.post img {

Automatic Size

Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Friday, 22 May 2020

लॉकडाऊनमधील पत्रावळी

काळाकुट्ट रस्ता इतका तापलाय की डांबरबी आता पाघळून जाईल. पाच दिवस झालं हायवे तुडवत चाल्लूय. पुलिसांच्या भ्यानं कुटलंच व्हान थांबना. रस्ता मागं सरतूय तसं माज गाव जवळ येतंय. हायवेला झाड किंवा एखाद्या दुकानाची सावली घावती विरंगुळ्याला. पण दोन-तीन तास झालं एकादं झाडबी दिसलं नाय. छकुली माझ्या खांद्याव दोन्ही बाजूला पाय टाकून आणि गळ्याभोवती मुटकुळा मारून गपगार बसती. हू का चू नाय.

"छकुले.... डोक्यावचा टावेल काडू नको.. ऊन लय लागतंय.. आता मिळल बग पुढं जेवाया."

सकाळपासून भूक लागली आसल माज्या छकुलीला. तिला इचारल्यावर 'नाय लागली भूक' आसंच म्हणती. बारक्या पोरास्नी भूक लागलीली कळत नाय म्हणत्यात. छकुलीलाबी कळत नसल की 'कळती' झाल्यागत भूक लागलेली दावत नसल.  मुंबईत आसताना गोळ्या बिस्किटासाठी मागं लागणारी छकुली आता एवडी समजदार झाली. पर बापालाबी पोरीचा चेहरा वाचता येतूया. काल राती पेट्रोल पंपाभाईर, कुणीतरी दिलेलं केळ खाउन झूपली व्हती . मग आता पोटात कावळं हैदोस घालत नसतील काय? आपलं काय, कामाच्या जोमात भूक मारायची सवय आदीपासूनच हाय. पण तिनं हे सोसायला नगो. 

फकस्त घर डोळ्याफुडं ठिउन चालतुय. लोक आमाला यडे म्हनत आसतील. पण आमाला दुसरा काय पर्याय व्हता. शहरात आमी रोज दोन येळच्या जेवणाइतकं कमावतो. जितं गर्दीमधी श्वासपण उसना घ्यावा लागतुय तिथं पैसा साठवायला कुटनं मिळणार. आन काम बंद तर खायाचं तरी काय. त्यात छकुलीची आय दोन दिसासाठी म्हणून गावी गेली असता तिथंच आडकून बसली. इकडं तिकडं जानं बंद. चारी बाजूनी त्या रोगानं थैमान घातलेलं. पोरीची आबाळ नगो म्हणून आसा निगालो बगा. आपल्या पोरीला तिच्या आईशीजवळ पोचवल्याव बरं वाटल. म्हणून ही पायपीट. शेकडो मैल. 

आता थोडं फूडं गेल्याव कायतरी मिळल असं म्हणत म्हणत सूर्य डोक्याव आला. त्यवढ्यात एक निवारा दिसला. तात्पुरता मंडप घातलेला. ती सावली दिसल्याव पळतच पोचलो. ती देवमाणसं पाणी देऊन जेवणबी वाडत हूती. पत्रावळी फुडं आली आणि माझी छकुली इतकी गोड हासली म्हणून तुमाला सांगू. माझी भूक तिथंच भागली. 

चार दिसात फकस्त केळी, काकड्या, वडापाव आसं कायतरी मिळायचं. पण आज भात, वांग्याची आमटी, भाकर. तेही पत्रावळी भरून. वांगं तिला लय आवडतं. मी तिच्याकडं पत्रावळी सारली आणि खा म्हणलं. छकुलीनं पयला घास उचलला आन माझ्या तोंडाकडं आणला. बापाच्या डोळ्यातनं पाणी कसं काढावं हे माझ्या शान्या लेकराला ठाऊक. माजं कोकरू ते. ह्यो प्रवास तिला लय काय शिकवल. देवा फकस्त तुजा हात असू देरं डोसक्यावर, मग काय आसच हासत हासत पोचू बगा गावाला.

© विशाल पोतदार (मोबाईल- 9730496245)

फोटो स्रोत -अज्ञात

Wednesday, 20 November 2019

जड झालेला रुपया (कथा)

कथा शीर्षक – जड झालेला रुपया

रोज खेळायला येणाऱ्या दत्तूचा अजून काही पत्ता नव्हता आणि महादेव वाट बघून कंटाळला होता. दोघांना एकमेकांशिवाय अजिबात करमायचं नाही. खेळायला असो की कुठे जायचं असो, दोघे सोबत असणं हे ठरलेलंच होतं. आज महादूने स्वतः बनवलेली टपोरी विटी कधी एकदा दत्तूला दाखवतो असे झाले होते. उन्ह आता तिरपं झालं आणि काही वेळानंतर दत्तू नाचतच येताना दिसला. आला तसा सदऱ्याच्या खिशातून एक रुपयाचं चकचकीत नाणं काढून महादेवला उत्साहात दाखवलं. महादेवने आश्चर्याने त्याबद्दल विचारपूस केल्यावर दत्तू सांगू लागला, की इकडं येत असताना त्याच्या समोरून एक गोरा साहेब बग्गीतुन चालला होता. त्या बग्गीतून त्याने पैशाचा बटवा पडताना पाहिला, तसा लगेच टांगा थांबवायला सांगून त्यानं तो इंग्रजाला परत दिला. गोरा साहेब तर जाम खुष झालाच आणि वर दत्तूला चक्क एक रुपया बक्षिसी म्हणून दिला. महादेवनं हसून दत्तूच्या आनंदाला दुजोरा दिला, मात्र आतून त्याला कसंसच वाटत होतं. कारण महादेवच्या घरी जरी सुबत्ता असली, तरी त्याचे आबा हातात पावलीपण टेकवताना दहा प्रश्न विचारत. इथे मात्र त्याचा मित्र आज रुपया मिरवत होता.

विटीदांडूचा डाव सुरू तर केला पण महादेवच्या डोक्यात मात्र तो रुपया घुमत होता. सूर्य त्याच्या तालाने हळू हळू कौलामागे  नाहीसा झाला तसे अंधाराने ते दृष्य हळूहळू पुसायला सुरुवात केली. आता जास्त वेळ खेळलो तर दत्तूला त्याची माय बदडून काढंल हा विचार करून दोघांनी डाव थांबवला. दत्तू गडबडीने उड्या मारतच घरी गेला.

रात्र होऊ लागली तसे पौर्णिमेचं शुभ्र चांदणं पसरू लागलं. अंगणाच्या मधोमध, पोक्त पारिजातक तुळशीवृंदावनावर छत्र धरून होता. महादेव उंबऱ्यावर उभा राहून, त्या पारिजातकाभोवती फिरणाऱ्या काजव्याकडं पाहत स्वतःला हरवून गेला. तेवढ्यात दत्तू शोधक नजरेनं खाली पाहत येताना दिसला. महादेवला कदाचित हेच अपेक्षित असावं. न राहवून महादेवने विचारलं.

"काय रं हुडकतोस? पडलंय का काही?"

"माजा रुपाया पडलाय. मगाशी आपण खेळत हुतो तवा दाखवला होता ना."

"आरं इकडे नाही रस्त्याकडं पडला असंल नीट बघ." दत्तू त्याच्याच विचारात होता. त्यानं नुसतंच मुंडकं हलवलं.

बराच वेळ गेला पण रुपया काही सापडायला तयार नव्हता आणि दत्तू आता रडकुंडीला आला होता. महादेवला मनातून कितीही आनंद झाला असला तरी तो चेहऱ्यावर न दाखवता, लाजंकाजं शोधू लागायचं नाटक करू लागला.

"म्हादू... जा आता घरात नायतर तुजी आय कावायची. मी हुडकतो हितं." आता मात्र दत्तूचे डोळे भरून आले होते. आणि चांदण्या रात्रीत ते आणखी गहिरे दिसत होते.

महादू त्याला खोटा दिलासा देऊन घरात आला. पण आत येताना त्याचा पाय उचलत नव्हता. सुरुवातीला दत्तूची घालमेल पाहून जो आसुरी आनंद वाटला होता तो मात्र त्याच्या डोळ्यात पाहिलेल्या अश्रूंनी धुवून काढला.

दत्तू मनगटाने डोळे पुसत शोधकाम करत होता. तितक्यात जाईच्या झाडाजवळ काहीतरी चमकल्यासारखं दिसलं म्हणून सरसर पावलं उचलत निघाला. पण पारिजातकाच्या आडाला बसलेल्या कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडला आणि कुत्र्याने त्याचा पाय कचकचून पकडला. कुत्र्याचे दात खोलवर रुतले होते, तशातच त्याने उडी मारून पाय सोडवायचा प्रयत्न केला आणि पुढे बांधकामासाठी ठेवलेल्या दगडांवर जाऊन आदळला. हनुवटी एका मोठ्या दगडावर आपटली. असह्य कळीने त्यानं एक जोरदार आरोळी ठोकली. चांदण्यातल्या किर्र रात्री अशी आर्त आरोळी ऐकून महादेवाच्या घरातले सगळे पळतच बाहेर आले. पाहतात तर दत्तू बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. चेहरा रक्ताने माखला होता. सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. पटकन दत्तूच्या मायला कुणीतरी बोलावलं. ते दृष्य पाहून तर तीची दातखिळीच बसली. बैलगाडीतून दत्तूला गावातल्या गोऱ्या सायबाच्या दवाखान्यात नेऊ लागले, पण जाताना कुणीतरी म्हटलं, "लय मार लागलाया. देव करो अन पोरगं हाताला घावुदे रे बाबा."

ते वाक्य ऐकताच महादूच्या अंगात त्राणच राहिला नाही. अंगणात आता तो एकटाच होता. मघापासून हातात दाबून ठेवलेला रुपया बाहेर काढला आणि त्याकडं पाहून ढसाढसा रडायला लागला. खेळताना दत्तूच्या खिशातून पडलेला रुपया त्यानं मोठ्या हिकमतीने लपवला होता. पण आता मनात आलेला विजयाचा आवेश आता गळून पडला. स्वतःची अतीव घृणा वाटू लागली. हातातला रुपया आता कैक पटीनं जड वाटत होता. रागानं तो रुपया अंधारात भिरकावला आणि तिथल्या एका भगदाडात कायमस्वरूपी गाडला गेला. मात्र हृदयाच्या आतल्या कोपऱ्यात ती सल खोलवर कोरली गेली होती.

******************************************
आज चिल्लरपार्टी आंब्याचं झाड लावायचं म्हणून अंगणातली माती उकरत होते. त्या सगळ्यांत शिरीष थोरला होता. तेवढ्यात 'तात्या' म्हणजे त्यांचे पणजोबा घरातील पूजा आटोपून घरापाठीमागच्या विठ्ठल मंदिरात जाऊ लागले. मुलांकडे नजर टाकली आणि मंदिरात निघून गेले. मुलांना नेहमी वाटायचं की आपले तात्या कधीच मनमोकळं हसत का नाहीत. पण तात्या पहिल्यापासूनच असे होते.

तेवढ्यात मुलांना तात्यांचा मित्र तिकडे येताना दिसला. खरं तर त्या बाबांना बोलता यायचं नाही, पण सुंदरश्या हास्यातून संवादाची उणीव भरून काढायचे. त्यांनी अंगणात पाऊल ठेवलं तसे मुलं गलका करून त्यांच्या भोवती जमा झाली. त्यांनी आपल्या खिशातून आणलेली चॉकलेट्स पोरांना वाटून टाकली आणि राहिलेलं एक चॉकलेट स्वतः मटकन खाऊन टाकलं. 'हुप्प' असा अभिनय करून त्यांचा तुसडा पणजोबा कुठेय हे विचारलं. मुलांनी विठ्ठल मंदीराकडे बोट केलं.

विठ्ठलाच्या पायरीशी येताच तात्या आपल्या मित्राला हात द्यायला पुढं आले. त्याच्याकडं पाहून तात्या नेहमीप्रमाणे म्हणाले,
"अजून काही तुझं लहान मुलासारखं खाण्याचं वेड गेलं नाही बघ."  तो नुसतंच हसला.

