाय की त्याला आपल्या भावंडांना इजा पोहचलेली देखील जाणवत नाही. असो, मागच्या काही वर्षापासून तू जरा तापून बोलतोयस, तेव्हापासून महाराज ताळ्यावर येत आहेत. तुझी दटावणी नेहमीच कामी येते. बघू आता मानवात काय बदल घडतात का?

अरे हो.. वर्षामावशी अजूनही नेहमीसारखी चार दिवस का होईना दिलखुलास राहून जाते. तिचं ते गडगडाटी हसणं अजूनही तसंच आहे. येताना कधी मोकळ्या हाती आली तर शपथ! मला अगदी हिरवा शालू, नद्या-तलावांच्या दागिन्यांनी नटवते आणि


काही क्षणांसाठी मी पुन्हा एक अवखळ छोटी मुलगी होऊन जाते. तिचा ओलावा काळजात ठेवूनच जाते.

हे तुझी नेहमीच आठवण काढतात. मानवाच्या नवनवीन यंत्रांच्या प्रदूषणामुळे त्यांची तब्येतही बिघडत चाललीय. प्राणवायू म्हणून मुलांच्या तनामनात वावरत, आयुष्यभर फक्त त्यांच्यासाठीच जगले ना रे ते. अजून काय काय सोसायचे. झाड मनापासून त्यांची काळजी घेतेय. पण मानव जर जबाबदारीने वागला तर त्यांची सगळी काळजी दूर होईल.

आता प्रकर्षाने असं वाटत राहतं की.. तुला भेटावं, मनसोक्त गप्पा माराव्या... भांडावं.. आणि रडत पुन्हा तुलाच मिठी मारून मनातली सुख दुःख सांगावी. पण निसर्गाने वेगळ्याच चक्रात अडकवले ना रे आपल्याला. कधीकधी असे भास होतात, की माझ्या सृष्टीचा विनाश होऊन सगळं भयाण झालंय. मी एकटीच आहे. तुझा हात सुटून मी अंतराळात कुठेतरी दूर दूर चाललीय. आणि तू दिसेनासा झाला की मन भानावर येते. का होत असेल रे असं?

माझ्या बाळांसाठी मला कितीही संघर्ष करावा लागला तरी करेनच. पण कधी असं अघटित घडलंच तर.. काठोकाठ भावनांनी भरलेल्या मनाने जीवाची पर्वा न करता तुझ्याकडे धाव घेऊन तुझ्यातच विलीन होऊन जाईन. त्यावेळी ही पृथ्वी तुझाच अंश


असेल. तीच असेल माझी तुझ्याप्रती कृतज्ञता.

आता लिहिवत नाही. इथेच थांबते. स्वतःची काळजी घे. उत्तराची वाट पाहते.

तुझी,

पृथ्वी



********* समाप्त **********

©विशाल पोतदार



Thursday, 22 August 2019

मारवा (कथा)

दहा बाय बारा फुटांची ती बेडरूम एका अस्वस्थतेने भरून गेली होती. बाहेर लख्ख सूर्यप्रकाश असला, तरी इथे मात्र काळवंडून आलं होतं. कोपऱ्यातल्या कॉटवर एका सत्तरीतल्या पुरुषाचा देह निश्चल असा पहुडलेला. जीवनाच्या अंतिम क्षणी मात्र त्याच्या चेहऱ्यावर गहन विचारात असल्यासारखा निर्विकार भाव उरला होता. ऑक्सिजन मास्कमधून जड झालेला श्वास ठळकपणे जाणवत होता. बाजूच्या स्क्रीनवर हृदयाच्या ठोक्यांचा आलेख अजून तरी तोडक्या मोडक्या लयीत चाललेला. त्यातूनच त्या देहाला काय तो जिवंतपणाचा पुरावा द्यावा लागत होता. 

त्याची पत्नी कॉटला टेकून बसलेली. तिच्या अवस्थेचा थांग कुणी लावावा! एखादी भयानक गोष्ट घडणार याची बऱ्याचवेळा आपणास कल्पना असते, त्यास तोंड द्यायला तयारही असतो परंतू खरेच ती गोष्ट घडल्यावर सगळे काही अचानक घडल्याप्रमाणे आपण गांगरून जातो. अशाच काहीशी दोलायमान मनोवस्थेतून जाणाऱ्या त्या स्त्रीची नजर नवऱ्याच्या चेहऱ्यावरून किंचितही ढळत नव्हती. 

तिने मनात कितीही सकारात्मक समज करून घेतले असले, तरी डोळ्यांना अटळ क्षण उमजलेच आणि अश्रू अनिर्बंध वाहू लागले. अश्रुंतून आठवणी अलगद बाहेर पडू लागल्या. थोडा थोडका नाही तर तब्बल ४० वर्षांचा एकत्र प्रवास! नववधू म्हणून मिरवण्यापासून ते वार्धक्यातली ही वेळ, अगदी सगळंच्या सगळं डोळ्यांसमोर आत्ता घडल्यासारखं ताजं होतं. यावेळेला मात्र त्या क्षणांना दुःखाची किनार होती. 

अचानक तिची नजर समाधिस्थ अशा तानपुऱ्याकडे गेली. त्यालाही या बेसूर वेळेतला ताण जाणवला असेल का? तिचे मन अगदी ढवळून निघाले आणि काहीतरी महत्वाची गोष्ट आठवल्याचे भाव चेहऱ्यावर आले. उठून अचानक ती तानपुऱ्याकडे जाऊ लागली. कदाचित तहान लागली असावी असे वाटून शेजारच्या बाईंनी पाण्याचा ग्लास पुढे केला. पण तो नाकारून ती तानपुऱ्याजवळ आली. तानपुऱ्याच्या तारांवर हळुवार हात फिरवताना मनात सुरांच्या लाटा तिला बोलावणं धाडत होत्या. तिने मनात काहीतरी निर्धार केला आणि तानपुरा उचलून समोर ठेवला. एक पाय मुडपून तानपुरा कानाला लावून गायनाचा पवित्रा घेतला. 

तिच्यातला हा अचानक झालेला बदल पाहून, तेथील उपस्थित अचंबित झाले. दुःखाने हिला मानसिक धक्का तर नाही बसला? हीच काळजी सर्वांच्या चेहऱ्यावर उमटू लागली. एव्हाना त्या स्त्रीने सुरांचा अंदाज घेण्यासाठी डोळे मिटले होते. तानपुऱ्याची तार छेडत अलगद 'सा' लावला आणि जितक्या उत्कटतेने अश्रू येत होते, तितक्याच तन्मयतेने गळ्यातून आता पुढचे सूर मंद गतीने उमटू लागले. सुरांची मैफिल आलापामार्फत हळुवार पावलांनी त्या खोलीत प्रवेशत होती.

◆◆◆ ● ◆◆◆

“अय्या.. कसली भारी आहे हो ही जागा! कशी शोधून काढलीत ती?"

"शोधलं बाई पन्नास जणांना विचारून."

"मानलं पाहिजे बाबा माझ्या नवऱ्याला! मी काहीतरी वेडसर कल्पना मांडावी. अन काही दिवसात ती पूर्ण देखील व्हावी!“

चारुलता आणि जयंतच्या लग्नाचा आज वाढदिवस. चुटकीसरशी दहा वर्षे कुठे गुडूप झाली कळतही नव्हते. यावर्षी लग्नाचा वाढदिवस वृद्ध लोकांसमवेत साजरा करायचा हा चारूचा आग्रह होता. आपल्या जोडीदारासोबत आयुष्याची तीस-चाळीस तर कुणी पन्नास वर्षे व्यतीत केल्याचा प्रवास कसा असेल, त्यांचं नातं कसं असेल ही भावनाच तिला सतत ओढून घ्यायची. बायकोच्या डोक्यातल्या या अशा वेड्या कल्पना जयंतला खूप हव्याहव्याशा वाटत. खूपसे प्रयत्न करून, तिच्या कल्पनेप्रमाणे वाढदिवस करण्याजोगे एक ठिकाण त्याला शोधून सापडलेच.

पुण्यापासून जवळपास पन्नासएक किलोमीटरवर डोंगरालगतच्या गावात, आठ दहा एकर जागेत वसलेले 'हिरवळ'' नावाचे एक छोटेसे वृद्धाश्रम. प्रवेशद्वारावर रेखाटलेले टॉम आणि जेरीचे हसरे चेहरे पाहिल्यावर, 'आपण एखाद्या नर्सरी स्कुलमध्ये तर जात नाही ना?' हा प्रश्न पडावा. आत प्रवेश केल्यावर आपले बोट धरून आत नेण्यास मध्यम उंचीची फुललेली चाफ्याची झाडे तयारच होती. आत जाता जाताच वड, पिंपळ आणि अजून अनोळखी अशी ४-५ मोठाली झाडे प्रेमाने आपली सावली पसरून उभे होते. त्या ओथंबून आलेल्या हिरवाईने चारुला आपल्या आजोळची आठवण झाली. पुढे गेल्यावर दोन मजली डौलदार कौलारु वास्तू ध्यानस्थ बसल्यासारखी वाटली. डाव्या बाजूस एका जमिनीच्या तुकड्यात फळभाज्या आणि पालेभाज्यांचे वाफे होते. एक वृद्ध जोडपं वाफ्यातल्या वांग्याची तोडणी करून पाटीत ठेवत होते. वृद्धाश्रमाच्या अंगणात एक इवलेसे रेखीव तुळशी वृंदावन डेरेदार पिंपळाच्या पायाला मिठी मारून बसले होते. 

हे सर्व अनुभवत दोघांची पावले तिथे लहान मुलाच्या उत्सुक चालीने रेंगाळत राहिली. इतक्यात त्यांना छोटुशा केबिन मध्ये ग्रे टी-शर्ट घातलेला एक मुलगा काहीतरी लिहित असलेला दिसला. त्याच्याजवळ त्यांनी वृद्धाश्रमाविषयी आत्मीयतेने विचारपूस करण्यास सुरुवात केली. तो अगदी उत्साहात सांगू लागला, "नमस्कार.. मी सुधीर.. या “हिरवळ” चा संचालक. हे वृद्धाश्रम माझ्या आजोबांनी ३० वर्षांपूर्वी चालू केले. आजी आजोबांनी त्यांचा संसार याच घरात उभा केला पण नंतर बदली झाल्याने काही काळ ते पुण्यातच स्थायिक झाले. हार्ट ऍटॅकमुळे आजी अचानक हे जग सोडून गेली आणि आजोबांचे जगच एकटे पडले. एकटेपणात जगण्यापेक्षा त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन, आजीच्या आठवणींसोबत जगण्यासाठी आजोबा इकडे शिफ्ट झाले. आधी त्यांनी ही वनराई फुलवण्यात मन रमवले. त्यानंतर वृद्धाश्रमाच्या बहाण्याने इथे नवीन सवंगडीच गोळा केले. आजोबांना देवाज्ञा होऊन आता वीसेक वर्षे लोटली. त्यांनी सुरू केलेली हिरवळ आम्ही तशीच जपण्याचा प्रयत्न करतोय इतकेच."

चारूलतासमोर सगळे चित्र उभे राहिले, "ओहह.. आपल्या दुःखातून इतरांसाठी नंदनवन तयार केले त्यांनी.. " चारुलता.

इकडे तिकडे पाहत जयंतने विचारले.

"इथे काही पैंटिंग्ज आणि मूर्ती दिसल्या. कलेक्शन सुंदर आहे हो तुमचं."

 "अच्छा. ते होय? आमच्या मेम्बर्स नी बनवल्या आहेत. कसं असतं ना. प्रत्येक वृद्ध व्यक्तीच्या मनात, संसाराच्या ओढातानीत दबून गेलेले काही छंद असतात. आम्ही फक्त त्यांना ते जोपासण्यासाठी उद्युक्त करतो."

एवढ्या संवादात सुधीरशी त्यांची चांगलीच गट्टी जमली. इथे आल्यापासूनच दोघांच्याही डोळ्यात समाधान तरळत होते. इतकी वर्षे घराची जी व्याख्या त्यांच्या स्वप्नात रेंगाळत होती, ते घर अगदी जस्सेच्या तसे समोर होते. चारुलताला वाटले, की भरावी बॅग आणि यावे इकडेच रहायला. नंतर स्वतःच्याच विचारावर हसू आले कारण या “वृद्धा”श्रमात राहायला अजून कमीत कमी २५-३० वर्षे तरी वाट पहावी लागली असती. तोपर्यंत हे इथे असेल की नसेल हेही कुणाला ठाऊक?

