Automatic Size

Saturday, 9 June 2018

मनातला पाऊस अन् पावसात भिजलेलं मन

अभय आणि अवंतिका सकाळीच घराबाहेर बाहेर पडून एका पाहुण्यांना भेटायला गेले होते. अभयला शनिवारी सुट्टी असली तरी, सतत ऑफिस चे कॉल्स चालूच होते. तो तर कंटाळला होताच पण तिलाही त्याचे सतत कॉल्स वर असणं नकोसं झालं होतं. आजकाल खूप टेन्शन मध्ये असायचा. आजही परिस्थिती काही वेगळी नव्हती. धकाधकीत लोकल ट्रेन चा प्रवास आणि त्यात गरमीचा तडका सहन करत दोघे घरी परतले होते. ती तर जाम कंटाळून गेली होती. स्टेशन वरून घरी येताना त्यानं तिला उचलूनच घरी आणलं तर बरं झालं असतं, हा विचार तिच्या मनात थोडा चमकून गेला होता. पण ती त्याला काही बोलली नव्हती, कारण ह्या वेडयाचं काही सांगता येत नाही. पटकन उचलून पण घेईल सुद्धा.

स्टेशन वरून घरी येताना मात्र, हवेचा नूर थोडा थोडा पालटायला लागला होता. आभाळ आलं होतं आणि सगळीकडं असा पिवळसर संधीप्रकाश पडला होता. लहानपणी एखादा प्लास्टिक चा पिवळा कागद सापडला की त्यातून बघितल्यावर जसं सगळं पिवळं पिवळं वाटायचं अगदी तस्संच. हवा पण अचानक गार यायला लागली. जणू काय भर उकड्यात, आपली समजूत काढण्यासाठी निसर्ग आपल्यावर फुंकर मारत होता. त्या पिवळ्या आकाशाच्या बॅकग्राऊंड मध्ये विजेचा भला मोठा टॉवर, विठ्ठलासारखं कमरेवर हात ठेवून उभा होता, त्याच्या खांद्यावरून विजेच्या तारा पुढच्या टॉवर वर गेल्या होत्या.

ह्या वातावरणात दोघंही थोडंसं सुखावूनच घरी पोहोचले. रो हाऊस असल्यामुळं घरी वारं म्हणून कधी यायचं नाही. आज बाहेर एवढं छान वारं सुटून पण, घरात मात्र गरम होत होतं. त्याला असं वाटलं की निसर्गाने मघाशी मारलेली हवेची फुंकर इकडे आत पण मारावी ना. पण नाही. परिस्थिती जैसे थे. अश्या वेळी पंख्याचं अस्तित्व महत्वाचं वाटतं. पण काही तरी बिघाड झाल्यामुळं त्याचा वेगच कमी झाला होता. त्याचं वारं त्याला स्वतःला तरी लागत होतं की नाही शंकाच.

ती आत किचन मध्ये गेली आणि हा पठठया बायकोची नजर नाहीये म्हटल्यावर मोबाईल मध्ये cricket ची game खेळायला लागला. 2 ओव्हर ची गेम झाली असेल तेवढ्यात ती बाहेर आली, आणि त्याने खेळत आडवा असलेला मोबाईल उभा करून मोबाईल वर गेम खेळत नसल्याचा आव आणला. आणि लगेच मोबाईल बाजूला ठेवला.

ती येऊन त्याच्या शेजारी बसली आणि त्याला हातांचा विळखा घालून खांद्यावर डोकं टेकवलं. त्याला लगेच कळालं की ही खूपच कंटाळलीय. त्यानं थोडंसं पुढं सरकून आपला खांदा आणखी खाली घेतला जेणेकरून तिला व्यवस्थित डोकं टेकवता यावं. दोघंही खिडकीकडे पाठ करून बसले होते. कधीकधी नवरा बायकोला संवादाची गरजच भासत नाही. एकांतात एकमेकांसोबत बसलं तरी प्रेम व्यक्त होतं. तिचे डोळे मिटलेले आणि डोकं त्याच्या छातीवर ठेवलेलं. त्याच्या हृदयाची स्पंदनं तिला ऐकू येत होती. त्याची नजर तिच्याकडे आणि हात तिच्या मऊशार केसांतून फिरत होता. बाहेरच्या जांभळ्या आभाळातली गूढ शांतता खोलीत पसरली होती.

तेवढ्यात त्याच्या मानेला थंड थंड तुषार जाणवू लागले. चमकलाच तो. पटकन मागे वळून खिडकीबाहेर पाहिलं तर चक्क पावसाचे टपोरे थेंब जमिनीवर सुईईंग करत येत होते. जणू काही खाली येण्यासाठी त्यांची रेस लागली होती. त्याच्या चेहऱ्यावर खूप छान स्माईल आली.