खरे तर त्या दोघांना कधी संवाद साधायला शब्दांची गरज पडायची नाही. अगदी एकमेकांच्या मनातलं कळण्याइतपत त्यांच्या मैत्रीचा धागा घट्ट विणला होता.

तेवढ्यात शिरीष तात्यांना हाक मारत पळत येताना दिसला. तात्यांना काळजी वाटून ते पायरीपर्यंत आले. तर त्याने खिशातून एक नाणं काढून त्यांच्या हातावर टेकवलं.

"तात्या.. हे पहा आम्हाला खड्डा खोदताना नाणं सापडलं. बघा ना किती जुनं आहे."

तात्यांनी त्या नाण्याकडं पाहिलं आणि विचारात बुडाले. नजर न हटवताच म्हणाले,

"हो रे...  मी साफ करून पाहीन किती जुनं आहे ते.. जा तू झाड लावायला."

शिरीष तसाच पळत निघून गेला. पण इथे आता तात्यांची नजर त्या नाण्यावरून हटत नव्हती. मनात अगदी कोलाहल माजला. वनराई मध्ये गर्द धुकं दाटून यावं आणि आपल्या हातावरच्या अंतरावरचंही स्पष्ट दिसू नये तशी त्यांची मनोवस्था होती. हळूहळू त्यांच्यापुढं उभी होती एक चांदणी रात्र, मोठं अंगण, दोन मित्र आणि 'रुपया'.

त्यांच्या सुरूकतलेल्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. मागे वळून आपल्या जिवा भावाच्या मित्राकडे पाहिलं आणि दाबून धरलेला आवंढा अश्रूरूपे बाहेर आला. त्यांच्या मित्राला कळत नव्हते की कधीच कुठलीही भावना चेहऱ्यावर न दाखवणारा हा तात्या आज चक्क धाय मोकलून रडत होता. तात्यांनी जवळ येऊन तो रुपया त्याच्या हातात ठेवला आणि पायाशी बसले.

"दत्तू..... दत्तू...हा तुझा रुपया.. मी चुकलो रे... मी चुकलो... एवढ्या वर्ष नाही रे बोलू शकलो पण मला माफ करशील का ....??  लहानपणीच्या त्या एका क्षणाच्या मत्सराने मी आयुष्यभर जगूनपण मरत होतो रे........"

आपल्या मित्राचा पश्चाताप आणि आक्रोश पाहून दत्तूचेही मन हेलावून गेले. डोळ्यात पाणी आणि ओठांवर करडे हसू होते.. लहानपणी त्या अपघातात जिभच गेल्याने, ईच्छा असूनपण आपल्या मित्राला "माफ केलं रे म्हादू.." असं बोलू शकत नव्हता. ते दोन्ही जीव आज अश्रूंनी आपली सत्तर वर्षांची मैत्री आठवत होते. आणि त्या हातातल्या रुपयाचं ओझं सुद्धा पश्चातापात विरून गेलं होतं.

*********************************** समाप्त *********************************
लेखक – विशाल पोतदार
पत्ता – मु पो – वाठार, तालुका- कराड, जिल्हा – सातारा
मोबाईल क्रमांक – 9730496245
इमेल ID – vishal6245@gmail.com






Thursday, 22 August 2019

मारवा (कथा)

दहा बाय बारा फुटांची ती बेडरूम एका अस्वस्थतेने भरून गेली होती. बाहेर लख्ख सूर्यप्रकाश असला, तरी इथे मात्र काळवंडून आलं होतं. कोपऱ्यातल्या कॉटवर एका सत्तरीतल्या पुरुषाचा देह निश्चल असा पहुडलेला. जीवनाच्या अंतिम क्षणी मात्र त्याच्या चेहऱ्यावर गहन विचारात असल्यासारखा निर्विकार भाव उरला होता. ऑक्सिजन मास्कमधून जड झालेला श्वास ठळकपणे जाणवत होता. बाजूच्या स्क्रीनवर हृदयाच्या ठोक्यांचा आलेख अजून तरी तोडक्या मोडक्या लयीत चाललेला. त्यातूनच त्या देहाला काय तो जिवंतपणाचा पुरावा द्यावा लागत होता. 

त्याची पत्नी कॉटला टेकून बसलेली. तिच्या अवस्थेचा थांग कुणी लावावा! एखादी भयानक गोष्ट घडणार याची बऱ्याचवेळा आपणास कल्पना असते, त्यास तोंड द्यायला तयारही असतो परंतू खरेच ती गोष्ट घडल्यावर सगळे काही अचानक घडल्याप्रमाणे आपण गांगरून जातो. अशाच काहीशी दोलायमान मनोवस्थेतून जाणाऱ्या त्या स्त्रीची नजर नवऱ्याच्या चेहऱ्यावरून किंचितही ढळत नव्हती. 

तिने मनात कितीही सकारात्मक समज करून घेतले असले, तरी डोळ्यांना अटळ क्षण उमजलेच आणि अश्रू अनिर्बंध वाहू लागले. अश्रुंतून आठवणी अलगद बाहेर पडू लागल्या. थोडा थोडका नाही तर तब्बल ४० वर्षांचा एकत्र प्रवास! नववधू म्हणून मिरवण्यापासून ते वार्धक्यातली ही वेळ, अगदी सगळंच्या सगळं डोळ्यांसमोर आत्ता घडल्यासारखं ताजं होतं. यावेळेला मात्र त्या क्षणांना दुःखाची किनार होती. 

अचानक तिची नजर समाधिस्थ अशा तानपुऱ्याकडे गेली. त्यालाही या बेसूर वेळेतला ताण जाणवला असेल का? तिचे मन अगदी ढवळून निघाले आणि काहीतरी महत्वाची गोष्ट आठवल्याचे भाव चेहऱ्यावर आले. उठून अचानक ती तानपुऱ्याकडे जाऊ लागली. कदाचित तहान लागली असावी असे वाटून शेजारच्या बाईंनी पाण्याचा ग्लास पुढे केला. पण तो नाकारून ती तानपुऱ्याजवळ आली. तानपुऱ्याच्या तारांवर हळुवार हात फिरवताना मनात सुरांच्या लाटा तिला बोलावणं धाडत होत्या. तिने मनात काहीतरी निर्धार केला आणि तानपुरा उचलून समोर ठेवला. एक पाय मुडपून तानपुरा कानाला लावून गायनाचा पवित्रा घेतला. 

तिच्यातला हा अचानक झालेला बदल पाहून, तेथील उपस्थित अचंबित झाले. दुःखाने हिला मानसिक धक्का तर नाही बसला? हीच काळजी सर्वांच्या चेहऱ्यावर उमटू लागली. एव्हाना त्या स्त्रीने सुरांचा अंदाज घेण्यासाठी डोळे मिटले होते. तानपुऱ्याची तार छेडत अलगद 'सा' लावला आणि जितक्या उत्कटतेने अश्रू येत होते, तितक्याच तन्मयतेने गळ्यातून आता पुढचे सूर मंद गतीने उमटू लागले. सुरांची मैफिल आलापामार्फत हळुवार पावलांनी त्या खोलीत प्रवेशत होती.

◆◆◆ ● ◆◆◆

“अय्या.. कसली भारी आहे हो ही जागा! कशी शोधून काढलीत ती?"

"शोधलं बाई पन्नास जणांना विचारून."

"मानलं पाहिजे बाबा माझ्या नवऱ्याला! मी काहीतरी वेडसर कल्पना मांडावी. अन काही दिवसात ती पूर्ण देखील व्हावी!“

चारुलता आणि जयंतच्या लग्नाचा आज वाढदिवस. चुटकीसरशी दहा वर्षे कुठे गुडूप झाली कळतही नव्हते. यावर्षी लग्नाचा वाढदिवस वृद्ध लोकांसमवेत साजरा करायचा हा चारूचा आग्रह होता. आपल्या जोडीदारासोबत आयुष्याची तीस-चाळीस तर कुणी पन्नास वर्षे व्यतीत केल्याचा प्रवास कसा असेल, त्यांचं नातं कसं असेल ही भावनाच तिला सतत ओढून घ्यायची. बायकोच्या डोक्यातल्या या अशा वेड्या कल्पना जयंतला खूप हव्याहव्याशा वाटत. खूपसे प्रयत्न करून, तिच्या कल्पनेप्रमाणे वाढदिवस करण्याजोगे एक ठिकाण त्याला शोधून सापडलेच.

पुण्यापासून जवळपास पन्नासएक किलोमीटरवर डोंगरालगतच्या गावात, आठ दहा एकर जागेत वसलेले 'हिरवळ'' नावाचे एक छोटेसे वृद्धाश्रम. प्रवेशद्वारावर रेखाटलेले टॉम आणि जेरीचे हसरे चेहरे पाहिल्यावर, 'आपण एखाद्या नर्सरी स्कुलमध्ये तर जात नाही ना?' हा प्रश्न पडावा. आत प्रवेश केल्यावर आपले बोट धरून आत नेण्यास मध्यम उंचीची फुललेली चाफ्याची झाडे तयारच होती. आत जाता जाताच वड, पिंपळ आणि अजून अनोळखी अशी ४-५ मोठाली झाडे प्रेमाने आपली सावली पसरून उभे होते. त्या ओथंबून आलेल्या हिरवाईने चारुला आपल्या आजोळची आठवण झाली. पुढे गेल्यावर दोन मजली डौलदार कौलारु वास्तू ध्यानस्थ बसल्यासारखी वाटली. डाव्या बाजूस एका जमिनीच्या तुकड्यात फळभाज्या आणि पालेभाज्यांचे वाफे होते. एक वृद्ध जोडपं वाफ्यातल्या वांग्याची तोडणी करून पाटीत ठेवत होते. वृद्धाश्रमाच्या अंगणात एक इवलेसे रेखीव तुळशी वृंदावन डेरेदार पिंपळाच्या पायाला मिठी मारून बसले होते. 

हे सर्व अनुभवत दोघांची पावले तिथे लहान मुलाच्या उत्सुक चालीने रेंगाळत राहिली. इतक्यात त्यांना छोटुशा केबिन मध्ये ग्रे टी-शर्ट घातलेला एक मुलगा काहीतरी लिहित असलेला दिसला. त्याच्याजवळ त्यांनी वृद्धाश्रमाविषयी आत्मीयतेने विचारपूस करण्यास सुरुवात केली. तो अगदी उत्साहात सांगू लागला, "नमस्कार.. मी सुधीर.. या “हिरवळ” चा संचालक. हे वृद्धाश्रम माझ्या आजोबांनी ३० वर्षांपूर्वी चालू केले. आजी आजोबांनी त्यांचा संसार याच घरात उभा केला पण नंतर बदली झाल्याने काही काळ ते पुण्यातच स्थायिक झाले. हार्ट ऍटॅकमुळे आजी अचानक हे जग सोडून गेली आणि आजोबांचे जगच एकटे पडले. एकटेपणात जगण्यापेक्षा त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन, आजीच्या आठवणींसोबत जगण्यासाठी आजोबा इकडे शिफ्ट झाले. आधी त्यांनी ही वनराई फुलवण्यात मन रमवले. त्यानंतर वृद्धाश्रमाच्या बहाण्याने इथे नवीन सवंगडीच गोळा केले. आजोबांना देवाज्ञा होऊन आता वीसेक वर्षे लोटली. त्यांनी सुरू केलेली हिरवळ आम्ही तशीच जपण्याचा प्रयत्न करतोय इतकेच."

चारूलतासमोर सगळे चित्र उभे राहिले, "ओहह.. आपल्या दुःखातून इतरांसाठी नंदनवन तयार केले त्यांनी.. " चारुलता.

इकडे तिकडे पाहत जयंतने विचारले.

"इथे काही पैंटिंग्ज आणि मूर्ती दिसल्या. कलेक्शन सुंदर आहे हो तुमचं."

 "अच्छा. ते होय? आमच्या मेम्बर्स नी बनवल्या आहेत. कसं असतं ना. प्रत्येक वृद्ध व्यक्तीच्या मनात, संसाराच्या ओढातानीत दबून गेलेले काही छंद असतात. आम्ही फक्त त्यांना ते जोपासण्यासाठी उद्युक्त करतो."