दुपारी पिंपळाच्या सावलीत मस्तपैकी पंगत बसली. जेवणापेक्षा त्या सवंगड्यांच्या गप्पा आणि हास्यमैफिलच जास्त होती. वाऱ्याच्या लयीत डुलत, सळसळ आवाज करत पिंपळही त्या पंगतीतल्या हास्यात सामील झाला. एकमेकांना मारलेल्या कोपरखळ्या, दिलखुलास चेष्टामस्करी आणि अगदी के एल सेहगलपासून ते रफी, किशोर यांच्यापर्यंत संगीताचे विषय त्यांच्या बोलण्यात होते. त्या वातावरणात काहीतरी वेगळीच जादू होती. एरव्ही संकोचून मोजकेच हसणाऱ्या जयंतला आज खदाखदा हसताना पाहून चारूलता भलतीच सुखावली. जेवणानंतर तिथल्या स्त्रियांनी चारुला ठसकेबाज नऊवारी नेसवून, कुणी आपली बोरमाळ, कुणी लक्ष्मीहार तर कुणी आपली नथ घालायला लावून छान नटवले. जणू काही सर्वजणी स्वतःचे तारुण्य पुन्हा तिच्यात पाहत होत्या. ती बाहेर येताच मात्र जयंतीच्या हृदयाचा ठोका चुकला. आणि त्याची नजर काही त्या मुखवरून हटत नव्हती. लग्नाचा यंदाचा वाढदिवस इतका भन्नाट साजरा होईल हे दोघांना स्वप्नातही वाटले नव्हते. शेवटी दिवस संपताना आता तेथून पाऊल निघणार नव्हते. पण अवनी शाळेतून घरी येइपर्यंत पोहचायला हवे होते. येताना मला केक घेऊन या अतिवर आपल्या आई वडिलांना फिरायला होण्याची मुभा लेकीने दिली होती. तिथून निघायच्या आधी जयंत म्हणाला,

 "चारू, म्हातारपण दुसरं बालपण असतं हे यांच्यावरून खरं वाटतं बघ."

"हो ना. ऐका ना. माझ्या मनात अजून एक कल्पना आहे."

"हाहाहा.  तुझं मन शांत बसतं का कधी? काही ना काही नवीन चालूच असतं."

"बरं नाही सांगत. जा..."

"अगं गंमत केली. सांग सांग. तुझ्या कल्पनांना सत्यात आणण्यातच तर आयुष्य इतकं धमाल चाललंय."

"बरं.. ठिकेय सांगते. पण यावर तुम्ही खूप हसाल."

"सांग तरी.... किती वेळ लावतेस."

दोघेही चालत चालत बगिचामध्ये आले होते. हिरव्यागार गवतामध्ये छोटी छोटी रानफुलं उमलली होती. त्या रानफुलांसारखे ते दोघे तिथल्या बाकावर दोघे हातात हात घेऊन शांत बसले. जयंतच्या खूप आग्रहानंतर तिने आपली कल्पना मांडली. त्याला क्षणभर विश्वासच बसला नाही की हिची अशीही काही इच्छा असेल. त्याच्या मनातलीच भावना तिने व्यक्त केली होती.

                        ◆◆◆ ● ◆◆◆

झाकोळल्या खोलीत तानपुरा कंप पावत होता आणि बंदिश आकार घेत आता स्वर लयकारी मध्ये पोहोचले. तिथे असलेल्या सर्वांनी आजपर्यंत कित्येक मैफिलींचा आनंद घेतला होता. पण अशा नाजूक परिस्थितीत भावनेने ओथंबलेली कलाकृती कधी अनुभवली नव्हती. प्रसंग दुःखाचा आहे हे माहीत असूनही, ते सूरही दुर्लक्ष करता येणारे नव्हते. न राहवून सावंतांनी कॉटच्या शेजारी असलेला तबला घेतला आणि त्या गायनाला विलंबित तालात बांधण्याचा प्रयत्न करू लागले. 

                              ◆◆◆ ● ◆◆◆

पंचवीस वर्षांनंतरही हिरवळचा आत्मा आजिबात बदलला नव्हता. आजही इथे कलेला अनन्यसाधारण महत्व होते. मैत्री आणि हास्य हा इथला गाभा होता. जवळपास १५ पुरुष आणि १० स्त्रिया वृद्धत्व साजरे करत रहात होते. पिंपळाच्या आडून उगवणारा सूर्य पहात रम्य सकाळ व्हायची आणि शेकोटीकडेला होणाऱ्या गप्पाटप्पानी झोपायला मध्यरात्र व्हायची. 

इथले बरेचसे मेंबर्स काही ना काही कला जोपासत होते आणि ज्यांच्याकडे काही कला नाही ते रसिकाची भूमिका उत्तम पार पाडायचे. शशांक सावंत उत्तम तबला वाजवायचे. काटेकर काका सुंदर मूर्ती घडवायचे. हिरवळ मधल्या गणेशोत्सवामध्ये त्यांच्याच हातची गणेशमूर्ती असायची. खेडवळ अशा हौसामावशींना तर अन्नपूर्णा प्रसन्न होती. अस्सल गावरान तसेच हॉटेलमधले कित्येक नवनवीन पदार्थ त्यांच्या हातांना जमायचे. त्यांच्या हाताखाली दोन बायका देऊन, हिरवळचे स्वयंपाकघर त्यांच्या अखतारीत दिले होते. प्रत्येकाच्या पथ्यानुसार जेवण असले तरी त्यात एक मायेची गोडी असायची. ऐंशी वर्षांच्या लालचंदभाईंचे फॅशन स्टेटमेंटच वेगळे होते. नेहमी जीन्स टीशर्ट आणि स्टायलिश चष्म्यामध्ये दिसणारे लालचंदभाई झोपताना तरी साधे कपडे घालतात की नाही हा प्रश्न पडायचा. मरतेवेळी त्यांच्या पत्नीनेच त्यांना तरुणपणाचाच लालचंद शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याची सूचना केली होती. हृदयात तिच्या जाण्याची धग, तिच्याच सुचनेचे पालन करून विझवण्याचा प्रयत्न करत होते इतकेच. यशोदा मोडक पैंटिंग्ज करायच्या. त्यांच्या चित्रांत हिरवळमधील प्रत्येक झाडाचे पोर्ट्रेट करून झाले होते. हिरवळमधील भिंतीही त्यांच्या रंगांनी सजल्या होत्या. कित्येक कला महाविद्यालयाचे विद्यार्थी इथे भेट देऊन कलेविषयी एक वेगळाच दृष्टिकोन घेऊन जायचे. कारण जीवनाच्या सुर्यास्तात असणारे आकाश अगदी अचंबित करणारे रंग विखुरत होते. सर्वांच्या स्वभावातही व्यावहारीकतेपेक्षा भावनेचा धागा विणलेला असायचा. 

हल्ली सुधीररावांची तब्येत बरी नसल्याने ते पुण्यात थोरल्या मुलाकडे राहायचे आणि धाकटा मुलगा अमेय हिरवळची सगळी व्यवस्था उत्साहाने पहायचा. तो तर लहानपणापासूनच इथल्या सगळ्या म्हाताऱ्यांचा लाडका होता. औषधे आणि व्यायाम याबाबत तो इतका कडक असे की सगळेजण त्याला हिटलर म्हणत. तो ही हसत उत्तर द्यायचा, "तुम्हा म्हाताऱ्यांपेक्षा लहान मुलं परवडली हो. ती तरी एखाद्याचं व्यवस्थित ऐकतात." 

तेवढ्यात कुणीतरी आजी म्हणायची, "याचं लग्न करून दयायला हवं म्हणजे हा जरा शांत होईल आणि आपल्या मागे औषधं घेऊन फिरण्यापेक्षा तिच्या मागे मागे फिरेल." आणि तो ही मग थोडासा लाजराबुजरा व्हायचा. 

इथे आल्यापासून तर जयंतराव आणि चारूलता यांच्या आयुष्याने कातच टाकलेली. इतक्या वर्षांच्या दगदगीच्या आयुष्यात एकांताचे मोजकेच क्षण हाती आले होते. कित्येक शब्दांचे ढग दाटूनही न बरसताच आल्या वाटे परतायचे, पण आता त्या ढगांना नात्यातली शीतलता लाभून शब्द सरींसारखे कोसळत होते. दोघे तासंतास बोलत बसायचे, त्या नवीन मित्र मैत्रिणींमध्ये रमायचे.

"अहो. बघा ना दिवस कसे धावत पळत निघून जातात. आपल्याला 'हिरवळ' मध्ये राहायला येऊनच वर्षही झाले. बघता बघता माझा नवराही आता साठीत गेला." 

"आपणही पंचावन्न ओलांडले बाईसाहेब. चेहऱ्यावर वय दिसत नाही, ही गोष्ट वेगळी म्हणा. (काहीतरी आठवून) बरं ऐक सुहास आणि महेश पोहचतीलच आता. मी रियाजाच्या खोलीकडे जातो."

वयोमानामुळे जयंतरावांना आता मैफिलीमध्ये सादरीकरण करणे शक्य होत नव्हते. परंतू गायनाची तालीम घेण्यास पुण्याहून दोन विद्यार्थी यायचे. मैफिल नसल्याने त्यांच्या हाती आपली ओंजळ पूर्ण रीती करत होते. मागील पाच-सहा महिने हंसध्वनी रागाची तालीम सुरू होती. आज हंसध्वनी शिकवण्याचा शेवटचा दिवस होता. पुढच्या आठवड्यापासून जयंतरावांचा आवडता, मारवा राग सुरू होणार. आजची तालीम संपली आणि जयंतरावांना काहीतरी महत्वाचे सांगायचे राहून गेले असे वाटले.

"बाळांनो, संगीत तुम्हाला एकवेळ पोट भरायलाही आधार देईल पण अधिक उत्पन्न काढण्यासाठी बैलाला जुंपल्यासारखे सुरांना जुंपू नका. दिवसभराचा व्यवहार सुरू होण्याआधी, पहाटेच्या रियाजात संगीताशी आपलेपणाने संवाद साधा. प्रामाणिकपणे संवाद साधता साधता सुरांप्रती मनाला, वेड्या प्रेमाने शिवापुढे बैठक मारलेल्या नंदीची निष्ठा मिळू द्या. त्यापुढे संगीत आणि समाधीचे अनोखे मिलन तुम्हाला अनुभवायला मिळेल. हे अनुभवायची घाईही नको आणि ज्यावेळी जाणवेल तेव्हा वेळही दवडू नका. चला.. भेटू पुढच्या आठवड्यात."

**************

आज सुर्यास्तानंतर जयंतरावांनी मारवा रागाचा रियाज संपवला आणि बाहेर आले. चारूलता कुठे दिसतेय याचा कानोसा घेऊ लागले, तोच पिंपळामागून मारव्यातली तीच बंदिश कुणीतरी गुणगुणत असल्याचे ऐकू आले. बऱ्यापैकी सुरात होती आणि गायनही मनापासून होते. कोण गातेय हे पाहण्यासाठी पायऱ्या उतरून पिंपळाजवळ आले, तर चारू तुळशीजवळ निरंजन लावत होती.

"चारू.. तू गुणगुणत होतीस आत्ता?"

"नाही.. ही तुळस गुणगुणत असेल. तुम्ही पण काहीही प्रश्न विचारता."

"अगं किती सुरेख गात होतीस. पुढचं गाऊन दाखव बरं."

"अहो.. मला तेवढंच येतं. तेवढीच ओळ आणि त्यानंतरची तुम्ही घेता ती तान खूप आवडते. पण पुढचं आजिबात नाही येणार."

"चारू तू गाणं का शिकत नाहीस? इतकी वर्षे मला हे का जाणवले नाही कुणासठाऊक."

"गाणं? नाही बाबा. माझ्या आवाक्यातलं नाही ते. तुमचं गायन ऐकणं स्वप्नमय आहे, पण गायचं ठरवलं की सुरेल स्वप्नातून मी माझ्या बेसूर जगात परतते. मघाशी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सूर आणि समाधी याविषयी सांगत होता. ते खरंच तसं कुणी अनुभवू शकेल?  तुमच्या नुसत्या बोलण्यातून ती अनुभूती घ्यावी असे वाटून गेले. पण शिकायचे म्हटले की तो शिवधनुष्य वाटतो हो."

"चारू मी सांगितलेली ओळ न ओळ अनुभूतीची होती. जीव लावून शिकले तर कुणीही तिथंपर्यंत पोहोचू शकते. आज तू गुणगुणलेल्या ओळी नकळत का होईना सुरात होत्या."

"शिकवाल मला? मी माझा पूर्ण प्रयत्न करेन आत्मसात करण्याचा."

" का नाही? चारू इतकी वर्षे गाणं तू इतकं आपलंसं करून ऐकलंयस की ते आत रुजलंय. आता फक्त त्याला एक वळण दिले की छान फुलेल बघ. आता आपण तुझं गायन सुरू करतोय."

चारूलताचा फुललेला चेहरा निरंजनाच्या मंद उजेडाने टिपला. आजपर्यंत आवाक्याबाहेर समजलेली आवडीची गोष्ट आता आपण शिकणार ही उत्सुकता शिगेला पोहचली.