त्याने अवंती ला उठवलं, "अगं अवू हे बघ पाऊस आला..."

तीने एवढ्या कंटाळवाण्या मूड मधून पण हसून पाहिलं. खरंच या वर्षातील पहिल्या पावसाचे थेंब बरसायला लागले तर.

"अवू, चल लवकर पावसात भिजू.. पहिला पाऊस.. मस्त गार गार..."

"नाही रे.. अजिबात नाही.. माझे केस भिजतील.. पुन्हा सुकत नाहीत लवकर आणि मग सर्दी होते.. "

"नाही ग होणार सर्दी. काय केस सुकायचं टेन्शन? हेअर ड्रायरचं लोणचं घालायचय काय? कशाला मग व्हॉट्सअप वर एवढ्या पावसाच्या कविता पोस्ट्स पाठवत बसायचं. नुसता बोलचाच भात आणि बोलाचीच कढी?"

अवंतिका ने नाक मुरडलं, "ये, बस कर हा तुझं लेक्चर. तुला बरोबर कळतं माणसाला शब्दात पकडायचं. पण मी नाही येणार. कंटा~~~ळा  आलाय ना रे.."

"अगं वेडपट. पावसात कंटाळा जातो माणसांचा. नाही आलीस तर उचलून नेईन हं. हे बघ मी मोबाईल आणि पाकीट दोन्ही गोष्टी मी आता बाजूला ठेवल्यात."

हा मुद्दा मात्र बरोबर लागला. ती ही उठली आणि त्याच्या हातात हात गुंफून पावसात जायला तयार झाली. खरं पाहिलं तर पहिल्या पावसात भिजणं त्याच्यासाठी नवीन नव्हतं. पण या पावसात खास होतं म्हणजे ती. तिच्यासोबत चिंब पावसात भिजणं हे त्यानं लग्नापासूनच मनात ठरवून ठेवलं होतं. आज अनायासे पाऊस ही आहे आणि ती सुद्धा जवळ आहे.

पायऱ्या उतरून खाली चौकटी मध्ये आल्यावर ती, जाऊ का नको अशा पवित्र्यामध्ये नुसती उभीच राहिली. नुसता हात बाहेर काढून वळचणीतलं पाणी हातावर झेलू लागली. त्याने चटकन तिला बाहेर ढकललं. तिने मारण्यासाठी हात उगारला तेवढ्यात तो आत पळाला. ती कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे रागानं बघू लागली. तसा तो ही त्या पावसात आला. तिने पाठीत बुक्की मारायची ऍक्शन करताच तो पुढं पळाला.

"अगं सॉरी अवू. मज्जा केली. हा हा हा हा.."

तिने उगा उगाच मारल्यासारखं केलं आणि त्याला पटकन बिलगली.

"सांगेन तुला एकदा चांगलंच की मज्जा कशी करायची. कसा एवढा वेडा नवरा दिलास रे देवा?"

"हो. वेडा असणारच मी. एखादा शहाणा माणूस तुझ्याशी कसा लग्न करेन."

"ये.. जा बाबा... यासाठी बोलावलस का मला पावसात? वाद घालायला?"

तेवढ्यात तिला उमगलं की आपण त्याला मिठी मारलीय आणि चक्क घरासमोरच्या रस्त्यावर उभे आहोत. विजेच्या चपळाईने तीन मिठी सोडवली आणि त्याचा हात पकडला.

"बरं आता भिजलोयच आता तर चल मस्त फेरफटका मारून येऊ."

पावसाच्या सरीला पण त्यांचा तो रोमँटिक मुड घालवायचा नव्हता. सर बरसतच राहिली आणि तिला संगीताची साथ म्हणून वीज कडकडत होती. आता तर पूर्ण अंधार पसरला होता. पावसात भिजणारे हौशे गौशे च फक्त रस्त्यावर होते. भिजू न वाटणारे मात्र एखाद्या आडोशाला पाऊस जाण्याची वाट पाहत होते. किती विरोधाभास होता त्या दोन्ही प्रकारच्या लोकांत. एकाला पाऊस थांबुच नये तर दुसऱ्याला कधी एकदा थांबतो अशी इच्छा होती. त्या दोन व्यक्तीमध्ये अंतर तर जास्त नसतं. अंतर फक्त शरीराच्या आणि मनाच्या ओलेपणात असतं. पावसानं मन ओलं होतं का? असं म्हणतात की पावसानं मनातली किल्मिश पण निघून जातात. हे कुणा कवी किंवा लेखकाला माहीत असेल, तेच लिहितात ना पावसावर हजारो कविता आणि गोष्टी....