एवढ्या संवादात सुधीरशी त्यांची चांगलीच गट्टी जमली. इथे आल्यापासूनच दोघांच्याही डोळ्यात समाधान तरळत होते. इतकी वर्षे घराची जी व्याख्या त्यांच्या स्वप्नात रेंगाळत होती, ते घर अगदी जस्सेच्या तसे समोर होते. चारुलताला वाटले, की भरावी बॅग आणि यावे इकडेच रहायला. नंतर स्वतःच्याच विचारावर हसू आले कारण या “वृद्धा”श्रमात राहायला अजून कमीत कमी २५-३० वर्षे तरी वाट पहावी लागली असती. तोपर्यंत हे इथे असेल की नसेल हेही कुणाला ठाऊक?

दुपारी पिंपळाच्या सावलीत मस्तपैकी पंगत बसली. जेवणापेक्षा त्या सवंगड्यांच्या गप्पा आणि हास्यमैफिलच जास्त होती. वाऱ्याच्या लयीत डुलत, सळसळ आवाज करत पिंपळही त्या पंगतीतल्या हास्यात सामील झाला. एकमेकांना मारलेल्या कोपरखळ्या, दिलखुलास चेष्टामस्करी आणि अगदी के एल सेहगलपासून ते रफी, किशोर यांच्यापर्यंत संगीताचे विषय त्यांच्या बोलण्यात होते. त्या वातावरणात काहीतरी वेगळीच जादू होती. एरव्ही संकोचून मोजकेच हसणाऱ्या जयंतला आज खदाखदा हसताना पाहून चारूलता भलतीच सुखावली. जेवणानंतर तिथल्या स्त्रियांनी चारुला ठसकेबाज नऊवारी नेसवून, कुणी आपली बोरमाळ, कुणी लक्ष्मीहार तर कुणी आपली नथ घालायला लावून छान नटवले. जणू काही सर्वजणी स्वतःचे तारुण्य पुन्हा तिच्यात पाहत होत्या. ती बाहेर येताच मात्र जयंतीच्या हृदयाचा ठोका चुकला. आणि त्याची नजर काही त्या मुखवरून हटत नव्हती. लग्नाचा यंदाचा वाढदिवस इतका भन्नाट साजरा होईल हे दोघांना स्वप्नातही वाटले नव्हते. शेवटी दिवस संपताना आता तेथून पाऊल निघणार नव्हते. पण अवनी शाळेतून घरी येइपर्यंत पोहचायला हवे होते. येताना मला केक घेऊन या अतिवर आपल्या आई वडिलांना फिरायला होण्याची मुभा लेकीने दिली होती. तिथून निघायच्या आधी जयंत म्हणाला,

 "चारू, म्हातारपण दुसरं बालपण असतं हे यांच्यावरून खरं वाटतं बघ."

"हो ना. ऐका ना. माझ्या मनात अजून एक कल्पना आहे."

"हाहाहा.  तुझं मन शांत बसतं का कधी? काही ना काही नवीन चालूच असतं."

"बरं नाही सांगत. जा..."

"अगं गंमत केली. सांग सांग. तुझ्या कल्पनांना सत्यात आणण्यातच तर आयुष्य इतकं धमाल चाललंय."

"बरं.. ठिकेय सांगते. पण यावर तुम्ही खूप हसाल."

"सांग तरी.... किती वेळ लावतेस."

दोघेही चालत चालत बगिचामध्ये आले होते. हिरव्यागार गवतामध्ये छोटी छोटी रानफुलं उमलली होती. त्या रानफुलांसारखे ते दोघे तिथल्या बाकावर दोघे हातात हात घेऊन शांत बसले. जयंतच्या खूप आग्रहानंतर तिने आपली कल्पना मांडली. त्याला क्षणभर विश्वासच बसला नाही की हिची अशीही काही इच्छा असेल. त्याच्या मनातलीच भावना तिने व्यक्त केली होती.

                        ◆◆◆ ● ◆◆◆

झाकोळल्या खोलीत तानपुरा कंप पावत होता आणि बंदिश आकार घेत आता स्वर लयकारी मध्ये पोहोचले. तिथे असलेल्या सर्वांनी आजपर्यंत कित्येक मैफिलींचा आनंद घेतला होता. पण अशा नाजूक परिस्थितीत भावनेने ओथंबलेली कलाकृती कधी अनुभवली नव्हती. प्रसंग दुःखाचा आहे हे माहीत असूनही, ते सूरही दुर्लक्ष करता येणारे नव्हते. न राहवून सावंतांनी कॉटच्या शेजारी असलेला तबला घेतला आणि त्या गायनाला विलंबित तालात बांधण्याचा प्रयत्न करू लागले. 

                              ◆◆◆ ● ◆◆◆

पंचवीस वर्षांनंतरही हिरवळचा आत्मा आजिबात बदलला नव्हता. आजही इथे कलेला अनन्यसाधारण महत्व होते. मैत्री आणि हास्य हा इथला गाभा होता. जवळपास १५ पुरुष आणि १० स्त्रिया वृद्धत्व साजरे करत रहात होते. पिंपळाच्या आडून उगवणारा सूर्य पहात रम्य सकाळ व्हायची आणि शेकोटीकडेला होणाऱ्या गप्पाटप्पानी झोपायला मध्यरात्र व्हायची. 

इथले बरेचसे मेंबर्स काही ना काही कला जोपासत होते आणि ज्यांच्याकडे काही कला नाही ते रसिकाची भूमिका उत्तम पार पाडायचे. शशांक सावंत उत्तम तबला वाजवायचे. काटेकर काका सुंदर मूर्ती घडवायचे. हिरवळ मधल्या गणेशोत्सवामध्ये त्यांच्याच हातची गणेशमूर्ती असायची. खेडवळ अशा हौसामावशींना तर अन्नपूर्णा प्रसन्न होती. अस्सल गावरान तसेच हॉटेलमधले कित्येक नवनवीन पदार्थ त्यांच्या हातांना जमायचे. त्यांच्या हाताखाली दोन बायका देऊन, हिरवळचे स्वयंपाकघर त्यांच्या अखतारीत दिले होते. प्रत्येकाच्या पथ्यानुसार जेवण असले तरी त्यात एक मायेची गोडी असायची. ऐंशी वर्षांच्या लालचंदभाईंचे फॅशन स्टेटमेंटच वेगळे होते. नेहमी जीन्स टीशर्ट आणि स्टायलिश चष्म्यामध्ये दिसणारे लालचंदभाई झोपताना तरी साधे कपडे घालतात की नाही हा प्रश्न पडायचा. मरतेवेळी त्यांच्या पत्नीनेच त्यांना तरुणपणाचाच लालचंद शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याची सूचना केली होती. हृदयात तिच्या जाण्याची धग, तिच्याच सुचनेचे पालन करून विझवण्याचा प्रयत्न करत होते इतकेच. यशोदा मोडक पैंटिंग्ज करायच्या. त्यांच्या चित्रांत हिरवळमधील प्रत्येक झाडाचे पोर्ट्रेट करून झाले होते. हिरवळमधील भिंतीही त्यांच्या रंगांनी सजल्या होत्या. कित्येक कला महाविद्यालयाचे विद्यार्थी इथे भेट देऊन कलेविषयी एक वेगळाच दृष्टिकोन घेऊन जायचे. कारण जीवनाच्या सुर्यास्तात असणारे आकाश अगदी अचंबित करणारे रंग विखुरत होते. सर्वांच्या स्वभावातही व्यावहारीकतेपेक्षा भावनेचा धागा विणलेला असायचा. 

हल्ली सुधीररावांची तब्येत बरी नसल्याने ते पुण्यात थोरल्या मुलाकडे राहायचे आणि धाकटा मुलगा अमेय हिरवळची सगळी व्यवस्था उत्साहाने पहायचा. तो तर लहानपणापासूनच इथल्या सगळ्या म्हाताऱ्यांचा लाडका होता. औषधे आणि व्यायाम याबाबत तो इतका कडक असे की सगळेजण त्याला हिटलर म्हणत. तो ही हसत उत्तर द्यायचा, "तुम्हा म्हाताऱ्यांपेक्षा लहान मुलं परवडली हो. ती तरी एखाद्याचं व्यवस्थित ऐकतात." 

तेवढ्यात कुणीतरी आजी म्हणायची, "याचं लग्न करून दयायला हवं म्हणजे हा जरा शांत होईल आणि आपल्या मागे औषधं घेऊन फिरण्यापेक्षा तिच्या मागे मागे फिरेल." आणि तो ही मग थोडासा लाजराबुजरा व्हायचा. 

इथे आल्यापासून तर जयंतराव आणि चारूलता यांच्या आयुष्याने कातच टाकलेली. इतक्या वर्षांच्या दगदगीच्या आयुष्यात एकांताचे मोजकेच क्षण हाती आले होते. कित्येक शब्दांचे ढग दाटूनही न बरसताच आल्या वाटे परतायचे, पण आता त्या ढगांना नात्यातली शीतलता लाभून शब्द सरींसारखे कोसळत होते. दोघे तासंतास बोलत बसायचे, त्या नवीन मित्र मैत्रिणींमध्ये रमायचे.

"अहो. बघा ना दिवस कसे धावत पळत निघून जातात. आपल्याला 'हिरवळ' मध्ये राहायला येऊनच वर्षही झाले. बघता बघता माझा नवराही आता साठीत गेला." 

"आपणही पंचावन्न ओलांडले बाईसाहेब. चेहऱ्यावर वय दिसत नाही, ही गोष्ट वेगळी म्हणा. (काहीतरी आठवून) बरं ऐक सुहास आणि महेश पोहचतीलच आता. मी रियाजाच्या खोलीकडे जातो."

वयोमानामुळे जयंतरावांना आता मैफिलीमध्ये सादरीकरण करणे शक्य होत नव्हते. परंतू गायनाची तालीम घेण्यास पुण्याहून दोन विद्यार्थी यायचे. मैफिल नसल्याने त्यांच्या हाती आपली ओंजळ पूर्ण रीती करत होते. मागील पाच-सहा महिने हंसध्वनी रागाची तालीम सुरू होती. आज हंसध्वनी शिकवण्याचा शेवटचा दिवस होता. पुढच्या आठवड्यापासून जयंतरावांचा आवडता, मारवा राग सुरू होणार. आजची तालीम संपली आणि जयंतरावांना काहीतरी महत्वाचे सांगायचे राहून गेले असे वाटले.

"बाळांनो, संगीत तुम्हाला एकवेळ पोट भरायलाही आधार देईल पण अधिक उत्पन्न काढण्यासाठी बैलाला जुंपल्यासारखे सुरांना जुंपू नका. दिवसभराचा व्यवहार सुरू होण्याआधी, पहाटेच्या रियाजात संगीताशी आपलेपणाने संवाद साधा. प्रामाणिकपणे संवाद साधता साधता सुरांप्रती मनाला, वेड्या प्रेमाने शिवापुढे बैठक मारलेल्या नंदीची निष्ठा मिळू द्या. त्यापुढे संगीत आणि समाधीचे अनोखे मिलन तुम्हाला अनुभवायला मिळेल. हे अनुभवायची घाईही नको आणि ज्यावेळी जाणवेल तेव्हा वेळही दवडू नका. चला.. भेटू पुढच्या आठवड्यात."

**************

आज सुर्यास्तानंतर जयंतरावांनी मारवा रागाचा रियाज संपवला आणि बाहेर आले. चारूलता कुठे दिसतेय याचा कानोसा घेऊ लागले, तोच पिंपळामागून मारव्यातली तीच बंदिश कुणीतरी गुणगुणत असल्याचे ऐकू आले. बऱ्यापैकी सुरात होती आणि गायनही मनापासून होते. कोण गातेय हे पाहण्यासाठी पायऱ्या उतरून पिंपळाजवळ आले, तर चारू तुळशीजवळ निरंजन लावत होती.

"चारू.. तू गुणगुणत होतीस आत्ता?"

"नाही.. ही तुळस गुणगुणत असेल. तुम्ही पण काहीही प्रश्न विचारता."