"पण माझ्याकडे शिकण्याचे नियम अगदी कडक असतील एवढं लक्षात घे."

"(थोडीशी हसत) आता गुरू बनवलेच आहे तर सगळं सहन तर करावे लागेल."

"बघ... पहाटे ५ ला तानपुरा तयार रहायला हवा. तुझं स्वरज्ञान करून घ्यायला हवं. एक एक सूर आणि राग पूर्ण तयार झाल्याशिवाय सुटका नाही."

"हो.. हो.. गुरुमहाशय.... घाबरवता की काय आता...?"

"घाबरवत नाही गं... संगीत शिकायला तेवढं झोकून देशीलच ही खात्री आहे. मुळात वयाच्या या वळणावर तुला पुन्हा शिकावं वाटतंय हीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर माझी नेहमीच एक सुप्त ईच्छा होती, की बायकोच्या आवाजात एखादी पूर्ण बंदिश ऐकावी. "

"अय्या खरंच? मग इतकी वर्षे बोलला नाहीत कसे?"

"बोलावं वाटायचं, पण असंही वाटायचं की ते उगीच तुझ्यावर लादल्यासारखी होईल."

"हो.. म्हणजे बायकोशी पण मन मोकळं करावं वाटलं नाही. काय हो तुम्ही. म्हणे लादल्या सारखं वाटेल.. असं काहीही विचार करता नेहमी तुम्ही.. नुसतं दुसऱ्याच्या मनाचा विचार करण्यात आयुष्य गेले.. अजूनही तसेच..."

"सॉरी..... पण आता ती संधी नाही दवडू देणार... उद्या गाण्याला सुरुवात करायची आहे. शिष्यत्व पत्करतेयस म्हणून किमान मला त्या नादाने तुला जरा दमात घेण्याची संधीतरी मिळेल. नाहीतर पूर्ण आयुष्य तुझे टोमणे ऐकत आणि डोळ्यांतून व्यक्त केलेला राग पाहत आलोय."

"(डोळे मोठे करून) खरंच जिभेला काही हाड? बारीक चेहरा करून असा आव आणायचा की एखाद्याला वाटेल की जगातला सगळ्यात गरीब माणूस हाच असेल. उगाच काहीतरी बोलायचं."

काही क्षण नुसतेच कोरे गेले आणि नंतर दोघांच्याही चेहऱ्यावर हसू फुटले. 

                        ◆◆◆ ● ◆◆◆
(एका वर्षापूर्वी)
जयंतराव आणि चारूलता, दोघेही गहन विचारात होते. आज त्यांनी पाहिलेल्या एका अनोख्या स्वप्नाचा निर्णायक क्षण आला होता. अवनीही आता तिच्या सासरी स्थिर स्थावर झाली होती. मागच्या महिन्यात जेव्हा त्यांनी अवनीला या निर्णयाबद्दल सांगितले तेव्हा तर ती अवाकच झाली. काही बोलवतच नव्हतं पुढे. ती असताना आईवडिलांनी वृद्धाश्रमात राहणे काही तिच्या बुद्धीला पटत नव्हते. इतकेच नव्हे तर तीचा नवराही आईबाबांना आपल्याकडे रहायला बोलवण्याच्या विचारांचा होता. जयंतरावांना मात्र तिला समजावता समजावता नाकी नऊ आले.

"अगं बच्चा. तू समजतेयस तसं नाहीये ते वृद्धाश्रम. आणि आम्ही काय कंटाळून किंवा निराधार आहे म्हणून नाही जात आहोत तिकडे." जयंतराव.

"बाबा, वृद्धाश्रमात काय हौस म्हणून जातात का? मी नाही तुम्हाला त्या अनोळखी लोकांत पाठवणार." अवनी.

"माझी बच्चू आता खरंच जाम रागावलेली दिसते. इकडं ये. माझ्याजवळ येऊन बस सगळं सांगतो, का जायचंय आम्हाला तिकडे."

अवनी लटक्या रागाने सोफ्यावर जयंतरावांच्या शेजारी बसली आणि हातात हात घेतला. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवुन प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. जयंतरावांनी त्यांच्या लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाच्या वेळेसची त्यांची "हिरवळ" वृद्धाश्रमातली भेट अगदी मन भूतकाळात हरवून कथन केली.

"अवू बाळा, त्या अगदी डोंगराच्या कुशीत, आणि कौलारु घरात आम्ही जेव्हा गेलो, त्याच वेळी आम्ही सुखावून गेलो होतो. तुझ्या आईने तर अगदी फिल्मी स्टाईल ने माझ्याकडून वचन घेतलं, की म्हातारपण इकडेच जगायचं. अगं या अनोळखी लोकांत आम्हाला नवीन सवंगडी शोधायचेत. त्यांच्या वेगवेगळ्या कलांमध्ये एक कल्पनेचा आविष्कार अनुभवायचा आहे. नवीन पाऊलवाटा आयुष्यात वेगळं काही दाखवण्याची शक्यता देतात. तीच ही एक पाऊलवाट. वाटल्यास असं समज की ही आमची ड्रीम लाईफ आहे."

"असं काहीतरी छान बोलून मला नेहमी हो म्हणायला लावता... पण पटलं तुमचं म्हणणं. याआधी गाण्यामधे तुम्ही बिझी असल्याने, तुम्हा दोघांना निवांत वेळ गवसलाच नाही ना. तुम्ही म्हणताय तसंच 'हिरवळ' सुरेख असेल तर मग माझी काही हरकत नाही. पण आधी मी येऊन सगळ्या सोई सुविधांची चौकशी करणार. नंतर पण आम्ही आलो तर चालेल ना अधून मधून तिथे..?"

"अगं. तुरुंग थोडीच आहे तो.. जेव्हा आठवण येईल तेव्हा यायचं तूम्ही दोघेही."

अवनीने होकार देताच दोघांनीही सुटकेचा श्वास सोडला. ही पोरगी एवढ्या सहजासहजी मानेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. जयंतराव म्हणाले, "चारू असं वाटतंय की जणू आपण लग्न करायला पळून चाललोय आणि सपोर्ट करण्यासाठी मी माझ्या आईलाच समजावतो आहे." दोघंही भरपूर हसले.

"हो ना... मग आता दुसऱ्या इनिंगसाठी तयार रहा मिस्टर जयंत. भारी वाटतंय मला.जसा चाळीस वर्षांपूर्वी मांडला होता, तसा नवा संसार आता मांडणार."

जयंतरावांचं लक्ष आता तिथे हजर नव्हते. ते तर कधीच हिरवळ मधल्या झाडांमध्ये लहान बाळाप्रमाणे बागडत होते. आणि आज बायकोच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचा एक एक कण मनात साठवून ठेवावासा त्यांना वाटला. चाळीस वर्षाच्या प्रवासानंतरसुद्धा ती अजून तशीच विलक्षण होती.

*************

(वर्तमान)
"हिरवळ"मध्ये येऊन आता यांना चार वर्षे झाली. चारुलताचे गायन वेग पकडत होतं. भूप, दुर्गा, यमन, बागेश्री या रागांशी ओळख झाली होती. तालाच्या आधाराने रागाचा संथपणे विस्तार करण्याचे कसब जयंतराव तिला बहाल करत होते. हिरवळमधील इतर सदस्य त्या नवरा बायकोचं नव्याने होऊ घातलेले गुरूशिष्याचे नाते कुतूहलाने पाहत होते. वयोमानाने तिला खाली मंद्र सप्तकात सूर आणताना अवघड जायचे, पण नेहमीच्या पट्टीतले सूर उत्तम लागत होते. 

काही दिवसांपासून जयंतरावांना पोटदुखीने घेरले होते. कधी पहाटे उठल्यावर किंवा जेवल्यानंतर लगेच सर्रकन कळ येऊ लागायची. पचनात बिघाड झाला असेल म्हणून सावंत सांगतील तसे घरगूती उपाय चालू होते. चारुलताला त्यांनी सांगितले नसले तरी तिला दोन-तीन वेळा दिसलेच. आणि मग तिने आपल्या गुरूला चांगलेच दमात घेतले.

"अहो पाच दिवस झाले, पोटात दुखतंय आणि मला न सांगता सावंतांचं ऐकून काही तरी घरगुती उपाय करत बसण्याची गरज आहे का? सावंत तबल्यावर उत्तम साथ करतात म्हणून काय आजारात डॉक्टर बनून साथ करणार का तुम्हाला. आज मी काही ऐकायची नाही. डॉक्टरकडे जाऊन येऊ आणि येत नसाल तर मग अमेयला सांगते."

"बाई, त्याला कशाला सांगतेस? एवढ्याश्या कारणासाठी तो आश्रम डोक्यावर घेईल आणि मग सावंताचंही काही खरं नाही."

अमेय त्यांच्या मागेच उभा होता. "काका मी इथेच आहे बरं! ऐकतोय सगळं. जर असं कुणी तब्येतीची हेळसांड करताना दिसलं तर मी आश्रम डोक्यावर घेणारच ना. ते काही नाही, आज काहीही करून दवाखान्यात जाऊन यायचे. मी थोड्या वेळात गाडी अरेंज करतो. अहो तुम्ही आजारी असल्यावर इथलं सुरेल वातावरण बिघडून जाईल की आणि सावंत काकांना किती वेळा समजावलं आहे की घरचा वैद्य बनू नका म्हणून पण अजिबात ऐकणार नाहीत. आता काकूंनाच सांगणे हीच त्यांची शिक्षा."

त्याचं बोलणं ऐकून दोघेही हसायला लागले. हसताना जयंतराव मात्र पोटातल्या तीव्र वेदना लपवू शकत नव्हते. 

पुण्यात डॉक्टरांकडे दाखवून आले. त्यांनीही बऱ्याच टेस्ट केल्या आणि आतड्याला थोडी सूज असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी सतर्कता म्हणून त्यांनी काही दिवस तरी रियाज टाळावा हेच सांगितले. इकडे जयंतरावांना चारूच्या गायनात काही खंड पडू द्यायचा नव्हता. 

"नाही गं. काहीतरी चुकतंय. पुन्हा घे बरं आलाप."

"अहो आता तिसऱ्यांदा घेतेय पण काय चुकलं ते तरी सांगा?"

"मारवा रागामध्ये मध्ये 'प' स्वर वर्ज्य असतो, मग तो येतोच कसा तुझ्या आलापामधे? रागाचा मूळ स्वभावच चुकवलास तर कसं होईल चारू? अजूनही अधेमधे  'रे' शुद्ध लागतोय. 'रे' कोमल हवा, हे सुद्धा चार वेळा सांगितले. तो वादी स्वर असल्याने तुझ्या रागविस्तारात तो वारंवार यायला हवा. त्याचवेळी त्याची हळूवारता तुझ्यात आणि मारव्यात भिनेल."

चारू काहीशी हताश झाली. 

"बरं... आता आणखी थोडा रियाज करते. पण का नाही हो जमत हे? सर्व नियम माहीत असताना, गाताना ती चुक लक्षातच येत नाही. माहीत नाही, का असं होतंय. तुमचा मारवा ऐकताना उत्कटततेपर्यंत पोहोचल्यासारखा वाटतो. मी मात्र तिथे पोहोचू शकत नाहीये."

"चारू.. आपलं मन जर गायनात उपस्थित नसेल तर गाणं मृगजळासमान भासतं. तू कितीही जवळ जाण्याचा प्रयत्न कर, ते तेवढीच पावले तुझ्यापासून दूर असेल. मला असं वाटतं की तूझं पूर्ण अवधानच गाण्यात नसते. माझ्या आजारपणाचा विचार करतेस हेही दिसतं मला. पण म्हणून तू गाण्याशी प्रतारणा नाही करू शकत. बालपणी, आपण खेळता खेळता कुठेही झोपलेलो असू, पण सकाळी जाग यायची ती आईच्या कुशीत! आईनं आपल्याला अलगद उचलून कधी घेतलं ते कळायचं देखील नाही. तसेच हे संगीत आहे. तू सगळं जग विसरून त्यात रम. मी किंवा तू आज किंवा उद्या जाणारच आहोत, मग कशाला फुकटची चिंता करतेस. मी जरी उद्या सोबत नसलो तरी संगीत जगण्याचे कारण बनेल."

चारुच्या डोळ्यात पाण्याची उपस्थिती जाणवू लागली. 

"करते मी प्रयत्न. नक्की."

"चारू. माझंही स्वप्न आहे की तुला भान विसरून मारवा गाताना पाहणं. सूर असे निघायला हवेत की क्षण स्तब्ध होतील. वाऱ्याचाही नाद सुरेल होईल आणि तुझ्या अलापाच्या लयीला साथ देईल. त्यात इतके झोकून दे, की एखाद्या मरणोन्मुख जीवात क्षणभर का होईना जान ओतावी त्या सुरांनी. आयुष्य कधीतरी संपणार होतंच, त्याची अजिबात भीती नाही. पण यावेळी....."

