.post img {

Friday, 25 January 2019

पालवीहीन वृक्ष (लघुकथा)

आज तीन महिने झाले तो या जंगलात चालतोय. या वेड्या प्रवासात बऱ्याचश्या पायवाटा तुडवल्या, हिरव्या गालिच्यावर झोपला, गर्द सावलीत विसावला होता. उन्हाचा बदलता स्वभाव अगदी जवळून अनुभवला होता. पण आता तर फक्त पालवीहीन वृक्ष आणि त्या वृक्षांना मिठी मारलेल्या वेली दिसत होत्या. 
वेलींची घट्ट मिठी पाहून, त्याला फक्त 'ती' आठवली. ती सुद्धा अशीच घट्ट बिलगायची, अगदी थोड्या वेळासाठीही तिला सोडून न जाण्यासाठी याचना करायची.

त्याने वापरून जुना झालेला तंबू ठोकला. तंबूतल्या सावलीत जरा बरं वाटलं. तसेही, याआधी थोड्याश्या थंडी वाऱ्यात आजारी पाडणारा तो, आजकाल एवढ्या टोकाच्या वातावरणात टिकून होता. त्याने पाठ टेकवली आणि तिच्या पुस्तकाचा ड्राफ्ट वाचायला घेतला. तीन महिने त्याचं धाडसच झालं नव्हतं ड्राफ्ट उघडण्याचं. पहिलंच पान पाहिलं आणि डोळे पाणावले. तिचे शब्द म्हणजे पाण्याने भरलेले जांभळे ढग होते. पाण्याविना भेगाळलेल्या जमिनीवर त्या ढगातले चार थेंब पडावेत आणि वखवखलेल्या भूमीच्या कणाकणात मिसळून जावे तसे तिचे शब्द त्याच्या मनात सामावत होते.

पुस्तकाची प्रस्तावना अशी होती.

"
हे पुस्तक तुझ्या सोबतच्या प्रत्येक क्षणाला अर्पण..

"तुझ्याच प्रत्येक क्षणात माझा कण कण असेल..
तुझ्या हर्षात माझं हसणं असेल..
तुझ्या दुःखात माझं रडणं असेल..
माझ्याशिवाय हे आयुष्य फुलव..
रण रणत्या उन्हात देखील मी तुझ्या मिठीत असेन.."
"

आयुष्यातल्या शेवटच्या काही क्षण आधी तिनं त्याच्या हातात या पुस्तकाचा ड्राफ्ट सोपवला होता. सहा महिन्यांच्या तिच्या आजारपणात अगदी हाताच्या फोडाईतकी जपणूक केली होती तिची. शेवटी तीच्या जाण्यानं त्याची अवस्था पानझडीने काष्ठ झालेल्या झाडासारखी झाली होती.  त्याला बिलगणारी वेल तर त्याच्या आधीच निघून गेली होती. या दुःखातून थोडीशी सुटका म्हणून त्याने या तीन महिन्यांच्या हायकिंगला सुरुवात केली होती.

पुस्तक वाचता वाचता संध्याकाळ व्हायला आली, आसमंत रंगानी भरून गेला आणि वातावरण थंड हवेने भरू लागलं होतं. ते पुस्तक म्हणजे तिनं त्याचीच लव्ह स्टोरी लिहिली होती. पुस्तक बाजूला ठेवलं आणि टेंट मधून बाहेर पाहिलं तर दूरवर तीच जात होती. त्याच्या पासून दूर, अगदी त्याचा आवडत अबोली रंगाचा ड्रेस घालून. तिची ओढणी आणि केस वाऱ्यासोबत गप्पा मारत असल्यासारखे उडत होते. ती थांबली आणि त्याच्याकडं पाहून अगदी तशीच नेहमी सारखी हसली. शांत पाण्यात एखादा खडा टाकल्यावर सुंदर वलय निर्माण होतात तसं होतं तिचं हास्य. तिनं आयुष्यात हसायलाच शिकवलं होतं ना त्याला मग आता का तो रडत होता. मनात एक कल्लोळ होता तरी तो हसला. ती तशीच पुढे पुढे जात राहिली आणि दिसेनाशी झाली.

आणि तो मात्र त्या पालवीहीन वृक्षाकडं पाहत होता.**************** समाप्त *************

टीप - वाचक म्हणजे लेखकाला शब्दाइतकेच महत्वाचे असतात. तुम्ही माझी कथा वाचलीत यासाठी मनःपूर्वक आभार. पण कशी वाटली ते सांगायला विसरू नका.

3 comments:

 1. नमस्कार 😊👏
  पालवीहीन वृक्ष ही आपण लिहिलेली कथा वाचली .
  खरच अप्रतिम लिखाण आहे शब्दरचना आणि वाक्याचा मेळ प्रसंगाची गुंतवणूक पालवीहीन झाडाची
  प्रेमाला जोडलेली नाळ तिचं निघून जाणं आणि त्याचं आठवणींच्या पर्णहीन वृक्षाकडे
  बघत रहाणं खूप भावनिकरित्या आपण रेखाटलं .....

  ReplyDelete
 2. खूप खूप धन्यवाद कोमल जी.... असंच वाचत रहा आणि आवडल्यास जरूर शेअर करा..

  ReplyDelete
 3. Dear vishu ..

  I like your Every post.
  Keep Write and Mark Me everytime.

  Thanks

  ReplyDelete