"अगं किती सुरेख गात होतीस. पुढचं गाऊन दाखव बरं."

"अहो.. मला तेवढंच येतं. तेवढीच ओळ आणि त्यानंतरची तुम्ही घेता ती तान खूप आवडते. पण पुढचं आजिबात नाही येणार."

"चारू तू गाणं का शिकत नाहीस? इतकी वर्षे मला हे का जाणवले नाही कुणासठाऊक."

"गाणं? नाही बाबा. माझ्या आवाक्यातलं नाही ते. तुमचं गायन ऐकणं स्वप्नमय आहे, पण गायचं ठरवलं की सुरेल स्वप्नातून मी माझ्या बेसूर जगात परतते. मघाशी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सूर आणि समाधी याविषयी सांगत होता. ते खरंच तसं कुणी अनुभवू शकेल?  तुमच्या नुसत्या बोलण्यातून ती अनुभूती घ्यावी असे वाटून गेले. पण शिकायचे म्हटले की तो शिवधनुष्य वाटतो हो."

"चारू मी सांगितलेली ओळ न ओळ अनुभूतीची होती. जीव लावून शिकले तर कुणीही तिथंपर्यंत पोहोचू शकते. आज तू गुणगुणलेल्या ओळी नकळत का होईना सुरात होत्या."

"शिकवाल मला? मी माझा पूर्ण प्रयत्न करेन आत्मसात करण्याचा."

" का नाही? चारू इतकी वर्षे गाणं तू इतकं आपलंसं करून ऐकलंयस की ते आत रुजलंय. आता फक्त त्याला एक वळण दिले की छान फुलेल बघ. आता आपण तुझं गायन सुरू करतोय."

चारूलताचा फुललेला चेहरा निरंजनाच्या मंद उजेडाने टिपला. आजपर्यंत आवाक्याबाहेर समजलेली आवडीची गोष्ट आता आपण शिकणार ही उत्सुकता शिगेला पोहचली.

"पण माझ्याकडे शिकण्याचे नियम अगदी कडक असतील एवढं लक्षात घे."

"(थोडीशी हसत) आता गुरू बनवलेच आहे तर सगळं सहन तर करावे लागेल."

"बघ... पहाटे ५ ला तानपुरा तयार रहायला हवा. तुझं स्वरज्ञान करून घ्यायला हवं. एक एक सूर आणि राग पूर्ण तयार झाल्याशिवाय सुटका नाही."

"हो.. हो.. गुरुमहाशय.... घाबरवता की काय आता...?"

"घाबरवत नाही गं... संगीत शिकायला तेवढं झोकून देशीलच ही खात्री आहे. मुळात वयाच्या या वळणावर तुला पुन्हा शिकावं वाटतंय हीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर माझी नेहमीच एक सुप्त ईच्छा होती, की बायकोच्या आवाजात एखादी पूर्ण बंदिश ऐकावी. "

"अय्या खरंच? मग इतकी वर्षे बोलला नाहीत कसे?"

"बोलावं वाटायचं, पण असंही वाटायचं की ते उगीच तुझ्यावर लादल्यासारखी होईल."

"हो.. म्हणजे बायकोशी पण मन मोकळं करावं वाटलं नाही. काय हो तुम्ही. म्हणे लादल्या सारखं वाटेल.. असं काहीही विचार करता नेहमी तुम्ही.. नुसतं दुसऱ्याच्या मनाचा विचार करण्यात आयुष्य गेले.. अजूनही तसेच..."

"सॉरी..... पण आता ती संधी नाही दवडू देणार... उद्या गाण्याला सुरुवात करायची आहे. शिष्यत्व पत्करतेयस म्हणून किमान मला त्या नादाने तुला जरा दमात घेण्याची संधीतरी मिळेल. नाहीतर पूर्ण आयुष्य तुझे टोमणे ऐकत आणि डोळ्यांतून व्यक्त केलेला राग पाहत आलोय."

"(डोळे मोठे करून) खरंच जिभेला काही हाड? बारीक चेहरा करून असा आव आणायचा की एखाद्याला वाटेल की जगातला सगळ्यात गरीब माणूस हाच असेल. उगाच काहीतरी बोलायचं."

काही क्षण नुसतेच कोरे गेले आणि नंतर दोघांच्याही चेहऱ्यावर हसू फुटले. 

                        ◆◆◆ ● ◆◆◆
(एका वर्षापूर्वी)
जयंतराव आणि चारूलता, दोघेही गहन विचारात होते. आज त्यांनी पाहिलेल्या एका अनोख्या स्वप्नाचा निर्णायक क्षण आला होता. अवनीही आता तिच्या सासरी स्थिर स्थावर झाली होती. मागच्या महिन्यात जेव्हा त्यांनी अवनीला या निर्णयाबद्दल सांगितले तेव्हा तर ती अवाकच झाली. काही बोलवतच नव्हतं पुढे. ती असताना आईवडिलांनी वृद्धाश्रमात राहणे काही तिच्या बुद्धीला पटत नव्हते. इतकेच नव्हे तर तीचा नवराही आईबाबांना आपल्याकडे रहायला बोलवण्याच्या विचारांचा होता. जयंतरावांना मात्र तिला समजावता समजावता नाकी नऊ आले.

"अगं बच्चा. तू समजतेयस तसं नाहीये ते वृद्धाश्रम. आणि आम्ही काय कंटाळून किंवा निराधार आहे म्हणून नाही जात आहोत तिकडे." जयंतराव.

"बाबा, वृद्धाश्रमात काय हौस म्हणून जातात का? मी नाही तुम्हाला त्या अनोळखी लोकांत पाठवणार." अवनी.

"माझी बच्चू आता खरंच जाम रागावलेली दिसते. इकडं ये. माझ्याजवळ येऊन बस सगळं सांगतो, का जायचंय आम्हाला तिकडे."

अवनी लटक्या रागाने सोफ्यावर जयंतरावांच्या शेजारी बसली आणि हातात हात घेतला. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवुन प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. जयंतरावांनी त्यांच्या लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाच्या वेळेसची त्यांची "हिरवळ" वृद्धाश्रमातली भेट अगदी मन भूतकाळात हरवून कथन केली.

"अवू बाळा, त्या अगदी डोंगराच्या कुशीत, आणि कौलारु घरात आम्ही जेव्हा गेलो, त्याच वेळी आम्ही सुखावून गेलो होतो. तुझ्या आईने तर अगदी फिल्मी स्टाईल ने माझ्याकडून वचन घेतलं, की म्हातारपण इकडेच जगायचं. अगं या अनोळखी लोकांत आम्हाला नवीन सवंगडी शोधायचेत. त्यांच्या वेगवेगळ्या कलांमध्ये एक कल्पनेचा आविष्कार अनुभवायचा आहे. नवीन पाऊलवाटा आयुष्यात वेगळं काही दाखवण्याची शक्यता देतात. तीच ही एक पाऊलवाट. वाटल्यास असं समज की ही आमची ड्रीम लाईफ आहे."

"असं काहीतरी छान बोलून मला नेहमी हो म्हणायला लावता... पण पटलं तुमचं म्हणणं. याआधी गाण्यामधे तुम्ही बिझी असल्याने, तुम्हा दोघांना निवांत वेळ गवसलाच नाही ना. तुम्ही म्हणताय तसंच 'हिरवळ' सुरेख असेल तर मग माझी काही हरकत नाही. पण आधी मी येऊन सगळ्या सोई सुविधांची चौकशी करणार. नंतर पण आम्ही आलो तर चालेल ना अधून मधून तिथे..?"

"अगं. तुरुंग थोडीच आहे तो.. जेव्हा आठवण येईल तेव्हा यायचं तूम्ही दोघेही."

अवनीने होकार देताच दोघांनीही सुटकेचा श्वास सोडला. ही पोरगी एवढ्या सहजासहजी मानेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. जयंतराव म्हणाले, "चारू असं वाटतंय की जणू आपण लग्न करायला पळून चाललोय आणि सपोर्ट करण्यासाठी मी माझ्या आईलाच समजावतो आहे." दोघंही भरपूर हसले.

"हो ना... मग आता दुसऱ्या इनिंगसाठी तयार रहा मिस्टर जयंत. भारी वाटतंय मला.जसा चाळीस वर्षांपूर्वी मांडला होता, तसा नवा संसार आता मांडणार."

जयंतरावांचं लक्ष आता तिथे हजर नव्हते. ते तर कधीच हिरवळ मधल्या झाडांमध्ये लहान बाळाप्रमाणे बागडत होते. आणि आज बायकोच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचा एक एक कण मनात साठवून ठेवावासा त्यांना वाटला. चाळीस वर्षाच्या प्रवासानंतरसुद्धा ती अजून तशीच विलक्षण होती.

*************

(वर्तमान)
"हिरवळ"मध्ये येऊन आता यांना चार वर्षे झाली. चारुलताचे गायन वेग पकडत होतं. भूप, दुर्गा, यमन, बागेश्री या रागांशी ओळख झाली होती. तालाच्या आधाराने रागाचा संथपणे विस्तार करण्याचे कसब जयंतराव तिला बहाल करत होते. हिरवळमधील इतर सदस्य त्या नवरा बायकोचं नव्याने होऊ घातलेले गुरूशिष्याचे नाते कुतूहलाने पाहत होते. वयोमानाने तिला खाली मंद्र सप्तकात सूर आणताना अवघड जायचे, पण नेहमीच्या पट्टीतले सूर उत्तम लागत होते. 

काही दिवसांपासून जयंतरावांना पोटदुखीने घेरले होते. कधी पहाटे उठल्यावर किंवा जेवल्यानंतर लगेच सर्रकन कळ येऊ लागायची. पचनात बिघाड झाला असेल म्हणून सावंत सांगतील तसे घरगूती उपाय चालू होते. चारुलताला त्यांनी सांगितले नसले तरी तिला दोन-तीन वेळा दिसलेच. आणि मग तिने आपल्या गुरूला चांगलेच दमात घेतले.

"अहो पाच दिवस झाले, पोटात दुखतंय आणि मला न सांगता सावंतांचं ऐकून काही तरी घरगुती उपाय करत बसण्याची गरज आहे का? सावंत तबल्यावर उत्तम साथ करतात म्हणून काय आजारात डॉक्टर बनून साथ करणार का तुम्हाला. आज मी काही ऐकायची नाही. डॉक्टरकडे जाऊन येऊ आणि येत नसाल तर मग अमेयला सांगते."

"बाई, त्याला कशाला सांगतेस? एवढ्याश्या कारणासाठी तो आश्रम डोक्यावर घेईल आणि मग सावंताचंही काही खरं नाही."

अमेय त्यांच्या मागेच उभा होता. "काका मी इथेच आहे बरं! ऐकतोय सगळं. जर असं कुणी तब्येतीची हेळसांड करताना दिसलं तर मी आश्रम डोक्यावर घेणारच ना. ते काही नाही, आज काहीही करून दवाखान्यात जाऊन यायचे. मी थोड्या वेळात गाडी अरेंज करतो. अहो तुम्ही आजारी असल्यावर इथलं सुरेल वातावरण बिघडून जाईल की आणि सावंत काकांना किती वेळा समजावलं आहे की घरचा वैद्य बनू नका म्हणून पण अजिबात ऐकणार नाहीत. आता काकूंनाच सांगणे हीच त्यांची शिक्षा."

त्याचं बोलणं ऐकून दोघेही हसायला लागले. हसताना जयंतराव मात्र पोटातल्या तीव्र वेदना लपवू शकत नव्हते. 

पुण्यात डॉक्टरांकडे दाखवून आले. त्यांनीही बऱ्याच टेस्ट केल्या आणि आतड्याला थोडी सूज असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी सतर्कता म्हणून त्यांनी काही दिवस तरी रियाज टाळावा हेच सांगितले. इकडे जयंतरावांना चारूच्या गायनात काही खंड पडू द्यायचा नव्हता. 

"नाही गं. काहीतरी चुकतंय. पुन्हा घे बरं आलाप."

"अहो आता तिसऱ्यांदा घेतेय पण काय चुकलं ते तरी सांगा?"