"थांबा... उगाच काहीबाही बोलू नका. काही नाही होत तुम्हाला. साधा अल्सर आहे. माझ्यासाठी तुम्ही अजून खूप वर्षे पाहिजे आहात."

"हे बघ मला मरणाचं दुःख किंवा भय नाहीये. डॉक्टर काही बोलत नसले तरी त्यांचा चेहरा सांगून गेला की त्यात काहीतरी किचकट प्रॉब्लेम आहे. उलट असं वाटतं, की ज्या माणसाला आपला शेवटचा दिवस कधी आहे याची कल्पना असते ना, तोच माणूस भारी आयुष्य जगू शकतो. आणि मी तेच करणार. मग तू ठरव, की मी अजून भरपूर जगेन या खोट्या आशेत नॉर्मल जीवन जगायचं, की मी कधीतरी जाणार आहेच या जाणिवेत माझ्यासोबत आयुष्यात राहून गेलेली सुरांची एकत्र सफर करायची."

चारूलता ने तानपुरा बाजूला ठेवला आणि जयंतरावांच्या बाजूला येऊन बसली. हातात हात दिला आणि आपला त्या सफरीला होकार कळवला.

"माझी विद्यार्थिनी मोठी आणि समजूतदार झाली म्हणायची आता."

"काहीतरीच काय?"

"अजून एक सांगू? मी गाण्यांच्या मैफिली करत जगभर फिरलो पण तुझ्याशी सुरांच्या गमती जमती शेअर करायला खास असा वेळच मिळायचा नाही. खूप दिवसातून घरी परतल्यामुळे पेंडिंग राहिलेले व्यवहारच पूर्ण करण्यात वेळ जायचा आणि मग तोपर्यंत पुढच्या कार्यक्रमाची आखणी झालेली असायची. तुझ्या वाट्याला नकळत मी व्यवहार आणि संसाराची पूर्ण जबाबदारी दिली ना गं."

"हो तर... पूर्ण जग तुमच्या मैफिलींचा अगदी समोरून आनंद घ्यायचे, मला मात्र कॅसेट वर ऐकावं लागायचं. हेवा वाटायचा त्या रसिकांचा. पण आता तर तुमचा प्रत्येक क्षण माझ्याजवळ आहे. याच्यापेक्षा काहीही नको मला. आता मात्र आता मी गाणं गाईन आणि तुम्ही रसिक व्हायचं. आतापासून हृदयाचा प्रत्येक कोपरा मी या सुरांच्या हवाले करते. एक सांगा. संगीतात तर कित्येक राग आहेत, पण तुम्हाला मारवा इतका का आवडतो?"

"किती बोलू या मारव्याबद्दल...तुला आता हे माहीत आहेच की संगीतात 'प' आणि 'सा' हे स्वर अचल असतात. शक्यतो हे दोन्ही स्वर कुठल्याच रागात वर्ज्य नसतो. फक्त मारव्यामध्ये 'प' वर्ज्य आणि 'सा' खूप कमी वापरला जातो. शास्त्रीय संगीताचा पूर्ण डोलारा हे 'प' आणि 'सा' सांभाळणारे हे स्वरच न जाणवल्यामुळे, मारवा राग अपूर्णतेचा स्पर्श घेऊनच जन्माला आलाय.  गायन झाले तरी 'हरवलेलं काहीतरी अजून गवसायचं आहे' याची जाणीव होते. ती पूर्ण करता करता गायक अजून गात राहतो आणि त्यात स्वतःलाच गवसतो.  मला गायकी येते, याचा अहंकार तो एखाद्या हट्टी मित्रासारखा जवळ बसून उतरवतो. पूर्ण गायकी कुर्बान या रागावर... "

चारुलताला तिचं आयुष्य काहीसं मारव्यासारखेच वाटले. त्यांच्या लग्नाची ४० वर्षे आनंदात जाऊन सुद्धा अजूनही काहीतरी शोधायचे राहूनच गेले होते. पण कुठेतरी तिलाच वाटलं, की खरं तर नात्यात अपूर्णता असणंच चांगलं. पूर्णत्व आलं की एकमेकांच्या चुका काढण्याशिवाय काही नावीन्य राहत नाही. अपूर्णता मात्र नात्याला काहीतरी उद्देश्य देत राहते."

"चारू... कुठं हरवलीस? काय विचार करतेयस?"

"अहो... मी कुठे. तुम्हीच हरवून गेलात मारव्याचा इतका अर्थ सांगताना. मला कळली आता या मारव्याची जादू. तुम्ही त्या रागाची फक्त पध्दतच नाही सांगितली तर तो का गावा यासाठी माझ्या आयुष्यात एक ध्येय दिलंत....  "

"आणि तुझं ध्येय पूर्ण व्हायची जीवापाड वाट पाहीन मी. ज्यादिवशी तुझ्या सुरेल मनावरची खिडकी उघडून पाहशील ना तेव्हा पलीकडे आपण एक झालेले दिसू तुला.  आपल्यात काहीच अंतर नसेल. असं गात रहा......"

चारुलता मात्र भरल्या मनामुळं काहीही बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यासमोर भरल्या पावलांनी सांज येत होती. पृथ्वी बिचारी झोपेच्या राज्यात प्रवेश करत असता, सूर्य आपली मिठी हळुवार सैल करत प्रस्थानाच्या तयारीत होता. 

                        ◆◆◆ ● ◆◆◆

दिवसेंदिवस जयंतरावांची तब्येत खालावतच चालली होती. काही दिवसांतच डॉक्टरांनी आतड्याचा कॅन्सरचे निदान केले. तोपर्यंत तो कॅन्सर आता वाव मिळेल तसा पसरत चालला होता. अवघडात अवघड तानही लीलया गाणारा हा गायक आज एकेक शब्द बोलताना वेदनांशी झुंजत होता. 

"चारू..... रियाज.... थोडाच वेळ करतेयस सध्या.... मला आवाज... येतो बर का.. तुला आधीच सांगितलं होतं की एकदा तानपुरा हातात घेतलास... की तू मलाच काय स्वतःलासुद्धा विसरून जायचं."

"अहो.... तुम्ही का बोलत राहता? पोटात दुखते ना बोलताना?"

"अगं... या वेदना म्हणजे, गाण्यात कधीतरी चुकारपणा किंवा आळस केला असेल त्याची शिक्षा आहे असं समजेन. आता कळतंय की सूर गळ्यातून येत नसतात. तर पोटातून येत असतात. पण तुझ्या रियाजाच्या आवाजाने खूप सुख वाटतं बघ. बडा ख्याल गाताना मात्र अजून सुरांच्या जागा चुकतात काही ठिकाणी.. पण शिकशील.. मला खात्री आहे.. आणि हो.. अवनीच्या होणाऱ्या बाळालाही संगीताचे धडे तूच द्यायचे. सुरात रडतं अगदी ते."

"नक्की देणार. पण आता झोपा ना. औषध काम करणार नाही मग."

चारुलताच्या मांडीवर त्यांचं डोकं टेकलं होतं आणि औषधांच्या गुंगीचे साम्राज्य शरीरभर पसरू लागले. खोलीत शांतता पसरली होती आणि कुठून तरी रेडिओवर लागलेली किशोरीताई आमोणकर यांची ठुमरी ऐकू येत होती.

चारुलताला अचानक जाणवले की जयंतरावांचा श्वास जड होऊ लागला आहे. काय करावे काही सुचेनासे झाले. अमेयला बोलवावे म्हणून पटकन बाहेर आल्या. अगदी वाऱ्याच्या वेगाने पळावे वाटत होते पण  पायातले अवसान गळून पडले होते. अमेयच्या केबिनपर्यंत पोहोचायला युगांचा वेळ लागत असल्यासारखे वाटले. त्यांना पळत येत असल्याचे पाहताच तोच पटकन बाहेर आला.

काही वेळातच डॉक्टर आणि गरज लागल्यास असावी म्हणून अँम्ब्यूलन्सही होती. पण जयंतरावांनी हॉस्पिटलमध्ये जायला स्पष्ट शब्दांत नकार दिला. काहीही झाले तरी आता जगून त्याच त्याच वेदना पुन्हा अनुभवायच्या नव्हत्या. संथ होत चाललेली नाडी पाहून डॉक्टरांनीही आग्रह केला नाही. जयंतरावांचे श्वास चालू ठेवण्याचे सोपस्कार देवावर सोपवण्याशिवाय उपाय नव्हता. आता फक्त परतीची वाट होती.

अँम्ब्यूलन्स आलेली पाहताच सगळ्यांनी जयंतरावांच्या खोलीकडे धाव घेतली. सगळे काळजीत होते. आजपर्यंत या वास्तूमधून त्यांनी बऱ्याच मित्रांना आयुष्यातून निरोप दिला होता आणि त्यातलेच अजून एक पान आज उलटत होते.

                        ◆◆◆ ● ◆◆◆

आज सुरांना अवचित जागा सापडत होती. चारुलताच्या गळ्यातून जणू हार्मोनियम आणि तानपुरा जीव हरपून गात होते. तिच्या हृदयाची स्पंदने आणि मारवा एकरूप झाले होते, कारण तिच्याही आयुष्यातुन एक अचल सूर शेवटचा श्वास घेत होता. 

"पिया~~~~ घर नही~~~~ आ~~~ये~~रे~~
मेरे~~~~~ पल~~ पल~~ छिने~~~ जाये ~~"

प्रत्येक शब्दात आणि आलापामध्ये जीवनाची चाळीस वर्षे उलगडत चालली होती. जलपर्णीने नदीला झाकोळून टाकावे, तश्या त्या आठवणी मनातल्या दुःखाला बंदिस्त करू पाहत होत्या. 

बडा ख्याल आता शेवटच्या तानेवर येऊन ठेपला. चारुलताच्या आवाजात एक धार आली. आज मुरकी, मिंड अशा हरकती सफाईदार येत होत्या. समाधिस्थ शिवाची वाट पाहत कित्येक युगे नंदीने द्वारावर बसून रहावे, असेच ते सूर ठेहराव घेऊन रेंगाळत होते.

एव्हाना सावंतांच्या तबल्यावरील ताल सुरांचे सांत्वन करू पाहत होता. तिथे उभे असलेल्या लोकांचे जीव कानात येऊन ठेपले होते. अवनीही धावत पळत आली आणि आईच्या गाण्याचा आवाज ऐकून भरल्या डोळ्यांनी दारातच थबकली. हवा जोरदार वाहू लागली आणि पावसाचे तुषारांनी अवेळी हजेरी लावली. चारुलताचा जीव आता कंठात आला होता. इतके सुरेल गाऊन तिच्या गुरूला आज ते कुठे ऐकू जाणार होते. तो तर रियाजाच्या बैठकीला शेवटचा नमस्कार घालून निघालाही असेल. कदाचित त्याचाही पाय निघत नसेल. 

अगदी काही सेकंदात ती बंदिश संपणार होती. पण त्या हवेत जे हरवत चालले होते ते मात्र तिला सापडत नव्हते. तिने शेवटची तान घेण्यासाठी सूर चढवला आणि तिची समाधी लागली. सगळं काही विस्मरण झाले, सगळे जग निरव झाले आणि त्याच क्षणी जयंतरावांच्या डोळ्यात एक चेतना आली. चारुकडे भरल्या डोळ्यांनी पाहिले. त्या डोळ्यातच एक प्रेमभरी हाक होती. चारुलता त्याच क्षणी गायची थांबली, आणि पूर्ण वातावरण अंधाराप्रमाणे निपचित झाले. तिचे मन अजूनही समाधिस्थ होते. इथले कटू सत्य पाहण्यासाठी त्याला परतूच वाटत नव्हते. इतक्यात तीव्र वेदनांशी झुंजत, अडखळत्या शब्दांनी जयंतराव शेवटचं एकच वाक्य बोलू शकले.

"शाब्बास चारू... शाब्बास... मारवा पूर्ण झाला... "

काही क्षणातच श्वासातला सूर अनंताच्या प्रवासात निघून गेला आणि चारुच्या आयुष्यातला "सोबत" हा अध्याय संपला.

©विशाल पोतदार

● ◆◆◆ ● ◆◆ समाप्त ◆◆ ● ◆◆◆ ●





Thursday, 18 October 2018

प्रेमाचा रंग सावळा.....


कथा शीर्षक – प्रेमाचा रंग सावळा

लेखक – विशाल पोतदार
गाव – कराड जिल्हा – सातारा
मोबाईल – 9730496245
इमेल ID – vishal6245@gmail.com

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथा -

आठ चाळीस मिनिटे झाली तरी अजून ऑफिसची बस यायचीच होती. नवरात्रीचा आज ऑरेंज रंग असल्यामुळे, स्टेशन आणि बस स्टॉपवर असलेली गर्दी फक्त ऑरेंजच दिसत होती. निशाला आज सगळ्या रंगांचाच तिटकारा वाटत होता. तसं पाहिलं तर, बस फक्त दहा मिनिटे लेट झाली होती तरी तिला एकेक क्षण एका तासासारखा वाटत होता. शेवटी गर्दीतून बसने एकदाचं तोंड दाखवलं. तिला जरा बरं वाटलं. बस मध्ये आधीच्या Stops वरून बसून येणाऱ्यापैकी सगळे हजर होते.