अभय आणि अवंतिका दोघेही पावसात मनमुराद भिजत ओली वाट तुडवत चालले होते. दोघांच्यात आत्ता संवाद काहीच नव्हता. एकमेकांचा ओला स्पर्श खूप काही सांगत होता आणि पावसाचे थेंब त्यांच्याशी गुज करत होते. अभयला लिहायला खूप आवडायचं, पण 1-2 वर्षे त्याचा तो छंदच तुटला होता. पण त्यामुळेच त्याची प्रत्येक गोष्टीची निरीक्षण करण्याची सवय होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पाणी भरून धावत होते आणि मध्येच कुठे नाल्याच्या ओपनिंग मधून गुडूप होत होते. अभयला याचं नवल वाटलं की एकाच पावसातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचं नशीब किती वेगवेगळ असतं. जमीन, झाडाचं पान, फुलाची पाकळी, नदी, समुद्र, एखाद्या व्यक्तीचं शरीर, देवाचं मंदिर असो किंवा गटार अशी प्रत्येकाची मंजिल ठरलेली असते. आपणही या पृथ्वीवरच्या 700 करोड थेंबापैकी आहोत. कुणी कुठे तर कुणी कुठे जन्म घेतो. फक्त आपल्याला नशीब बदलण्याची संधी मिळते हेच काय ते वेगळंपण.

एका घराबाहेर एक तरुण त्याच्या अवघ्या दीड दोन वर्षांच्या बाळाला घेऊन पावसात उभा होता. बाळाचा हट्ट पुरवण्यासाठी. त्या बाळा इतकं खुश त्या पावसात अभय ला कुणी दिसलं नाही. मला नाही वाटत की कुठला पालक मुलाला सुखानं पावसात भिजू देत असेल. आजारी पडेल म्हणून, गेलास तर बघ असं सुनावलं जातं.

पुढे काही शाळकरी मुलं पावसात ओरडत चालली होती. प्रत्येक दुकानांची काउंटर समोरची स्पेस पावसामुळं न भिजण्यासाठी थांबलेल्या लोकांनी भरलेली होती. अवंतिकाने एका दुकानाच्या वळचणीच्या लाकडा वर बावरून बसलेल्या कावळ्याकडं बोट दाखवलं. त्याला त्या कावळ्याची मजा पण वाटली आणि कीव पण वाटली. त्याची बायका पोरं घरट्यात त्याची वाट पाहत असतील. माणूस काय पावसात अडकला तर मोबाईल वर घरी सांगून देईल पण प्राणी पक्षांचं अवघड आहे.

अभयने अवंतिकाच्या खांद्यावर हात टाकला. तीही आपसूक त्याच्या आणखी जवळ आली. 

"अवू खरच पावसानं मन किती मोकळं मोकळं केलं माझं. रोजचं ते ऑफिस वर्क चं अरसिक जीणं. लॅपटॉप आणि फोन च्या जाळ्यात अडकलेलं माझं मन. पण आत्ता या 10 मिनिटात ते काही आठवलं पण नाही. कायम या पावसातच असावं असं वाटतंय."

अवंतिका ला खूप बरं वाटलं त्याला असं मनमोकळं बोलताना पाहून. अलीकडं अलीकडं तो कामाच्या प्रेशर मुळं खूप शांत राहायचा.

"मलाही आज या पावसात माझा अभय सापडला हे भारी वाटलं. तू आता पहिल्यासारखा लिहीत का नाहीस रे. तू लिहीत असलास ना, आत्ता पावसात भिजताना जेवढा आनंदी असतोस तेवढाच आनंदी असतोस."

"हो गं. मलाही तेच वाटलं. लिहिताना पण शब्दांचा पाऊसच पडत असतो. लेखकाचं मन भिजत असतं आणि त्याच्या मनाच्या वळचणीतून शब्द कागदावर सांडत असतात. नक्की लिहीन. पावसात भिजलेल्या तुझ्यासारखं. सुंदर आणि निरागस."

आता पाऊस कमी आला होता. आणि भिजल्यामुळं थोडी थंडी वाजत होती. रस्त्याच्या कडेला मांडलेल्या एका बाकड्यावर दोघे एकमेकांना चिकटून बसले. त्याला त्या वाहणाऱ्या पाण्यात कुणितरी सोडलेली कागदाची नाव दिसली. ती नावही वाहत वाहत एखाद्या नाल्यातच जाणार होती. तेवढ्यात एका छोट्या मुलीनं ती नाव उचलून एका डबक्यात ठेवली. त्याला खूप छान वाटलं. त्याचं आयुष्य म्हणजे ती नाव होती, ती मुलगी म्हणजे त्याची अवू आणि ते डबकं म्हणजे त्यांचा संसार. छोटा असला तरी कधीही सोडू न वाटणारा.