"मारवा रागामध्ये मध्ये 'प' स्वर वर्ज्य असतो, मग तो येतोच कसा तुझ्या आलापामधे? रागाचा मूळ स्वभावच चुकवलास तर कसं होईल चारू? अजूनही अधेमधे  'रे' शुद्ध लागतोय. 'रे' कोमल हवा, हे सुद्धा चार वेळा सांगितले. तो वादी स्वर असल्याने तुझ्या रागविस्तारात तो वारंवार यायला हवा. त्याचवेळी त्याची हळूवारता तुझ्यात आणि मारव्यात भिनेल."

चारू काहीशी हताश झाली. 

"बरं... आता आणखी थोडा रियाज करते. पण का नाही हो जमत हे? सर्व नियम माहीत असताना, गाताना ती चुक लक्षातच येत नाही. माहीत नाही, का असं होतंय. तुमचा मारवा ऐकताना उत्कटततेपर्यंत पोहोचल्यासारखा वाटतो. मी मात्र तिथे पोहोचू शकत नाहीये."

"चारू.. आपलं मन जर गायनात उपस्थित नसेल तर गाणं मृगजळासमान भासतं. तू कितीही जवळ जाण्याचा प्रयत्न कर, ते तेवढीच पावले तुझ्यापासून दूर असेल. मला असं वाटतं की तूझं पूर्ण अवधानच गाण्यात नसते. माझ्या आजारपणाचा विचार करतेस हेही दिसतं मला. पण म्हणून तू गाण्याशी प्रतारणा नाही करू शकत. बालपणी, आपण खेळता खेळता कुठेही झोपलेलो असू, पण सकाळी जाग यायची ती आईच्या कुशीत! आईनं आपल्याला अलगद उचलून कधी घेतलं ते कळायचं देखील नाही. तसेच हे संगीत आहे. तू सगळं जग विसरून त्यात रम. मी किंवा तू आज किंवा उद्या जाणारच आहोत, मग कशाला फुकटची चिंता करतेस. मी जरी उद्या सोबत नसलो तरी संगीत जगण्याचे कारण बनेल."

चारुच्या डोळ्यात पाण्याची उपस्थिती जाणवू लागली. 

"करते मी प्रयत्न. नक्की."

"चारू. माझंही स्वप्न आहे की तुला भान विसरून मारवा गाताना पाहणं. सूर असे निघायला हवेत की क्षण स्तब्ध होतील. वाऱ्याचाही नाद सुरेल होईल आणि तुझ्या अलापाच्या लयीला साथ देईल. त्यात इतके झोकून दे, की एखाद्या मरणोन्मुख जीवात क्षणभर का होईना जान ओतावी त्या सुरांनी. आयुष्य कधीतरी संपणार होतंच, त्याची अजिबात भीती नाही. पण यावेळी....."

"थांबा... उगाच काहीबाही बोलू नका. काही नाही होत तुम्हाला. साधा अल्सर आहे. माझ्यासाठी तुम्ही अजून खूप वर्षे पाहिजे आहात."

"हे बघ मला मरणाचं दुःख किंवा भय नाहीये. डॉक्टर काही बोलत नसले तरी त्यांचा चेहरा सांगून गेला की त्यात काहीतरी किचकट प्रॉब्लेम आहे. उलट असं वाटतं, की ज्या माणसाला आपला शेवटचा दिवस कधी आहे याची कल्पना असते ना, तोच माणूस भारी आयुष्य जगू शकतो. आणि मी तेच करणार. मग तू ठरव, की मी अजून भरपूर जगेन या खोट्या आशेत नॉर्मल जीवन जगायचं, की मी कधीतरी जाणार आहेच या जाणिवेत माझ्यासोबत आयुष्यात राहून गेलेली सुरांची एकत्र सफर करायची."

चारूलता ने तानपुरा बाजूला ठेवला आणि जयंतरावांच्या बाजूला येऊन बसली. हातात हात दिला आणि आपला त्या सफरीला होकार कळवला.

"माझी विद्यार्थिनी मोठी आणि समजूतदार झाली म्हणायची आता."

"काहीतरीच काय?"

"अजून एक सांगू? मी गाण्यांच्या मैफिली करत जगभर फिरलो पण तुझ्याशी सुरांच्या गमती जमती शेअर करायला खास असा वेळच मिळायचा नाही. खूप दिवसातून घरी परतल्यामुळे पेंडिंग राहिलेले व्यवहारच पूर्ण करण्यात वेळ जायचा आणि मग तोपर्यंत पुढच्या कार्यक्रमाची आखणी झालेली असायची. तुझ्या वाट्याला नकळत मी व्यवहार आणि संसाराची पूर्ण जबाबदारी दिली ना गं."

"हो तर... पूर्ण जग तुमच्या मैफिलींचा अगदी समोरून आनंद घ्यायचे, मला मात्र कॅसेट वर ऐकावं लागायचं. हेवा वाटायचा त्या रसिकांचा. पण आता तर तुमचा प्रत्येक क्षण माझ्याजवळ आहे. याच्यापेक्षा काहीही नको मला. आता मात्र आता मी गाणं गाईन आणि तुम्ही रसिक व्हायचं. आतापासून हृदयाचा प्रत्येक कोपरा मी या सुरांच्या हवाले करते. एक सांगा. संगीतात तर कित्येक राग आहेत, पण तुम्हाला मारवा इतका का आवडतो?"

"किती बोलू या मारव्याबद्दल...तुला आता हे माहीत आहेच की संगीतात 'प' आणि 'सा' हे स्वर अचल असतात. शक्यतो हे दोन्ही स्वर कुठल्याच रागात वर्ज्य नसतो. फक्त मारव्यामध्ये 'प' वर्ज्य आणि 'सा' खूप कमी वापरला जातो. शास्त्रीय संगीताचा पूर्ण डोलारा हे 'प' आणि 'सा' सांभाळणारे हे स्वरच न जाणवल्यामुळे, मारवा राग अपूर्णतेचा स्पर्श घेऊनच जन्माला आलाय.  गायन झाले तरी 'हरवलेलं काहीतरी अजून गवसायचं आहे' याची जाणीव होते. ती पूर्ण करता करता गायक अजून गात राहतो आणि त्यात स्वतःलाच गवसतो.  मला गायकी येते, याचा अहंकार तो एखाद्या हट्टी मित्रासारखा जवळ बसून उतरवतो. पूर्ण गायकी कुर्बान या रागावर... "

चारुलताला तिचं आयुष्य काहीसं मारव्यासारखेच वाटले. त्यांच्या लग्नाची ४० वर्षे आनंदात जाऊन सुद्धा अजूनही काहीतरी शोधायचे राहूनच गेले होते. पण कुठेतरी तिलाच वाटलं, की खरं तर नात्यात अपूर्णता असणंच चांगलं. पूर्णत्व आलं की एकमेकांच्या चुका काढण्याशिवाय काही नावीन्य राहत नाही. अपूर्णता मात्र नात्याला काहीतरी उद्देश्य देत राहते."

"चारू... कुठं हरवलीस? काय विचार करतेयस?"

"अहो... मी कुठे. तुम्हीच हरवून गेलात मारव्याचा इतका अर्थ सांगताना. मला कळली आता या मारव्याची जादू. तुम्ही त्या रागाची फक्त पध्दतच नाही सांगितली तर तो का गावा यासाठी माझ्या आयुष्यात एक ध्येय दिलंत....  "

"आणि तुझं ध्येय पूर्ण व्हायची जीवापाड वाट पाहीन मी. ज्यादिवशी तुझ्या सुरेल मनावरची खिडकी उघडून पाहशील ना तेव्हा पलीकडे आपण एक झालेले दिसू तुला.  आपल्यात काहीच अंतर नसेल. असं गात रहा......"

चारुलता मात्र भरल्या मनामुळं काहीही बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यासमोर भरल्या पावलांनी सांज येत होती. पृथ्वी बिचारी झोपेच्या राज्यात प्रवेश करत असता, सूर्य आपली मिठी हळुवार सैल करत प्रस्थानाच्या तयारीत होता. 

                        ◆◆◆ ● ◆◆◆

दिवसेंदिवस जयंतरावांची तब्येत खालावतच चालली होती. काही दिवसांतच डॉक्टरांनी आतड्याचा कॅन्सरचे निदान केले. तोपर्यंत तो कॅन्सर आता वाव मिळेल तसा पसरत चालला होता. अवघडात अवघड तानही लीलया गाणारा हा गायक आज एकेक शब्द बोलताना वेदनांशी झुंजत होता. 

"चारू..... रियाज.... थोडाच वेळ करतेयस सध्या.... मला आवाज... येतो बर का.. तुला आधीच सांगितलं होतं की एकदा तानपुरा हातात घेतलास... की तू मलाच काय स्वतःलासुद्धा विसरून जायचं."

"अहो.... तुम्ही का बोलत राहता? पोटात दुखते ना बोलताना?"

"अगं... या वेदना म्हणजे, गाण्यात कधीतरी चुकारपणा किंवा आळस केला असेल त्याची शिक्षा आहे असं समजेन. आता कळतंय की सूर गळ्यातून येत नसतात. तर पोटातून येत असतात. पण तुझ्या रियाजाच्या आवाजाने खूप सुख वाटतं बघ. बडा ख्याल गाताना मात्र अजून सुरांच्या जागा चुकतात काही ठिकाणी.. पण शिकशील.. मला खात्री आहे.. आणि हो.. अवनीच्या होणाऱ्या बाळालाही संगीताचे धडे तूच द्यायचे. सुरात रडतं अगदी ते."

"नक्की देणार. पण आता झोपा ना. औषध काम करणार नाही मग."

चारुलताच्या मांडीवर त्यांचं डोकं टेकलं होतं आणि औषधांच्या गुंगीचे साम्राज्य शरीरभर पसरू लागले. खोलीत शांतता पसरली होती आणि कुठून तरी रेडिओवर लागलेली किशोरीताई आमोणकर यांची ठुमरी ऐकू येत होती.

चारुलताला अचानक जाणवले की जयंतरावांचा श्वास जड होऊ लागला आहे. काय करावे काही सुचेनासे झाले. अमेयला बोलवावे म्हणून पटकन बाहेर आल्या. अगदी वाऱ्याच्या वेगाने पळावे वाटत होते पण  पायातले अवसान गळून पडले होते. अमेयच्या केबिनपर्यंत पोहोचायला युगांचा वेळ लागत असल्यासारखे वाटले. त्यांना पळत येत असल्याचे पाहताच तोच पटकन बाहेर आला.

काही वेळातच डॉक्टर आणि गरज लागल्यास असावी म्हणून अँम्ब्यूलन्सही होती. पण जयंतरावांनी हॉस्पिटलमध्ये जायला स्पष्ट शब्दांत नकार दिला. काहीही झाले तरी आता जगून त्याच त्याच वेदना पुन्हा अनुभवायच्या नव्हत्या. संथ होत चाललेली नाडी पाहून डॉक्टरांनीही आग्रह केला नाही. जयंतरावांचे श्वास चालू ठेवण्याचे सोपस्कार देवावर सोपवण्याशिवाय उपाय नव्हता. आता फक्त परतीची वाट होती.

अँम्ब्यूलन्स आलेली पाहताच सगळ्यांनी जयंतरावांच्या खोलीकडे धाव घेतली. सगळे काळजीत होते. आजपर्यंत या वास्तूमधून त्यांनी बऱ्याच मित्रांना आयुष्यातून निरोप दिला होता आणि त्यातलेच अजून एक पान आज उलटत होते.

                        ◆◆◆ ● ◆◆◆

आज सुरांना अवचित जागा सापडत होती. चारुलताच्या गळ्यातून जणू हार्मोनियम आणि तानपुरा जीव हरपून गात होते. तिच्या हृदयाची स्पंदने आणि मारवा एकरूप झाले होते, कारण तिच्याही आयुष्यातुन एक अचल सूर शेवटचा श्वास घेत होता. 