"अगं निशा, कालपर्यंत तर नवरात्रीच्या ठरवल्या रंगांचे ड्रेस घालत होतीस. मग आज का हा स्काय ब्लू ड्रेस घालून आलीयेस? ऑरेंज कलर आहे आज, माहीत आहे ना?" सुचेताने कमेंट केली.

निशाने नुसतीच मान डोलावली.

"निशा तो क्या यार! आऊट ऑफ लीग है. वोह तो कुछ अलग ही करती है...... नो ऑफेन्स हा निशा. जस्ट किडींग."  किंजल.

"इट्स ओके किंजल." निशाचा चेहरा मात्र तटस्थ.

खरं तर बसमधून ऑफिसला पोहचेपर्यंतचा एक तास तिचा सर्वात आवडता वेळ होता. कारण तिला प्रवासात वाचन करायला भन्नाट आवडायचे. आयुष्यातील बरीचशी पुस्तकं तिनं प्रवासातच वाचली होती. आणि शिवाय तिच्या ब्लॉगमधील कथा आणि लेखही प्रवासातच लिहायची. चौथ्या रांगेतली खिडकीशेजारची सीट जणू मागील 2 वर्ष तिच्या हक्काचीच होती. तिने लगेच वेळ न दवडता, बॅगमधून शिवाजी सावंतांच 'कांचणकन' पुस्तक बाहेर काढलं आणि वाचनात गर्क झाली.

खिडकीतून सहज बाहेर नजर टाकली आणि नेहमीप्रमाणे तिला जिकडे फेअरनेस क्रीमची जाहिरात दिसली. एक अस्वस्थ हसू तिच्या चेहऱ्यावर आले. जिकडे तिकडे रंगाचा उहापोह. कातडीचा रंग महत्वाचा? गोरं नसेल तर समाजातील स्थान शून्य असतं. सावळी मुलगी म्हणजे दोन नंबरचा माल.!! हो मालच ना. नाहीतर मग रंगावरून मुलाने ठरवलं नसतं की ही मुलगी पसंद करायची की नाही. निशाला पहिल्यापासूनच गोरेपणा आणणाऱ्या जाहिरातींचा तिटकारा होता. ठिकेय जाऊदे, 'जीस रास्ते जाना नही, उस राह नजर क्यू फिराये.' असं म्हणून तिने पुस्तकात डोकं खुपसले. पुस्तकच तिचा सोबती, पुस्तकच तिचा सखा, पुस्तकच वाटाड्या होता.

डेस्क वर येताच तिने लॉगिन करून कामाला सुरुवात ही केली. बाकी कलीग्जचे ऑरेंज डे चे सेल्फी काढणे सुरू झाले. तेवढ्यात तिच्या डेस्कच्या समोर आकाश दिसला. तो तिलाच हाक देत होता पण ती कामात हरवली होती. तिला तो दिसताच फक्त हसली आणि पुन्हा कामात गुंग झाली.

एकदाचा कसाबसा दिवस निभावून ऑफिसच्या बाहेर पडली, दिवसभर कॉम्पुटर मध्ये डोकं खुपसून कंटाळा आला होता. तेवढ्यात रिसेप्स्शनिस्ट बोट दाखवत म्हणाली, "निशा मॅडम, मघापासून तो मुलगा तुमची वाट पाहतोय. काय बरं नाव सांगितलं त्यांनी?? आय थिंक, Mr…. श्रेयस…."

"ओके.. भेटते मी त्यांना.."

तो मुलगा जरी ओळखीतला नसला तरी चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता. पण कुठे पाहिले ते आठवत नव्हते.

"हाय.. मी निशा.. तुम्ही माझा वेट करत होता? पण मी ओळखलं नाही तुम्हाला?"

"ओह हाय.. माझं नाव श्रेयस देशमुख. हो तुम्ही मला ओळखलं नसणारच. खरे तर, मधुकरकाकांनी माझ्यासाठी तुमचं स्थळ सुचवलं होतं."

ते नाव ऐकताच तिची चीड डोक्यापर्यंत गेली...

"ओह ओह ओह.. जस्ट वेट.. म्हणजे तुमच्याचकडून हा रिप्लाय आला होता की मुलीची पत्रीका जुळत नाही. आणि नंतर आमच्याच एका रीलेटिव्ह ला तुमचे कुणी काका म्हणाले की मुलगी रंगामध्ये दोन नंबर आहे, म्हणून पसंद नाहीजस्ट कान्ट बिलिव्ह तुम्ही इथं मला भेटायला आला आहात. अजून काही अपमान करायचा राहिलाय का?"

"झाल्या प्रकाराबाद्द्ल, आय एम रिअली सॉरी निशाजी. माझं थोडंसं ऐकून घ्या. मला त्याच विषयी गैरसमज दूर करायचा होता. आपण शेजारच्या कॅफे मध्ये बसायचं का थोडा वेळ. आय नो, तुम्ही ऑफिसमध्ये कंटाळला असाल, पण प्लिज, १० मिनिटे द्या मला."

त्याच्या मृदू बोलण्याने तिचा राग थोडासा मावळला. तरीही नाराजीतच म्हणाली,

"ठिकेय चालेल.. पण माझ्याकडे फक्त १०-१५ मिनिटे आहेत .."

" Thanks A Lot.... जास्त वेळ नाही घेणार मी.."

(कॅफे मध्ये )

"दोस्ता, दोन कॉफी दे रे.." श्रेयस.

"बरं, लवकर सांगा काय सांगायचं होतं तुम्हाला." निशा 

"मला श्रेयस म्हटलंत तरी चालेल. अहो, तुमच्या नातेवाईकांना तशी कमेंट दिली, ती माझ्या अतिउत्साही काकांनी. खरं तर मला ते अजिबात आवडलं नाही पण काकांकडून शब्द तर सुटले होते. मी काकांना पण बोललो तसं. माझं तत्व हे आहे की, कुठल्याही मुलीला तिचे विचार ऐकल्याशिवाय आणि व्यक्तिमत्त्व जाणल्याशिवाय हो किंवा नाही म्हणायचं नाही. नंतर मग सहज तुमचं फेसबुक प्रोफाइल पाहिलं आणि त्यातुन ब्लॉगला विझिट केली. तुझं लेखन इतकं अप्रतिम आहे, जीवनाचं, आयुष्याचं, मैत्रीचं आणि नात्याचं तत्वज्ञान खूप उच्चकोटीचं आहे. मग म्हटलं अरे यार या काकांच्यामुळे इतकी छान मुलगी जीवनात यायची संधी जायला नको. सॉरी, थोडा स्पष्टच बोललो आणि एकेरी हाक मारली. पण खरंच, तुझ्या लेखनाने तू वाचणाऱ्याला आपलंसं करून घेतेस. म्हणून म्हटलं, ठीकेय तु रागावलीस तरी चालेल पण सरळ जाऊन भेटावं."

"ओके, तर असं होतं सगळं. स्पष्टीकरण दिल्याबद्दल थँक्स श्रेयस. मला खरं तर खूप राग आलाच होता तो फीडबॅक ऐकून. पण माझ्यासारख्या सावळ्या मुलीला त्याची सवय करून घ्यावी लागते. जाऊदे. मघाशी मी तोच विचार करत होते याला कुठेतरी पाहिल्यासखे वाटतेय. तर तुझा फोटो पहिला होता. बाय द वे तू काय करतोस? आय मीन प्रोफेशन ?"

"माझं इथेच ठाण्यामध्ये बुक शॉप आहे. नावाजलेल्या भारतीय तसेच फॉरेन ऑथर्स ची पुस्तकं माझ्याकडे मिळतात. तसेच नवीन लेखकांच्या साहित्याला सुद्धा आम्ही चालना देतो. लवकरच अजून २  ब्रांचेस काढायचा विचार आहे. "

"Wow.. thats amazing…म्हणजे तुला वाचन आवडतं? "

"प्रचंड…"

"मस्तच….."

"मग भेटू शकतो आपण वरचेवर…? तुझी हरकत नसेल तर." श्रेयसने थोडे भीत भीतच विचारले.

ती हसली.. त्याला लगेच हो म्हणने पण योग्य वाटणार नाही.

"अंविचार करेन…."

"माझ्या शॉप मध्ये ये ना या विकेंड लाभावी लेखिका आमच्या शॉपमध्ये आल्या तर ती आमच्यासाठी भाग्याची बाब ठरेल…"

ती जोरात हसली… " चेष्टा…."

"नाही.. खरंच बोलतोय मी…"

"बर कॉफी पण संपली . निघुयात का? बाबा वाट पाहत असतील. भेटायचं नक्की सांगते मी."

"हो निघुया.. तुझ्या उत्तराची वाट पाहेन.. अगं पण तुझा फोन नंबर तरी दे..."

"हो... हे घे माझं विझिटिंग कार्ड.. चलो बाय... निघते मी ट्रेन मिस होईल नाहीतर..."

(शनिवार सकाळ)

"छान डिझाईन केलंय रे बुकशॉप. ते पुस्तकाच्या आकाराचं रॅक खूप छान दिसतंय." एखाद्या खेळण्यांच्या दुकानात लहान मुल ज्या उत्साहात हरवून जाईल, तशी निशाची अवस्था झाली होती.

"थँक्स. आपल्याला जे आवडतं त्या गोष्टी मध्ये करिअर केलं तर सगळ छानच होत. माझं लहानपणी स्वप्न होतं की मी पुस्तकांच्या दुकानात किंवा लायब्ररी मध्ये काम करेन, म्हणजे कायम पुस्तकं वाचता येतील. पण आता तर स्वतःच शॉप आहे. By the way तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे.. हे बघ…"

तिने ते गिफ्ट रॅप ओपन केलं.. " ओह माय गॉड… Gone With the Wind….? हे पुस्तक भेट द्यावं कसं वाटलं तुला? कित्ती वर्षांपासून माझ्या रिडींग विशलिस्ट मध्ये आहे. I Loved it.

"And I Love U……" तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला.

"व्हॉट? काय म्हणालास?"

"अगं या पुस्तकाबद्दल तू, फेसबुक वर एका कॉमेंट मध्ये तू ही तुझी विश् लिहिली होतीस. का गं तुला काय ऐकू आलं?"

"काही नाही. वेगळंच काही तरी…"

"निशा, मी आजपर्यंतच्या जेवढ्या माझ्या मैत्रिणी असतील किंवा लग्नासाठी जेवढ्या मुलींना भेटलो. फक्त तूच अशी आहेस की जिच्याशी मी हर्ट टू हर्ट कनेक्ट करू झालोय. हल्ली स्मार्ट, फॅशनेबल आणि मेकअप थापलेल्या मुली खूप भेटतात. पण तुझ्यासारखी जेवढी स्मार्ट तितकीच रसिक आणि हळुवार मनाची मुलगी एकमेवच. तु लिहिलेल्या कथांचा एक पात्र बनून राहिलो ना तरी मला भारी वाटेल. फक्त मला काहीही करून तुझ्याशी कनेक्ट व्हायचंय. माझ्याशी लग्न करशील…?."

ब्लॉग वर एवढे पटपट शब्द उतरवणारी ही पोरगी तर स्तब्ध झाली होती. तोंडातून शब्द फुटत नव्हता. तिच्या आयुष्यातल्या पुस्तकात हा प्रेमाचा chapter तिने कधीच गिरवला नव्हता. आणि तिला कुठला मुलगा प्रोपोज करेल हे दुरापास्तच होतं. नकळत तिच्या तोंडून शब्द गेले,

"श्रेयस चेष्टा करतोस का माझी. अरे तुझ्यासारखा इतका हँडसम आणि गोरा मुलगा मला प्रोपोज कसं करू शकतो?"

"निशा, मी चुकून पण अशी चेष्टा करणार नाही."

"अरे पण कुठल्या अँगलने मी तुझ्या योग्य वाटते? माझा रंग काळा आणि दिसायला पण तितकीशी छान नाही. तुला किती छान छान मुली मिळतील. "

"हे बघ, मला कुणी मॉडेलशी नाही लग्न करायचं की मी यासाठी रंग, सुंदरता, उंची इत्यादी गोष्टी पहाव्यात. आय जस्ट डोन्ट केअर अबाऊट धिज थिंग्ज. मला पांढरेशुभ्र विचार असणारी, समजूतदारपणा अगदी म्हाताऱ्या बाईसारखा तर निरागसता छोट्या मुलाईतकी असणारी मुलगी हवीय. आणि ती म्हणजे तूच."