"पिया~~~~ घर नही~~~~ आ~~~ये~~रे~~
मेरे~~~~~ पल~~ पल~~ छिने~~~ जाये ~~"

प्रत्येक शब्दात आणि आलापामध्ये जीवनाची चाळीस वर्षे उलगडत चालली होती. जलपर्णीने नदीला झाकोळून टाकावे, तश्या त्या आठवणी मनातल्या दुःखाला बंदिस्त करू पाहत होत्या. 

बडा ख्याल आता शेवटच्या तानेवर येऊन ठेपला. चारुलताच्या आवाजात एक धार आली. आज मुरकी, मिंड अशा हरकती सफाईदार येत होत्या. समाधिस्थ शिवाची वाट पाहत कित्येक युगे नंदीने द्वारावर बसून रहावे, असेच ते सूर ठेहराव घेऊन रेंगाळत होते.

एव्हाना सावंतांच्या तबल्यावरील ताल सुरांचे सांत्वन करू पाहत होता. तिथे उभे असलेल्या लोकांचे जीव कानात येऊन ठेपले होते. अवनीही धावत पळत आली आणि आईच्या गाण्याचा आवाज ऐकून भरल्या डोळ्यांनी दारातच थबकली. हवा जोरदार वाहू लागली आणि पावसाचे तुषारांनी अवेळी हजेरी लावली. चारुलताचा जीव आता कंठात आला होता. इतके सुरेल गाऊन तिच्या गुरूला आज ते कुठे ऐकू जाणार होते. तो तर रियाजाच्या बैठकीला शेवटचा नमस्कार घालून निघालाही असेल. कदाचित त्याचाही पाय निघत नसेल. 

अगदी काही सेकंदात ती बंदिश संपणार होती. पण त्या हवेत जे हरवत चालले होते ते मात्र तिला सापडत नव्हते. तिने शेवटची तान घेण्यासाठी सूर चढवला आणि तिची समाधी लागली. सगळं काही विस्मरण झाले, सगळे जग निरव झाले आणि त्याच क्षणी जयंतरावांच्या डोळ्यात एक चेतना आली. चारुकडे भरल्या डोळ्यांनी पाहिले. त्या डोळ्यातच एक प्रेमभरी हाक होती. चारुलता त्याच क्षणी गायची थांबली, आणि पूर्ण वातावरण अंधाराप्रमाणे निपचित झाले. तिचे मन अजूनही समाधिस्थ होते. इथले कटू सत्य पाहण्यासाठी त्याला परतूच वाटत नव्हते. इतक्यात तीव्र वेदनांशी झुंजत, अडखळत्या शब्दांनी जयंतराव शेवटचं एकच वाक्य बोलू शकले.

"शाब्बास चारू... शाब्बास... मारवा पूर्ण झाला... "

काही क्षणातच श्वासातला सूर अनंताच्या प्रवासात निघून गेला आणि चारुच्या आयुष्यातला "सोबत" हा अध्याय संपला.

©विशाल पोतदार

● ◆◆◆ ● ◆◆ समाप्त ◆◆ ● ◆◆◆ ●





Tuesday, 5 March 2019

प्रेमकथा मावळत्या दिनकराची


(मी रेखाटलेला सूर्यास्त)

पूर्वेला रंगानी चिंब करून तो भास्कर आपली दिनचर्या निभावायला निघून गेला. नेहमीप्रमाणे दिवसभर धावून थकून गेला. मात्र आता थोडी चाल मंदावली.

पश्चिमेचा मात्र त्याच्या पूर्वेवरच्या मैत्रीवर जीव जळत होता. आल्यावर त्याच्यावर राग काढणारच होती. अचानक त्याची चाहूल लागली. मनात आणलेला लटका राग लगे कुठल्या कुठे पळून गेला आणि बाहेर काढून ठेवलेले रंग मुठीत भरून घेतले. 

त्याचे आगमन होताच रंगांची अशी काही चौफेर उधळण केली की सारे आसमंत एक रंगांची मयसभा बनली. तोही रंगात भिजला आणि ती सुद्धा. तो थोडासा रागवलाच. काहीतरी बोलणारच इतक्यात काही क्षण दोघांची नजर भिडली आणि दाटून आलेले प्रेम तिच्या डोळ्यामध्ये दिसले. दोघंही जवळ येऊ लागले, इतके की फक्त श्वासच ऐकू येत होते. प्रीती खुलत होती आणि अंधार दाटून येत होता. ब्रह्मांडाला आपल्या उष्णतेने जाळू शकणारा आणि प्रकाशाने दिपवून टाकणारा हा दिनकर पश्चिमेच्या शीतल मिठीत अस्त पावत होता......
                

                                     ---- ©विशाल पोतदार

टीप - वाचल्याबद्दल धन्यवाद. आवडलं?? मग अजून वाचकांशी शेअर करालच ही अपेक्षा..!!

Friday, 25 January 2019

पालवीहीन वृक्ष (लघुकथा)

आज तीन महिने झाले तो या जंगलात चालतोय. या वेड्या प्रवासात बऱ्याचश्या पायवाटा तुडवल्या, हिरव्या गालिच्यावर झोपला, गर्द सावलीत विसावला होता. उन्हाचा बदलता स्वभाव अगदी जवळून अनुभवला होता. पण आता तर फक्त पालवीहीन वृक्ष आणि त्या वृक्षांना मिठी मारलेल्या वेली दिसत होत्या. 
वेलींची घट्ट मिठी पाहून, त्याला फक्त 'ती' आठवली. ती सुद्धा अशीच घट्ट बिलगायची, अगदी थोड्या वेळासाठीही तिला सोडून न जाण्यासाठी याचना करायची.

त्याने वापरून जुना झालेला तंबू ठोकला. तंबूतल्या सावलीत जरा बरं वाटलं. तसेही, याआधी थोड्याश्या थंडी वाऱ्यात आजारी पाडणारा तो, आजकाल एवढ्या टोकाच्या वातावरणात टिकून होता. त्याने पाठ टेकवली आणि तिच्या पुस्तकाचा ड्राफ्ट वाचायला घेतला. तीन महिने त्याचं धाडसच झालं नव्हतं ड्राफ्ट उघडण्याचं. पहिलंच पान पाहिलं आणि डोळे पाणावले. तिचे शब्द म्हणजे पाण्याने भरलेले जांभळे ढग होते. पाण्याविना भेगाळलेल्या जमिनीवर त्या ढगातले चार थेंब पडावेत आणि वखवखलेल्या भूमीच्या कणाकणात मिसळून जावे तसे तिचे शब्द त्याच्या मनात सामावत होते.

पुस्तकाची प्रस्तावना अशी होती.

"
हे पुस्तक तुझ्या सोबतच्या प्रत्येक क्षणाला अर्पण..

"तुझ्याच प्रत्येक क्षणात माझा कण कण असेल..
तुझ्या हर्षात माझं हसणं असेल..
तुझ्या दुःखात माझं रडणं असेल..
माझ्याशिवाय हे आयुष्य फुलव..
रण रणत्या उन्हात देखील मी तुझ्या मिठीत असेन.."
"

आयुष्यातल्या शेवटच्या काही क्षण आधी तिनं त्याच्या हातात या पुस्तकाचा ड्राफ्ट सोपवला होता. सहा महिन्यांच्या तिच्या आजारपणात अगदी हाताच्या फोडाईतकी जपणूक केली होती तिची. शेवटी तीच्या जाण्यानं त्याची अवस्था पानझडीने काष्ठ झालेल्या झाडासारखी झाली होती.  त्याला बिलगणारी वेल तर त्याच्या आधीच निघून गेली होती. या दुःखातून थोडीशी सुटका म्हणून त्याने या तीन महिन्यांच्या हायकिंगला सुरुवात केली होती.

पुस्तक वाचता वाचता संध्याकाळ व्हायला आली, आसमंत रंगानी भरून गेला आणि वातावरण थंड हवेने भरू लागलं होतं. ते पुस्तक म्हणजे तिनं त्याचीच लव्ह स्टोरी लिहिली होती. पुस्तक बाजूला ठेवलं आणि टेंट मधून बाहेर पाहिलं तर दूरवर तीच जात होती. त्याच्या पासून दूर, अगदी त्याचा आवडत अबोली रंगाचा ड्रेस घालून. तिची ओढणी आणि केस वाऱ्यासोबत गप्पा मारत असल्यासारखे उडत होते. ती थांबली आणि त्याच्याकडं पाहून अगदी तशीच नेहमी सारखी हसली. शांत पाण्यात एखादा खडा टाकल्यावर सुंदर वलय निर्माण होतात तसं होतं तिचं हास्य. तिनं आयुष्यात हसायलाच शिकवलं होतं ना त्याला मग आता का तो रडत होता. मनात एक कल्लोळ होता तरी तो हसला. ती तशीच पुढे पुढे जात राहिली आणि दिसेनाशी झाली.

आणि तो मात्र त्या पालवीहीन वृक्षाकडं पाहत होता.



**************** समाप्त *************

टीप - वाचक म्हणजे लेखकाला शब्दाइतकेच महत्वाचे असतात. तुम्ही माझी कथा वाचलीत यासाठी मनःपूर्वक आभार. पण कशी वाटली ते सांगायला विसरू नका.

Saturday, 5 January 2019

मावळत्या क्षितिजावरची पहाट (कथा)

एक सत्तर वयाच्या आजीबाई बंगल्याच्या गेटमधून बाहेर आल्या. डोळे सुजल्यासारखे आणि हिवाळ्यात गुडघे आखडल्यामुळे पाय लंगडत होते. गेटला अडकवलेल्या लेटर बॉक्स मध्ये एक पत्र दिसलं. आजकालच्या जगात पत्र कुणी पाठवेल? त्यांनी पटकन एका अधाश्या सारखं ते पत्र बाहेर काढलं. गळ्यातला बांधलेला चष्मा घालून वाचायचा प्रयत्न केला. मजकुराची सुरुवात वाचूनच पायाखालची जमीन हलली, आणि डोळ्यात पाणी भरलं. गेट बाहेरच्याच जीर्ण वडाच्या जमिनीपर्यंत आलेल्या पारंबीला पकडून कट्टयावर बसल्या. कधी एकदा ते पत्र वाचून काढतेय असं त्यांना झालं होतं.

"प्रिय वसू....
हे माझं दुसऱ्या जगात गेल्यानंतरचं पहिलं पत्र.. तुझ्या मनात काहूर माजलं असेल, कपाळावर आठ्या पडल्या असतील. पण अगं तुला एवढ्या सहजा सहजी सोडेन का मी? आपल्या आयुष्यातील ५० वर्ष इरिटेट केलं तुला आणि मी जगातून गेलो म्हणून तो स्वभाव का सोडू? आणि वसू खरं तर इतक्या वर्षाच्या संसारात मला काही शब्द सुचलेच नाहीत पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मात्र शब्दांनी साथ दिली. तूच टोमणे मारायचीस ना एका लेखिकेचा नवरा इतका शब्द शत्रू कसा? शब्द शत्रू नव्हतो मी, पण तुझ्या शब्दांनीच हृदय भरून जायचं बघ माझं. शेवटच्या महिन्यात मात्र आता आयुष्याच्या क्षितिजावरचा तांबूस असा मावळणारा सूर्य स्पष्ट दिसतोय. मला माहित आहे की मी गेल्यावर तू मात्र ढासळून जाशील. तूच विचारायचीस ना एवढं बरं नसताना ही काय लिहितोस एवढं. मग त्यातलीच ही पत्रं (प्रेम पत्रं) तुला वेळोवेळी मिळत जातील. आणि हो, लगेच नेहमींसारखं डिटेक्टिव्ह होऊन ते कुठून येतात याचा माग घेऊ नकोस. फक्त एवढं समज की पुरुषाच्या मनात भावनेचा बांध घातल्या मुळं काही गोष्टी आयुष्यभर मांडता येत नाही.आयुष्याच्या मावळत्या क्षितिजावर पूर्ण प्रवासाच्या आठवणी, घरट्यात जाणाऱ्या पक्षासारख्या कल्ला करतात. पण पुढची येणारी पहाट अटळ असते. तेव्हाही तीच पाखरं नवीन आठवणी तयार करण्यासाठी घरट्याबाहेर पडतात. आपल्या दोघांच्या ५० वर्षांच्या आठवणी या सर्व पत्रात आहेत.

आता पहिली गोष्ट एक कर म्हणजे माझ्या कप्प्यात एक नवीन डायरी आणि पेन आहे. ते घे आणि तुझी अर्धी राहिलेली कादंबरी पूर्ण कर. Sorry.. तूला आवडत नाही तरी मी ती चोरून वाचली. आपल्या प्रेमाची कथा तुला लिहावीशी वाटली ते खूपच भावलं मनाला. कादंबरी ला नाव मात्र मी सांगेन तेच दे... "प्रेमाची पहाट".

पुढचं पत्र लवकरच मिळेल.

तुझाच दिनकर."

पत्र संपल्यावर मात्र चेहऱ्यावर एक हसू उमटलं आणि त्यांच्याकडून आपसूकच कपाट उघडलं गेलं आणि डायरीवरचं नवऱ्याच्या हस्ताक्षरातील नाव वाचलं, "लेखिका वसुधा रानडे"...

प्रेमाची पहाट आत्ता कुठे सुरू झाली होती.


टीप: कथा वाचल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास जरूर कळवा आणि शेअर करा.

Tuesday, 25 December 2018

लाचार 'लाच'


एकच आठवड्यापूर्वी अतुलचं ट्राफिक पोलीसमध्ये हवालदार म्हणून सिलेक्शन झाले होते आणि तेही मुंबई मध्ये. स्वारी जाम खूष होती, कारण एवढ्या वर्षाच्या प्रयत्नाचे फळ मिळाले होते. घरचे तर खूष होतेच पण मित्रांनी तर दोन दोन वेळा पार्टी घेतली होती. पार्टीचं कारण हे की अतुल आता मालामाल होणार, वरची कमाई होणार. पण अतुलनं निक्षून सांगितलं होतं की आपण चिरीमिरी घेणार नाही आणि जे काही काम करू ते प्रामाणिकपणे करू हे भर पार्टीमध्ये घोषितच केलं होतं.

अतुलने ट्रेनिंग तरी एकदम चांगले पार केले. त्याच्या आयुष्यातली पहिली पोस्टिंग झाली ठाणे शहर आर टी ओ मध्ये. आणि अखेर तो एवढी वाट पाहिलेला जॉइनिंगचा दिवस आला. पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट घालायची वेळ शाळेनंतर पहिल्यांदाच आली. त्याला हा ट्राफिक पोलिसांचा युनिफॉर्म मुळी अवडायचाच नाही, पण आता आवड निवड करायचा ऑप्शनच नव्हता. पहिल्याच दिवशी इन्स्पेक्टर काटकर साहेबांनी त्याला हेड कॉन्स्टेबल जनार्दन पवारांसोबत थांबायला सांगितले. पवारहे त्याला हायवे पोलिसांची वर्किंग सिस्टीम समजावून सांगू लागले. ते जसं जसं सांगू लागले. अतुलला ट्रेंनिग मधलं सगळं आठवू लागलं. वाहतुकीचे नियम, वाहतूक नियंत्रण, वाहतुकीशी संबंधित कायदे आणि दंड, इमर्जन्सी परिस्थिती हाताळण्याचा प्रोटोकॉल हे सगळं ते सांगत होते.

"हो बरोबर, ट्रेनिंग ला शिकवलं होतं हे आम्हाला."

"आत्ताचं कसलं आलंय ट्रेनिंग लेका, मुळमुळीत पोरं तुमी. एकदा का चौकात ट्राफिक कंट्रोल साठी उभा राहिलं की सगळं ट्रेनिंग बिनिंग विसरून जात्यात लोक. शिट्टी मारून मारून पोटातली हवा निघून जात्या. हिकडणं एका फोर व्हिलर वाल्याला थांबवलं की दुसरा 2 व्हीलर वाला नाक बाहेर काढतो. हे..हे..हे.. ट्रेनिंग म्हणं."

"पण सर मग आत्ता तुम्ही सगळे नियम सांगितलेच की. आणि तुम्हीच म्हणता याची गरजच नसते." 

"आरं सर बीर म्हणायला मी काय कमिशनर लागून गेलो काय. सगळे पवारच म्हणतात मला, तू पण तेच म्हण. आणि हे नवीन जॉईन झाल्यावर नियम सांगायची पद्धत आहे, म्हणून सांगतोय. पुढं ट्राफिक कंट्रोल करताना रोज नवीन नियम तूच तयार करायला लागशील."

"बर बर... चालेल... आता मी काय करु मग? म्हणजे ड्युटी कुठे असेल माझी?"

"एवढा आठवडा तुला माझ्यासोबत ड्युटी दिली आहे. ठाण्यातल्या मेन सहा ठिकाणचे ट्राफिक एरिया आपल्याला कव्हर करायचे आहेत."

"आता कुठं मग?"

"आता, तीन हात नाका. नॉन स्टॉप."

पवारांनी बाईक काढली. अतुलला, तिरके काळे पांढरे पट्टे, समोर स्पीडो मीटर च्या इथे एक काच असलेली ट्राफिक पोलिसांची बाईक खूप आवडायची. आणि आता तर स्वतः तो ट्राफिक पोलीस मध्ये आला होता म्हणजे काय मज्जाच होती. पण पवारांनी वर्णन केल्याप्रमाणे परिस्थितीची कल्पना करून त्याच्या अंगावर काटाच उभा राहिला. तीन हात नाक्याला जाताना पवारांनी मधेच बाईक एका चहाच्या टपरीवर थांबवली. दोन कटिंग चहा सांगितले आणि अतुलला घेऊन एका कोपऱ्यात उभे राहिले. थोड्याश्या बारीक आवाजात सांगू लागले.

"ऐक, आता आपली एका वेगळ्या कामाची सिस्टिम सांगतो. हे जे प्रायव्हेट बसवाले दिसतायत ना, पॅसेंजर घेऊन जाणारे. त्यांची एक वेगळी लिस्ट आहे आपल्याकडं, प्रत्येकानं हप्ता दिलाय का नाही हे आता तू बघायचं. पाहिलं १-२ महिने तुला लिस्ट बघायला लागल, पुन्हा सगळ्या गाड्यांचे नंबर, ड्रायव्हर आणि बसमालक सगळं पाठ होईल तुझं. सकाळी ११ पर्यंत आणि रात्री ६ ते ९ त्यांची वाहतूक चालू असते."

अतुलचे पाय कापायला लागले. मन घाबरं घाबरं होऊ लागलं. हप्ता?? नाही नाही, फाईन म्हणायचं असेल का यांना? एवढं उघडपणे लाच घेण्याबद्दल थोडीच बोलतील.

"म्हणजे...... अं... किती फाईन असतो त्यांना?"

त्याने बाजूच्या झाडाकडे बघत आणि चहाचा घोट घेत, थोडा विचार केला.

"अवैध प्रवासी वाहतूक केली तर २००० रुपये फाईन आहे ना?" अतुल.

पवार डोक्यावर हात मारत रागावतच म्हणाले, "आरं बाबा, माझं बोलणं ऐकू आलं न्हाई की न समजल्यासारखं करतोयस. हा.हा..हहहा.. समजलं समजलं. तुला वाटायचं की तुझ्या मनात काय आहे ते बघायचं असेल आम्हाला. पण हितं घाबरायचं काम नाही, वरून ते खाली पर्यंत सगळ्यांना हा हप्ता वाटला जातो."

"वाटला जातो?" अतुल अवाकच झाला.

त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती, डोकं ठणकायच्या मार्गावर होतं. पवारांनाही वाटलं नव्हतं की पोरगं एवढं अडाणी असेल. एखाद्या नवीन कॉन्स्टेबलला, ही हप्त्याची सिस्टिम समजावून सांगायची म्हणजे एक धर्मसंकटच असायचं आणि ती जबाबदारी काटकर साहेब त्यांच्यावरच टाकायचे. आजकाल बऱ्याच पोरांना जॉईन व्हायच्या आधीच हे माहिती असायचं पण जी पोरं छक्क्या पंज्यातली नाहीत त्यांना समजावणं त्यांच्या जीवावर यायचं. जर काही चुकीचे शब्द वापरले आणि ते पोरगं कुठं बरळत गेलं तर ३ वर्षाच्या राहिलेल्या सर्व्हिस चा बट्ट्याबोळ व्हायचा असं त्यांना नेहमी वाटायचं. आणि अश्या बाबतीत साहेब लोकं कशी हात वर करतात हे सुद्धा त्यांनी एवढ्या वर्षाच्या सर्व्हिस मध्ये पाहिलं होतं. त्यांना कळलं की ह्या पोराचा पिंड जरा वेगळा आहे.

"अरे, पाच पांडवात जसा एक तीळ सगळ्यात वाटून खाल्ला होता तसाच."

"पण ह.. हप्ता?? म्हणजे लाच घ्यायची? म... म... मी नाही घेणार."

पवारांनी डोळे मोठ्ठे केले आणि गंभीर झाले.

"ये बाबा... काय नाव तुझं? हा... अतुल देशमुख... येड घेऊन पेडगाव ला जाऊ नको. आजपर्यंत गाडी घेऊन फिरला त्यावेळी ट्राफिक पोलिसाला काय म्हणला नाही का साहेब शंभर रुपय घेऊन मिटवा ? पाचशेे ची पावती फाडण्यापेक्षा लोक शंभर रुपये देऊन खूष होतात. ते बी खूष आपण बी खूष. देताना कधी घाबरला नसशील मग आता घेताना का घाबरतोस."

अतुलला आता राग पण येत होता आणि भीती पण वाटत होती. त्याची पवारांशी डोळे मिळवायचं पण धाडस होत नव्हतं.

"मला काहीच उमजत नाहीये.  मी पावती प्रमाणेच पैसे द्यायचो. "

मग मात्र पवार चांगलेच भडकले. त्यांनी मग पोलिसी बडगाच दाखवायला सुरुवात केली.

"हे बघ. असं म्हणणारे भरपूर आले पण जाताना मात्र ह्या सिस्टिम प्रमाणं बनुनच गेले. मला म्हणलास इथपर्यंत ठीक आहे, दुसऱ्या कुणाला हे बोलू नकोस. नायतर बसशील ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात बदली होत. एवढा आठवडा तुला हे काम सांगत नाही पण पुढच्या आठवड्यात हे करावंच लागल."

त्यांचं रौद्र रूप पाहून त्यानं थोडंसं नमतं घ्यायला सुरुवात केली. त्याची कितीही प्रामाणिक राहायची इच्छा असली तरी पाण्यात राहून सुसरीशी वैर करून चालत नाही हे न समजण्याइतका तरी तो वेडा नव्हता. त्याने हो म्हटलं नाही, पण नाहीही म्हटलं नाही. बाईक वरून जाताना, रस्त्याला दिसणाऱ्या प्रत्येक ट्राफिक पोलिसांकडे बघून तो हाच विचार करायचा की हा तरी लाच न घेणारा पोलीस असेल का? कुणीच एकदम प्रामाणिक नसेल का?

थोड्या वेळाने पवार सौम्य होऊन त्याला समजावू लागले, कमी पगार पोलिसाला वरचे पैसे मिळणे किती महत्वाचे आहे हे सांगू लागले. राजकारणी लोक हजारो करोडचे घपले करतात, मग पोलिसांनी शे दोनशे रुपये घेतले तर बिघडलं कुठं हा त्यांच्या मते मोठा पॉईंट होता. तरी पण अतुलसाठी अजूनही लाच नकोच होती. ते तीन हात नाक्याच्या चौकात आले. एक प्रायव्हेट बस नाक्यावर आली आणि प्रवासी भरू लागली. पवार ड्रायव्हरला हात करून खुणावू लागले, आणि त्यानं एक चिट्ठी काढून दाखवली. ती चिट्ठी पाहून पवार गप्प बसले आणि ट्राफिक कसं सांभाळायच हे त्याला शिकवू लागले. बाकीचे दोन हवालदार त्याची मस्करी करू लागले.

"पवार, सगळं शिकवलं नं देशमुख ला? शिष्टीम सांगितली का?"

"होय तर. शिकल हळू हळू."