"अरे पण तुझ्या घरच्यांच्या अपेक्षांचं काय? त्यांना चालेल अशी काळी मुलगी सून म्हणून? खरं तर आपल्या समाजात काळ्या रंगालाच मुळी अशुभ मानलं जातं. घरात बाळाच्या हाती गोरीपान बाहुली दिली जाते आणि काळी बाहुली घराबाहेर लटकवलेली असते. या नवरात्रीच्या नऊ रंगात सगळे रंग दिमाखात असतात पण काळा रंग? त्याचं अस्तित्व नसतं."

" नाही गं. आई बाबांना मी आपण भेटल्याचं सांगितलं आहे, आणि आई तर अगदी मला म्हणत होती की तुझ्या घरी डायरेक्ट फोन करण्यासाठी. पण मीच म्हटलं, आधी मला तुझं मत जाणून घ्यायचं होतं. बर आणि काळ्या रंगाचा तू उल्लेख केलास ना. माझा फेवरेट आहे तो. माझा विठ्ठल, कृष्ण आणि रखुमाई काळेच आहेत ना. त्यांना भेटायला आता भारतातल काय परदेशातील गोरे लोक पण येतात. प्रकाशाची उणीव म्हणजे काळा रंग असं मानतात. पण खरं तर काळ्या रंगात प्रकाशही ही सामावून जातो. कुठल्याच रंगात ही ताकद नसते की काळ्या रंगामध्ये जाऊन त्याचं अस्तित्व मिटवण्याची. त्यामुळं कदाचित पहिल्यापासून त्याला वाळीत टाकलं असेल. तुझं वाचन आणि लिखाणातील रुची हेच मला खूप आवडतं. आणि मलाही पुढे एका लेखिकेचा नवरा म्हणून मिरवायला जरूर आवडेल. डोन्ट वरी निशा. मला माहिती आहे की तुझं नुसतं असणं हे माझं आयुष्य फुलवून टाकेल. करशील ना माझ्याशी लग्न?"
त्याने तिचा हात हातात घेतला होता. तिचे डोळे पाणावले होते. ती किंचित पुस्तकाकडे पाहत होती. आयुष्यात पहिल्यांदाच तिला शरीराच्या सुंदरते पलीकडं जाऊन मनाचा ठाव घेणारा मुलगा पहिला होता.
"म्हणजे हो समजायचं का मी? आईला सांगू का तुझ्या घरी फोन करायला."

तिच्या चेहऱ्यावर वर विलक्षण चमक होती. आणि खूप गहिरी स्माईल होती.

"हो…."

"एक अपेक्षा होती मला मुलीच्या चेहऱ्याच्या बाबतीत."

"ती कुठली?"

"तिची स्माईल हळुवार हवेच्या झोकासारखी असावी, मनाला गारवा देणारी आणि ती पण सापडली."

ती छानशी लाजली आणि पुस्तकं पाहण्याचं नाटक करू लागली. त्याने आईला फोन लावला.

"आई, मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी पसंत आहेकदमांच्या घरी फोन लावू शकतेस…."

निशाने डोळे मोठे करून त्याच्यावर रागावण्याचं नाटक केलं. आणि तो मात्र हसत होता.

दोघांच्या जीवनाचं पुस्तक लिहायला इथे सुरवात झाली होती.

************ समाप्त*************

टीप- ही कथा काल्पनिक असली तरी खूप साऱ्या मुला मुलींच्या आयुष्याच्या जवळ जाणारी आहे. माणसात फक्त गोरा आणि काळा, किंवा सुंदर आणि कुरूप एवढाच फरक करणाऱ्या समाजाला थोडंसं तरी शहाणपण यावं ही सदिच्छा.





Saturday, 9 June 2018

मनातला पाऊस अन् पावसात भिजलेलं मन

अभय आणि अवंतिका सकाळीच घराबाहेर बाहेर पडून एका पाहुण्यांना भेटायला गेले होते. अभयला शनिवारी सुट्टी असली तरी, सतत ऑफिस चे कॉल्स चालूच होते. तो तर कंटाळला होताच पण तिलाही त्याचे सतत कॉल्स वर असणं नकोसं झालं होतं. आजकाल खूप टेन्शन मध्ये असायचा. आजही परिस्थिती काही वेगळी नव्हती. धकाधकीत लोकल ट्रेन चा प्रवास आणि त्यात गरमीचा तडका सहन करत दोघे घरी परतले होते. ती तर जाम कंटाळून गेली होती. स्टेशन वरून घरी येताना त्यानं तिला उचलूनच घरी आणलं तर बरं झालं असतं, हा विचार तिच्या मनात थोडा चमकून गेला होता. पण ती त्याला काही बोलली नव्हती, कारण ह्या वेडयाचं काही सांगता येत नाही. पटकन उचलून पण घेईल सुद्धा.

स्टेशन वरून घरी येताना मात्र, हवेचा नूर थोडा थोडा पालटायला लागला होता. आभाळ आलं होतं आणि सगळीकडं असा पिवळसर संधीप्रकाश पडला होता. लहानपणी एखादा प्लास्टिक चा पिवळा कागद सापडला की त्यातून बघितल्यावर जसं सगळं पिवळं पिवळं वाटायचं अगदी तस्संच. हवा पण अचानक गार यायला लागली. जणू काय भर उकड्यात, आपली समजूत काढण्यासाठी निसर्ग आपल्यावर फुंकर मारत होता. त्या पिवळ्या आकाशाच्या बॅकग्राऊंड मध्ये विजेचा भला मोठा टॉवर, विठ्ठलासारखं कमरेवर हात ठेवून उभा होता, त्याच्या खांद्यावरून विजेच्या तारा पुढच्या टॉवर वर गेल्या होत्या.

ह्या वातावरणात दोघंही थोडंसं सुखावूनच घरी पोहोचले. रो हाऊस असल्यामुळं घरी वारं म्हणून कधी यायचं नाही. आज बाहेर एवढं छान वारं सुटून पण, घरात मात्र गरम होत होतं. त्याला असं वाटलं की निसर्गाने मघाशी मारलेली हवेची फुंकर इकडे आत पण मारावी ना. पण नाही. परिस्थिती जैसे थे. अश्या वेळी पंख्याचं अस्तित्व महत्वाचं वाटतं. पण काही तरी बिघाड झाल्यामुळं त्याचा वेगच कमी झाला होता. त्याचं वारं त्याला स्वतःला तरी लागत होतं की नाही शंकाच.

ती आत किचन मध्ये गेली आणि हा पठठया बायकोची नजर नाहीये म्हटल्यावर मोबाईल मध्ये cricket ची game खेळायला लागला. 2 ओव्हर ची गेम झाली असेल तेवढ्यात ती बाहेर आली, आणि त्याने खेळत आडवा असलेला मोबाईल उभा करून मोबाईल वर गेम खेळत नसल्याचा आव आणला. आणि लगेच मोबाईल बाजूला ठेवला.

ती येऊन त्याच्या शेजारी बसली आणि त्याला हातांचा विळखा घालून खांद्यावर डोकं टेकवलं. त्याला लगेच कळालं की ही खूपच कंटाळलीय. त्यानं थोडंसं पुढं सरकून आपला खांदा आणखी खाली घेतला जेणेकरून तिला व्यवस्थित डोकं टेकवता यावं. दोघंही खिडकीकडे पाठ करून बसले होते. कधीकधी नवरा बायकोला संवादाची गरजच भासत नाही. एकांतात एकमेकांसोबत बसलं तरी प्रेम व्यक्त होतं. तिचे डोळे मिटलेले आणि डोकं त्याच्या छातीवर ठेवलेलं. त्याच्या हृदयाची स्पंदनं तिला ऐकू येत होती. त्याची नजर तिच्याकडे आणि हात तिच्या मऊशार केसांतून फिरत होता. बाहेरच्या जांभळ्या आभाळातली गूढ शांतता खोलीत पसरली होती.

तेवढ्यात त्याच्या मानेला थंड थंड तुषार जाणवू लागले. चमकलाच तो. पटकन मागे वळून खिडकीबाहेर पाहिलं तर चक्क पावसाचे टपोरे थेंब जमिनीवर सुईईंग करत येत होते. जणू काही खाली येण्यासाठी त्यांची रेस लागली होती. त्याच्या चेहऱ्यावर खूप छान स्माईल आली.

त्याने अवंती ला उठवलं, "अगं अवू हे बघ पाऊस आला..."

तीने एवढ्या कंटाळवाण्या मूड मधून पण हसून पाहिलं. खरंच या वर्षातील पहिल्या पावसाचे थेंब बरसायला लागले तर.

"अवू, चल लवकर पावसात भिजू.. पहिला पाऊस.. मस्त गार गार..."

"नाही रे.. अजिबात नाही.. माझे केस भिजतील.. पुन्हा सुकत नाहीत लवकर आणि मग सर्दी होते.. "

"नाही ग होणार सर्दी. काय केस सुकायचं टेन्शन? हेअर ड्रायरचं लोणचं घालायचय काय? कशाला मग व्हॉट्सअप वर एवढ्या पावसाच्या कविता पोस्ट्स पाठवत बसायचं. नुसता बोलचाच भात आणि बोलाचीच कढी?"

अवंतिका ने नाक मुरडलं, "ये, बस कर हा तुझं लेक्चर. तुला बरोबर कळतं माणसाला शब्दात पकडायचं. पण मी नाही येणार. कंटा~~~ळा  आलाय ना रे.."

"अगं वेडपट. पावसात कंटाळा जातो माणसांचा. नाही आलीस तर उचलून नेईन हं. हे बघ मी मोबाईल आणि पाकीट दोन्ही गोष्टी मी आता बाजूला ठेवल्यात."

हा मुद्दा मात्र बरोबर लागला. ती ही उठली आणि त्याच्या हातात हात गुंफून पावसात जायला तयार झाली. खरं पाहिलं तर पहिल्या पावसात भिजणं त्याच्यासाठी नवीन नव्हतं. पण या पावसात खास होतं म्हणजे ती. तिच्यासोबत चिंब पावसात भिजणं हे त्यानं लग्नापासूनच मनात ठरवून ठेवलं होतं. आज अनायासे पाऊस ही आहे आणि ती सुद्धा जवळ आहे.

पायऱ्या उतरून खाली चौकटी मध्ये आल्यावर ती, जाऊ का नको अशा पवित्र्यामध्ये नुसती उभीच राहिली. नुसता हात बाहेर काढून वळचणीतलं पाणी हातावर झेलू लागली. त्याने चटकन तिला बाहेर ढकललं. तिने मारण्यासाठी हात उगारला तेवढ्यात तो आत पळाला. ती कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे रागानं बघू लागली. तसा तो ही त्या पावसात आला. तिने पाठीत बुक्की मारायची ऍक्शन करताच तो पुढं पळाला.

"अगं सॉरी अवू. मज्जा केली. हा हा हा हा.."

तिने उगा उगाच मारल्यासारखं केलं आणि त्याला पटकन बिलगली.

"सांगेन तुला एकदा चांगलंच की मज्जा कशी करायची. कसा एवढा वेडा नवरा दिलास रे देवा?"

"हो. वेडा असणारच मी. एखादा शहाणा माणूस तुझ्याशी कसा लग्न करेन."

"ये.. जा बाबा... यासाठी बोलावलस का मला पावसात? वाद घालायला?"

तेवढ्यात तिला उमगलं की आपण त्याला मिठी मारलीय आणि चक्क घरासमोरच्या रस्त्यावर उभे आहोत. विजेच्या चपळाईने तीन मिठी सोडवली आणि त्याचा हात पकडला.

"बरं आता भिजलोयच आता तर चल मस्त फेरफटका मारून येऊ."

पावसाच्या सरीला पण त्यांचा तो रोमँटिक मुड घालवायचा नव्हता. सर बरसतच राहिली आणि तिला संगीताची साथ म्हणून वीज कडकडत होती. आता तर पूर्ण अंधार पसरला होता. पावसात भिजणारे हौशे गौशे च फक्त रस्त्यावर होते. भिजू न वाटणारे मात्र एखाद्या आडोशाला पाऊस जाण्याची वाट पाहत होते. किती विरोधाभास होता त्या दोन्ही प्रकारच्या लोकांत. एकाला पाऊस थांबुच नये तर दुसऱ्याला कधी एकदा थांबतो अशी इच्छा होती. त्या दोन व्यक्तीमध्ये अंतर तर जास्त नसतं. अंतर फक्त शरीराच्या आणि मनाच्या ओलेपणात असतं. पावसानं मन ओलं होतं का? असं म्हणतात की पावसानं मनातली किल्मिश पण निघून जातात. हे कुणा कवी किंवा लेखकाला माहीत असेल, तेच लिहितात ना पावसावर हजारो कविता आणि गोष्टी....

अभय आणि अवंतिका दोघेही पावसात मनमुराद भिजत ओली वाट तुडवत चालले होते. दोघांच्यात आत्ता संवाद काहीच नव्हता. एकमेकांचा ओला स्पर्श खूप काही सांगत होता आणि पावसाचे थेंब त्यांच्याशी गुज करत होते. अभयला लिहायला खूप आवडायचं, पण 1-2 वर्षे त्याचा तो छंदच तुटला होता. पण त्यामुळेच त्याची प्रत्येक गोष्टीची निरीक्षण करण्याची सवय होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पाणी भरून धावत होते आणि मध्येच कुठे नाल्याच्या ओपनिंग मधून गुडूप होत होते. अभयला याचं नवल वाटलं की एकाच पावसातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचं नशीब किती वेगवेगळ असतं. जमीन, झाडाचं पान, फुलाची पाकळी, नदी, समुद्र, एखाद्या व्यक्तीचं शरीर, देवाचं मंदिर असो किंवा गटार अशी प्रत्येकाची मंजिल ठरलेली असते. आपणही या पृथ्वीवरच्या 700 करोड थेंबापैकी आहोत. कुणी कुठे तर कुणी कुठे जन्म घेतो. फक्त आपल्याला नशीब बदलण्याची संधी मिळते हेच काय ते वेगळंपण.

एका घराबाहेर एक तरुण त्याच्या अवघ्या दीड दोन वर्षांच्या बाळाला घेऊन पावसात उभा होता. बाळाचा हट्ट पुरवण्यासाठी. त्या बाळा इतकं खुश त्या पावसात अभय ला कुणी दिसलं नाही. मला नाही वाटत की कुठला पालक मुलाला सुखानं पावसात भिजू देत असेल. आजारी पडेल म्हणून, गेलास तर बघ असं सुनावलं जातं.

पुढे काही शाळकरी मुलं पावसात ओरडत चालली होती. प्रत्येक दुकानांची काउंटर समोरची स्पेस पावसामुळं न भिजण्यासाठी थांबलेल्या लोकांनी भरलेली होती. अवंतिकाने एका दुकानाच्या वळचणीच्या लाकडा वर बावरून बसलेल्या कावळ्याकडं बोट दाखवलं. त्याला त्या कावळ्याची मजा पण वाटली आणि कीव पण वाटली. त्याची बायका पोरं घरट्यात त्याची वाट पाहत असतील. माणूस काय पावसात अडकला तर मोबाईल वर घरी सांगून देईल पण प्राणी पक्षांचं अवघड आहे.

अभयने अवंतिकाच्या खांद्यावर हात टाकला. तीही आपसूक त्याच्या आणखी जवळ आली. 

"अवू खरच पावसानं मन किती मोकळं मोकळं केलं माझं. रोजचं ते ऑफिस वर्क चं अरसिक जीणं. लॅपटॉप आणि फोन च्या जाळ्यात अडकलेलं माझं मन. पण आत्ता या 10 मिनिटात ते काही आठवलं पण नाही. कायम या पावसातच असावं असं वाटतंय."

अवंतिका ला खूप बरं वाटलं त्याला असं मनमोकळं बोलताना पाहून. अलीकडं अलीकडं तो कामाच्या प्रेशर मुळं खूप शांत राहायचा.

"मलाही आज या पावसात माझा अभय सापडला हे भारी वाटलं. तू आता पहिल्यासारखा लिहीत का नाहीस रे. तू लिहीत असलास ना, आत्ता पावसात भिजताना जेवढा आनंदी असतोस तेवढाच आनंदी असतोस."

"हो गं. मलाही तेच वाटलं. लिहिताना पण शब्दांचा पाऊसच पडत असतो. लेखकाचं मन भिजत असतं आणि त्याच्या मनाच्या वळचणीतून शब्द कागदावर सांडत असतात. नक्की लिहीन. पावसात भिजलेल्या तुझ्यासारखं. सुंदर आणि निरागस."

आता पाऊस कमी आला होता. आणि भिजल्यामुळं थोडी थंडी वाजत होती. रस्त्याच्या कडेला मांडलेल्या एका बाकड्यावर दोघे एकमेकांना चिकटून बसले. त्याला त्या वाहणाऱ्या पाण्यात कुणितरी सोडलेली कागदाची नाव दिसली. ती नावही वाहत वाहत एखाद्या नाल्यातच जाणार होती. तेवढ्यात एका छोट्या मुलीनं ती नाव उचलून एका डबक्यात ठेवली. त्याला खूप छान वाटलं. त्याचं आयुष्य म्हणजे ती नाव होती, ती मुलगी म्हणजे त्याची अवू आणि ते डबकं म्हणजे त्यांचा संसार. छोटा असला तरी कधीही सोडू न वाटणारा.


Saturday, 7 April 2018

सखी मंद झाल्या तारका...

प्रस्तावना--
ही कथा म्हणजे काळानुरूप झालेला प्रेमाच्या व्याख्येमधला बदल..  
ही कथा म्हणजे तीस वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या एका रात्रीची तुलना...
ही कथा म्हणजे, इतर संस्काराबरोबरच नवरा बायकोमधल्या अतूट प्रेमाचा संस्कार एका पिढीनं दुसऱ्या पिढीला द्यावा ही हाक आहे...

कथा ----

"सखी मंद झाल्या तारका.... आता तरी येशील का? येशील का??"

"अगं सखे येशील का आता?  इकडे चंद्र आता फुटलेल्या एका कौलामधून दिसायला लागलाय आणि चांदणी दुसऱ्या कौलामधून. पण इकडं माझी चांदणी शिवणकाम करत बसलेय. कसं व्हायचं? इकडच्या चंद्रानं चरफडत राहायचं का? ये लवकर झोपायला. 12 वाजत आले, पाय दुखतील सकाळी सकाळी त्या मशीन चे पायंडल मारून मारून."

इंदू गालातल्या गालात हसू लागली. दिवसभर शिवणकामाने पाय तर दुखायला लागलेच होते. तिलाही पटकन जाऊन शरदच्या मिठीत विलीन होऊन झोपावे वाटले. पण तिने मोह टाळला. आतूनच तिने पतीराजाच्या हाकेला उत्तर दिले.

"किती त्या कविता आणि किती ते सोज्वळ बोलणं. कुणी म्हणणार नाही, हे कविसाहेब कारकून म्हणून काम करतात. आले हो. एवढा एक झंपर शिवतेय, त्या बाईला उद्या सकाळी पाहिजे. टायमावर नाही दिला तर मग पुढच्या वेळी शेजारच्या सुनंदेकडं द्यायची शिवायला."

"किती काम करायला लागतं ग तुला. मी जर असा पायानं अधू आणि शिक्षणानं कमी नसतो तर काहीतरी चांगली मोठी नोकरी करून चांगले पैशे कमावले असते."

इंदू पटकन बाहेर आली, आणि तेही नाकावर लटका राग घेऊन."किती वेळा मी तुम्हाला एकच गोष्ट सांगायची. असं बोलायचं नाही. आज पण तसेच?"

"अं.. sorry sorry.. अगं कसं हे शब्द तोंडातुन बाहेर येतात हे शब्द कळतंच नाही. खूप प्रयत्न करतो, पण नेहमी नेहमी तो दुर्दैवी अपघात, त्याच्यामध्ये काळानं हिरावून नेलेले आप्पा, आणि माझा अपंग पाय आठवतो. तुला माहितीये? मला एक शिक्षक व्हायचं होतं. पण शिक्षणच मोजकं करू शकलो तिथं शिक्षक काय होणार?"

"नाही हो. असं नाही बोलायचं. तुमच्या कवितेची वही कुणी वाचली तर कुणी म्हणू शकेल का तुम्हाला किंवा तुमच्या मनाला अधू?? मला नाही येत एवढं तुमच्यासारखं चांगल्या चांगल्या शब्दात बोलायला. पण तुम्ही म्हणजे माझं सर्वकाही आहात. आणि तुमचा अपमान तुम्ही स्वतः केलात तरी आवडणार नाही."

"ठिकेय ठिकेय बाईसाहेब. आता असं निराश भाषा नाही बोलणार. पण तुझं शिवणकामाचं काम मध्येच राहिलं की. नाहीतर पुन्हा ती बाई तुझ्याकडं द्यायची नाही काम. कस्टमर जाईल ना तुझं?"

"मरू देत आता. तुम्ही म्हटलात ना चंद्र आणि चांदणी दिसतेय. कुठेय दाखवा बरं."

"हो दाखवतो ना. ये ना जरा जवळ, इथूनच दिसेल."

इंदू जवळ गेली आणि शरदच्या जवळ झोपली.

"कुठेय?"

"अगं इकडे, अजून इकडे."

इंदू अजून शरदच्या जवळ गेली. तिला त्या कौलामधून चंद्र आणि चांदणी तर दिसायला लागली. पण त्याच्या मिठीचा विळखा तिच्याभोवती पडला होता.

इंदू छान लाजली. आणि त्याची मिठी सोडवत रागावून म्हणाली,
"काय हो. तो चंद्र राहिला बाजूला पण हे असं काही तरी करायला काही तरी कारण काढता?"

"हम्मम्म.. एका परीने तुझं बरोबरच आहे. तुला जवळ घ्यावं म्हणून हे मन पन्नास कारणं शोधत असतं. पण तू ही फसतेसच ना. आणि माझी बायको आहेस, सगळ्यांच्या समोर देखील मिठी मारायला घाबरतो की काय?"

"इश्श.. काहीतरीच बोलायचं आपलं.. आणि कवीसाहेब काय करतील याचा नेम नाही."

लाजल्यानंतर तिचे झुकलेले डोळे आणि गालावर उमललेली खळी यावरून शरदची नजर तर हटायची नाही. आणि त्याची नजर हटत नाही हे उमजल्यानंतर इंदू पटकन उठली.

"असं काय बघत बसायचं वेड्यासारखं.? मी जाते शिवायला. झोपा तुम्ही तोपर्यंत. मी आलेच."

शरदने तिचा हात पकडून ठेवला. त्यापुढं मात्र तिचा काहीच उपाय चालला नाही. मुळात तिच्याही मनावर हा वेड्यासारखा वागणारा तिचा कवी नवरा राज्य करायचा. एकमेकांसोबत मिळणारा एखादा क्षण देखील खूप मोठ्या खजिन्यासारखा जपत होते दोघं.

शरदने अर्धवट राहिलेलं आपलं आवडतं गाणं गुणगुणायला आणखी सुरुवात केली.

"हृदया.....त आहे प्रीत अन, ओठांत आ~~हे गीत ही....
ते प्रेमगाणे छेडणा~~रा, सूर तू होशील का??"

इंदुनं स्वतःला शरदच्या स्वाधीन केलं. त्याच्या श्वासात श्वास आणि सुरात सूर मिसळला. आणि कधीपासून तिच्या ओठांवर असलेलं पण लज्जेमुळं  मनाच्या कुपीत सकाळपासून दडवलेलं गुपित तिनं त्याच्या कानामध्ये कुजबुजलं. शरदचा चेहरा खुलला आणि मिठीचा विळखा आणखी घट्ट केला.तिच्यापोटी दोघांच्या प्रेमाचं चिन्ह म्हणजे बाळ वाढत होत. पूर्ण रात्र तो गुणगुणत होता आणि ती ऐकत ऐकत मनात स्वप्न गिरवत होती.

                         ***************

"सखी मंद झाल्या तारका..
आता तरी येशील का...? येशील का....?"

सारंग ने लॅपटॉप मधून डोकं बाजूला घेऊन पाठीमागे बेडवर शांत पहुडलेल्या अदितीकडे हसत पाहिलं.

"अगं ते मेल सॉंग आहे, तू का म्हणतीयेस?"

आदिती ने निराश टोन मध्ये सुनावलं, " भावना सेम आहेत ना. त्या नायकाची सखी येत नाही लवकर, आणि इकडे माझा सखा घरी बसून ऑफिसचं काम करतोय. खूप दिवसातून हे गाणं ऐकलं रे. सकाळपासून मनात हेच गाणं वाजतंय आणि मी गुणगुणतेय. पण बघ आपल्या situation ला बरोबर जुळतंय."

"अगं थांब थांब. बोलू आपण. बॉस चा reminder ई-मेल आलाय. हा डेटा दिलाच पाहिजे आता."

सारंगचं लक्ष क्षणात बायको वरून लॅपटॉप मध्ये विलीन झालं. आदितीच्या मते, तिच्या मनातला बदाम राजा एक्सेल शीट आणि ई-मेल च्या राज्यातला जोकर झाला होता.

तिनं तोंड वळवून कुशी बदलली. का कुणास ठाऊक, अलगद डोळ्याच्या कडा पाणावल्या. तशी ती मिनिटा मिनिटाला किंवा छोट्याश्या गोष्टीनं रडणारी मुलगी नव्हती. पण या क्षणाला मात्र हुंदका आला. सकाळपासून ती या संध्याकाळची वाट पहात होती. सारंग ने जेव्हा ऑफिस मधून निघाल्यावर मेसेज केला त्यावेळी तर ती खूप सुखावली होती. तिला त्याच्याशी आज काही शेअर करायचं होतं. पण त्याच्या अचानक आलेल्या कामामुळं आता शक्य नव्हतं. तिनं डोळ्यातलं पाणी पुसलं.

"कॉफी घेणार का रे?"

"अं... नको..."

"बरं..."

बेडरूम मध्ये निरव शांतता होती. फक्त लॅपटॉप च्या कीज चा तेवढा आवाज येत होता. आजकाल अश्या रात्री वारंवार येत होत्या. आदितीच्या डोळ्यावर मात्र झोपेचा लवलेश ही नव्हता. ती उठून कॉफी बनवायला किचनमध्ये निघून गेली. कॉफी घेऊन येताना तिनं विचार केला की atleast गॅलरी मध्ये थांबावं. छान वारं सुटलं असेल. गॅलरीच्या जवळ जाताच तिला गाणं गुणगुणल्याचा आवाज ऐकू यायला लागला. तिने विचार केला, सासरे तर कधी रात्री 10 नंतर जागे नसतात. आवाज तर त्यांचाच येतोय. इतकी रात्र झाली, कसे काय जागे. पण का कुणास ठाऊक ते गॅलरी मध्ये असल्याने तिला खूप बरं वाटलं. थोडा वेळ दारापाशीच उभा राहून आवाज ऐकला. ते गायचे मधेच थांबले, आणि मागे वळून दाराकडे पाहिलं.

"अगं बाळा, अजून जागी तू? आणि हातात कॉफी मग?  काय बिनसलं की काय सारंग आणि तुझं? ये बरं इकडं."

आदितीचे वडील तिच्या लहानपणीच वारल्याने, ती तिच्या सासऱ्यांमध्ये वडिलांचं प्रेम शोधायची. मुळात ते होतेच खूप प्रेमळ. संगीत आणि वाचनाचे रसिक, काव्याची जाण. त्यांच्या कविता तर इतक्या रोमँटिक, की जणू ओळ आणि ओळ त्यांच्या पत्नीसाठीच लिहिलेय. काही कविता आयुष्याच्या अवघड क्षणांना सोपं करून देणाऱ्या होत्या. आदितीलाही त्यांनी स्वतःच्या मुलीवर जितकं प्रेम एका बापाचं असतं त्यापेक्षा वरचढच प्रेम दिलं होतं. तिच्या सासूबाई किंवा सारंग कधी तिच्यावर रागवले तर तिचा हक्काचा वकील, म्हणजे बाबा.

"अं... बाबा काही नाही हो. झोपच लागत नाहीये, सारंग.. सॉरी.. हे लॅपटॉप वर ऑफिस चं काम करतायत. म्हटलं छान वाऱ्यामध्ये उभं राहावं, म्हणून गॅलरी कडे आले. किती सुरेख म्हणत होतात गाणं, का थांबलात? आणि इतक्या वेळ का जागे आहात आज? माहितीये ना तुम्हाला पित्ताचा त्रास होतो मग सकाळी."

बाबांनी त्यांचा जाड फ्रेमचा चष्मा थोडासा ऍडजस्ट केला आणि आदितीकडे पाहून हसायला लागले.

"अगं हो.. हो... किती प्रश्न विचारशील. आणि सारंगचं नाव घेतलंस म्हणून मी काय रागावणार आहे का? तुझ्या सासूबाईंना आवडायचं नाही. तिला मी समजावून समजावून थकलो, अगं नवऱ्याला मित्र समजून नावाने हाक मारण्यात काय हरकत आहे."

अदिती छान लाजली, पण दुसऱ्या क्षणी सावरत बाबांना म्हणाली,

"बाबा तुम्ही म्हणजे पण ग्रेट आहात हा. वर्ल्ड'स बेस्ट सासरे उर्फ वडील असा पुरस्कार द्यायला हवा."

"हो हो द्या ना.... त्याबरोबर जर वर्ल्ड'स बेस्ट आजोबा असाही पुरस्कार पाहिजे मला."

आदितीला लगेच उमगलं नाही, पण जेव्हा त्यांच्या बोलण्याचा खरा अर्थ समजला तेव्हा मात्र तिला लाजेने दोन्ही हातामध्ये तोंड लपवावे लागले.

"पण आदिती बाळा, एक विचारू? खरं तर नवरा बायकोच्या भांडणात तिसऱ्याने पडू नये म्हणतात. पण तुम्हा दोघांचा सूर कुठेतरी बिनसल्यासारखा वाटतो का हल्ली? म्हणजे माझं चुकीचं असेल तर खूप चांगलं वाटेल मला. पण काहीही असेल तरी मला मनमोकळं सांग."

आदिती ला काय सांगावं यासाठी शब्दच सापडत नव्हते. ती कॉफी मग मध्ये राहिलेल्या घोटभर कॉफी कडे टक लावून पहात होती.

"बाबा, खरं तर आमचं भांडण वगैरे काही नाही. आणि असंही नाही की सारंग कुठे  चुकतोय. पण आमच्या नात्यात जी excitement होती, crazy प्रेम होतं ते कुठंतरी हरवल्यासारखं वाटतंय. सारंग कामात busy असल्यामुळं त्याला हे समजतं की नाही हे मला कळत नाहीये, आणि त्यामुळं माझा जीव खूपच घुसमटतो. आता आमच्या जीवनात luxury सगळ्या आहेत. सारंग ला चांगल्या पगाराची नोकरी, इतका पॉश फ्लॅट, गाडी हे पुरेसं नाही असं वाटतं आता. आम्ही कॉलेज ला असताना जेव्हा रिलेशन मध्ये होतो तेव्हा पैसे काहीच नव्हते आमच्याकडं पण दोघांचं प्रेम वस्तू आणि दिखाव्या पलीकडचं होतं. आम्ही तसे एकमेकांवर नाराज नाही किंवा तक्रार पण नाही. बाबा तुम्ही म्हणाल किती विचित्र आहे ही मुलगी बरोबर ना? म्हणजे तसं ऐकलं तर काही प्रॉब्लेम आहे असं वाटणार नाही."

ती गॅलरी च्या रेलिंगवरून खाली पाहत बोलत होती. तिचं मन गलबलून आलं होतं, तिसऱ्या मजल्यावरून खाली आसवांचे थेंब जमिनीपर्यंत पडताना तिला दिसत होते. बाबा तिच्या जवळ आले, आणि खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेतलं आणि तिला रडू दिलं.

"माझ्या पिला. नको रडू. कळलंय मला काय झालंय ते.  सगळं ठीक होईल, हे मी नक्की सांगतो. बघ म्हणजे तुमच्या पिढीतल्या लोकांसाठी आजच्या समाजाने प्रगतीच्या व्याख्याच बदलल्या आहेत. कुठल्याही लग्न झालेलं जोडपं जेवढ्या लवकर फ्लॅट, कार, फॉरेन टूर्स या गोष्टी achieve करेल ते जीवनात खूप सफल होत आहे असंच मानलं जातं. त्यात प्रेमाचं परिमाण गिफ्ट्स आणि सेलिब्रेशन वर मोजलं जातं. निखळ प्रेम, एकमेकांची काळजी, एकमेकांसाठीचा त्याग ह्या गोष्टी हळू हळू miss होतायत. मुळात ही तुमची चूक नाहीये, तर हा प्रवाहच तुम्हाला जबरदस्तीनं खेचतोय. मी सगळ्या म्हाताऱ्यांसारखा, 'आम्ही असे दिवस काढले, तुमच्यावेळी इतकं सगळं आहे' हे लेक्चर सांगणार नाही. पण मला एकच गोष्ट वाटते की, तुमचं राहणीमान गरीब असो की श्रीमंत, प्रेम हे अतुटच असलं पाहिजे. प्रेमात तडजोड नाही. तुझ्या हातातला कॉफी चा कप, खूप महागडा वाटतोय. पण कप खूप छान आहे म्हणून तू थंड किंवा बेचव कॉफी पिशील का? नाही ना? तुमचं प्रेम म्हणजे कॉफी आहे, ते कडक आणि गरमच पाहिजे. बर आत्ता तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला माझं एक ऐकशील?"

"हो बाबा. ऐकेन."

"पण थोडं वेड्यासारखं वागावं लागेल हं."

तिच्या चेहऱ्यावर फक्त प्रश्नचिन्ह होतं. बाबांनी तिला काय काय करायचं ते सांगितलं. आणि ते त्यांच्या बेडरूम मध्ये निघून गेले.

सारंग इकडे बेडरूम मध्ये अजून कामात मग्न होता. तो विचारच करत होता की ही नक्की एवढा वेळ बाहेरच्या खोलीत काय करतेय? तेवढ्यात गॅलरी च्या बाजूने जोरात ओरडल्याचा आवाज आला. आदितीचा आवाज होता तो. तो बाहेर धावला.

"आ आ... आई गं...."

सारंगच्या काळजात धस्स झालं. आदितीचा आवाज आणि तोही गॅलरी मधून म्हटल्यावर नको नको तो विचार त्याच्या मनात यायला लागला. पटकन उठून गॅलरी कडे पळाला. पाहतोय तो, आदिती गॅलरी मध्ये उभी होती. काही झालं नव्हतं, ती तर हसत होती पण डोळ्यात पाणी पण होतं. तोपर्यंत सारंगच्या हृदयाचा ठोका धड धड झाला होता. तिने असं मुद्दाम केलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर रागीट भाव निर्माण झाले. तो तिला रागावणार एवढ्यात ती पूर्ण सुराने तिच्या फेवरेट गाण्याची ओळ म्हणू लागली,

"बोलावल्यावाचून ही, मृत्यू जरी आला इथे~~~,
थांबेल तो ही पळभरी, पण सां~~~ग तू येशील का~~~? येशील का?"

सारंग ला कळून चुकलं की तिला काय म्हणायचं होतं. क्षणभर त्याला तर हेच वाटलं होतं की गॅलरी मधून ती खाली पडली तर नसेल. आयुष्यात कधीही कल्पना न केलेलाच धक्का त्याने आत्ता काही सेकंदापूर्वी कल्पला होता. त्यानं तर आवेगाने त्याच्या अदितीला मिठीत घेतलं. गालाची कपाळाची चुंबने घेतली. तिला तर हे त्यांच्या आयुष्यातलं हे सर्वोच्च प्रेम वाटत होतं. सारंग ला तिनं एवढं काळजी करताना कधीही पाहिलं नव्हतं. त्यांचं प्रेम आता आतुर आणि excitement चं राहिलं नव्हत तर ते काळजी, जबाबदारी दाखवणारं mature प्रेम झालं होतं. त्यानं हळूच तिच्या गालावर चापट मारली, "वेडी झालीस का ग? किती drama करायचा? की कॉलेज मधलं acting चं वेड अजून संपलं नाही?"

"हो रे... नॉर्मल आवाजात बोलावलं की तू नुसता ढिम्म सारखा हो म्हणतो. असं ओरडले की पळत येतोयस.. पण ह्या acting चे दिग्दर्शक मात्र कोणी वेगळेच आहेत."

"दिग्दर्शक? कोण?"

तिनं बाबांच्या बेडरूम चं दार वाजवलं. आणि बाबा बाहेर आले.

"हे आहेत दिग्दर्शक.... आणि माझे प्रिय मित्र... लव्हगुरु... काहीही म्हण... पण आता मात्र आपल्या होणाऱ्या बाळाचे आजोबा.."

शेवटचं वाक्य ऐकून बाबा आणि सारंग दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव तयार झाले. आणि काही क्षणात हास्यामध्ये रूपांतर झाले. दोघांनाही कळलं की आदिती आज का एवढी कासावीस होती त्याच्याशी शेअर करण्यासाठी..."

त्यानंतर तिघांनीही ती रात्र गप्पा मारण्यात आणि येणाऱ्या बाळाच्या स्वप्नात घालवली. बाबांना मात्र त्यांच्या इंदूची आणि फुटक्या कौलातून दिसणाऱ्या त्या चांदणीची आठवण येत होती. त्यांच्या मातीच्या घरामधल्या प्रेमाची जादू, या पोरांच्या काँक्रिट च्या घरट्यातसुद्धा सेम असावी ही मनोमन इच्छा व्यक्त केली.

कुठून तरी त्यांच्या कानात इंदूचा आवाज आला.

"अहो कविसाहेब.. असे बसलात काय.. पोरीची दृष्ट काढा आधी..."

त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. माझी सखी कधी दूर गेलीच नाही, माझ्याजवळच आहे....

"जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले....
तरी ही उणे काही उरे.... तू पूर्तता होशील का...?
सखी......................"





टीप --
कथेमध्ये वापरलेल्या गीताच्या ओळी, कथेची सुंदरता देण्यासाठी वापरल्या आहेत.
गीत : सखी मंद झाल्या तारका
गीतकार : सुधीर मोघे
संगीत : राम फाटक
गायक : सुधीर फडके