पवारांनी अतुलला खुणवुन सांगितलं की तो काय एकटाच यात नसणार आहे. पवारांची नजर एकदम भारी होती, समोरचा ड्रायव्हर कितीही तोऱ्यात येऊदे, पैज लावून ते सांगायचे की यांच्याकडे लायसन्स आहे की नाही. एक दोघांना बरोबर थांबवलं आणि एकाला पाचशे रुपयाच्या जागेवर तीनशे रुपयात बिना पावतीमध्ये मिटवलं. दुसऱ्यानं मात्र पोलिसात असलेल्या त्याच्या चुलतभावाच्या मावसभावाला फोन लावून पवारांकडे दिला. मग मात्र  त्याला् बिना पैसे सोडून दिलं. अतुलला एवढं तरी माहीत होतं की पोलीस खात्यात हा एक समझोता असतोच. त्याला अजून एक समजलं की लाल दिव्याची गाडी, किंवा गाडीवर "Police", "Press" असं लिहिलं असेल त्या गाड्या कधी अडवायच्या नाहीत. त्याला पटलं की खरं ट्रेनिंग आत्ताच कुठे सुरू झालं होतं.

***********    २  *************

घाबरून असो किंवा मजबुरीनं, अतुलला पाण्यातल्या सुसरीशी मैत्री करावीच लागली. पवार मात्र याला कसं बदलायला लावलं या खुशीत कॉलर टाईट करून होते. हे वरचे मिळणारे पैसे कसे विनिमय करायचे याचं पण एक तंत्र होतं. हे पैसे बँक मध्ये चुकून पण ठेवायचे नाहीत. त्या पैश्यामधून काही मोठी वस्तू विकत घ्यायची असेल तर कॅश मध्येच व्यवहार करायचे. काही  अपघाताच्या केसेस मध्ये पंचनामा बदलण्यासाठी पण मोठे पैसे मिळायचे. असे मोठे घपले पचवण्यासाठी घरातल्या कुणाच्या नावावर काही बिझिनेस दाखवून त्यातून हे उत्पन्न दाखवलं जायचं. काळा रंग चढलेला पैसा एखाद्या फालतू एजंट कडून क्षणात पांढरा व्हायचा.

गटात न बसणाऱ्या माणसाला इकडे जगणं मुश्किल होतं म्हणून अतुलनं शरणागती पत्करली. तो ही या सिस्टिमचा भाग बनला. आठवड्याचे चार ते पाच हजार रुपये पगारा व्यतिरिक्त मिळत होते. पण कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात त्याला वाटायचं की हा आपला पिंड नाही, काहीतरी चुकतंय, कुठेतरी पाय वाकडा पडतोय. पण दुसरं मन म्हणायचं की, विरोध करून कुणाचा आणि किती जणांचा करणार. सगळ्या जगाला हे दिसतंय आणि अगदी तहान लागल्यावर जसं माणूस पाणी पितो एवढ्या सहजतेने ते घडतंय. मी नाही म्हणालो तर मला कुठेतरी दूर फेकलं जाईल आणि माझ्या जागी दुसरा कुणी तरी येऊन हे पैसे घेईल.

कधी कधी तो विचार करायचा की गावी गेल्यावर त्याच्या ताईशी डोळ्याला डोळा मिळवता येईल का? या पैशाने तिच्यासाठी काही खरेदी करताना मनाला चटका बसेल का? लाच या शब्दाचा नामोल्लेख जरी झाला तरी तिची आग मस्तकात जायची. तिला कदाचित कळेल म्हणून हल्ली तो तिच्याशी बोलणं टाळायचा. आयुष्यात इतके आप्तेष्ट नातेवाईक किंवा मित्र असतात, पण एखाद्याच व्यक्तीशी हृदयाची तार इतकी जुळते की ते नातं सुरेल बनतं. आयुष्यात त्या व्यक्तीची आपल्याकडे बघण्याची नजर हीच सर्वात मोठी पावती असते. ती जागा त्याच्या हृदयात फक्त आणि फक्त ताईची होती.

म्हणता म्हणता दोन महिने झाले, सहा महिने झाले आणि तो या दुनियेत सेटल झाला. रेग्युलर प्रायव्हेट बसवाले, माल वाहतूक करणारे ट्रान्स्पोर्टर ओळखीचे बनले. वाहतूक नियंत्रण करतानाही त्याचं कामात थोडं दुर्लक्ष व्हायला लागलं होतं.

***********    ३  *************

आज अतुल आणि हवालदार कांबळे ची ड्युटी वंदना चौकात होती. रविवार असल्यामुळं मार्केट मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या टू व्हिलरची जास्तच गर्दी होती. अशावेळी दोन कामे असत, एक म्हणजे ट्राफिक कंट्रोल करणं आणि दुसरं म्हणजे नियम तोडणार्यांना पकडणं. दोघे ते काम आलटून पालटून करत. ठराविक लोकांचे दंड पावती मधून द्यायचे तर बाकीची विनापावती दंडरक्कम त्यांच्या खिशात यायची. अतुल नियम चुकवणाऱ्यांच्यावर घारीसारखी नजर ठेवून होता. दोन बिना लायसेन्स,  एक ट्रिपल सीट असे नमुने आल्या आल्याच पकडले. थोड्यावेळाने  सिग्नल लागला होता, तेवढ्यात कांबळेची नजर चुकवून एक दुचाकी स्वार सिग्नल तोडून निघाला होता, अतुलने लगेच त्याला ताडले आणि आडवे होऊन त्याला अडवला.

"अय... भाई... कुठं चालला गडबडीत.. च्यायला  आजकाल पोलीस समोर असले तरी बाईकवाले पंटर असलं डेरिंग करत्यात..."

त्या मुलाची चांगली स्पोर्ट्स बाईक होती, अंगावर टी शर्ट, जीन्स आणि किमती जॅकेट असल्यामुळं हे मोठ्या घरातलं बिघडलेलं कारटं वाटत होतं. अतुल त्याच्या जवळ गेला तेव्हा त्याला जाणवलं की हे नवाब कुठून तरी भरपूर मदिरा प्राशन करून आले आहेत. डोळे लालेलाल आणि बाईक सुद्धा आवरता आवरत नव्हती.

"ये दिवसाढवळ्या तराट पिऊन गाडी चालवतो, आणि सिग्नल पण तोडलाय चल काढ ३००० रुपये. पावती फाड." अतुल.

"हवालदार एवढ्या.... टायमाला सोडा, थोडं अर्जंट काम होतं म्हणून पार्टी मधून एकटाच.... नी.. निघालो... "

अतुल काही बोलणार एवढ्यात त्याला त्या पोराच्या सॅक मध्ये बाटली सारखं काहीतरी दिसलं. त्यानं पटकन बॅग काढून दाखवायला सांगितली. त्यानं बॅग ची तपासणी करायला सुरुवात केली तर त्यात व्होडकाच्या दोन बॉटल होत्या. ती हातात घेताच त्या पोराच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आणि त्याची दारू पण झटक्यात उतरली. त्या पोराचा चांगलाच राग आला होता, त्यालाही काय करावं सुचत नव्हतं. ट्राफिक पोलिसांना अश्या गोष्टी मध्ये पडण्याचा प्रसंग मुळात फारच दुर्मीळ.  पण ही गोष्ट किती गंभीर होती हे सुद्धा जाणून होता. त्याला वाटलं की कांबळे ना विचारावं पण ते ट्राफिक कंट्रोल मधून जागचे हलू शकत नव्हते. मग त्याने विचार केला की इथल्या ट्राफिक पोलीस फोर्स चे आद्य गुरू पवारांना फोन करावा. तो फोन करायला कानाला लावणारच तेवढ्यात तो मुलगा पायाच पडायला लागला.

" सर.. सर.. कोणाला फोन नका करू....  ही बॅग माझी नाही मित्राची आहे...."

"ये भावड्या... बापाला शिकवतो का रं तू? नाही, एवढा दूध खुळा तर वाटत नाहीस तू... चल लायसेन्स काढून दे पोलीस चौकीत जायला लागल.."

"साहेब, एक मिनिट निवांत बोलू ना.. जरा शांत व्हा.. काही तरी मिटवून घेऊ ना.. "

हा पोरगा डायरेक्ट पैश्याबद्दल  बोललेला पाहून अतुलला आश्चर्य वाटलं.

"ये काय पैशे चारतो का रे मला?? चल बिल झालं आता तुझं.. गाडी लाव साईड ला... जामीन चांगलाच १०,००० चा तरी नक्की लागेल."

"साहेब, पैसे चारण्याऐवढा मी मोठा नाही लागून गेलो.. तुम्ही मला पकडलं यातच तुमचं काम झालं. आता तुम्ही मला पोलिसात नेणार, जबानी वगैरे देणार, मग तिथे मॅटर सॉर्ट करण्यासाठी तिकडे पैशे देणार, त्यापेक्षा तुमच्या सारख्या चांगल्या पोलिसांना चार पैशे गेले म्हणून बिघडलं कुठं.. जास्त नाही ५००० रुपये कॅश आहे माझ्याकडं मिटवून टाकू. ते म्हणतात ना, 'रात गयी.. बात गयी..'.."

मनात थोडी भीती होती, पण का कुणास ठाऊक , त्याला वाटलं की असंही या पोरासाठी मोठा गंभीर मॅटर आहे. त्यानं वळून कांबळे कडे पाहिले तर त्याचं अजिबात इकडं लक्ष नव्हतं. त्यानं मन घट्ट केलं, आता चिखलात हात बुडलाच आहे तर फायदा तरी करून घेऊ. या पोराला ही अद्दल घडेल.

"बर चल काढ पैसे..."

त्या पोराला जरा हायसे वाटले. आणि खिशात कॅश असल्याचा अभिमान वाटला. त्याने तसेच पाकिटात पैसे मोजले, ५००० रुपये काढले. तळ हातात पकडून हात उलटा पकडला, आणि अतुल ने त्या उपड्या हातातल्या नोटा अलगद घेऊन एकदम वेगानं खिशात ठेवल्या. काम फत्ते..

"चला साहेब... ओळख ठेवा...."

पोराने गाडी स्टार्ट केली आणि काही क्षणात टॉप गियर वर पोहोचला आणि डोळ्याआड पण झाला. अतुलला पटतच नव्हतं की त्याने एवढा मोठा सौदा एकट्याने केला. आणि ते सुद्धा एवढ्या सोप्या रीतीनं. खिसा मस्त गरम झाला होता. १५ मिनिटांनी ड्युटी चं टायमिंग संपणार होतं, त्यानं कांबळे ना हात करूनच लवकर निघतो म्हणून खुणावले. आणि तो निघाला.

***********    ४ *************

अतुल ड्युटी संपवून घरी परतला, येतानाच तो मस्त हॉटेल मध्ये जेऊन आला होता. रात्रीचे ९.३० झाले होते. रूम पार्टनर गावी गेल्यामुळे तो एकटाच होता. दिवसभर उभा राहून कंटाळा आला होता. एकदाचा फ्रेश झाला आणि त्याला मोकळं मोकळं वाटू लागलं. बेड वर बसला आणि टी व्ही लावला. चॅनेल बदलत बदलत मराठी न्यूज चॅनेल वर आला. सध्या ठाण्याच्या लोकल निवडणुकी मुळं रोज तेच तेच राजकीय आखाडे रंगलेले असतात, त्यातलीच एक बातमी चालू होती. ती बातमी संपल्यावर एक विलक्षण बातमी झळकली, बातमी सोबतच त्याच्या चेहरयावरचे भाव बदलले होते.  झटकण जागेवरून उठला, कपडे बदलले आणि बाईक स्टार्ट करून वेगानं कुठंतरी निघून गेला.

***********    ५  *************

बातमी मध्ये सांगितलेल्या नेहरू चौकात आला तर त्याला गर्दी जमली होती. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते, डोकं दुखायला लागलं होतं. जी शंका मनात होती, तसं नसावं या साठी मन प्रार्थना करत होतं. जिवाच्या आकांताने गर्दी बाजूला सारत समोर आला आणि जे काही पाहिलं तसे त्याच्या पायातलं अवसान निघून गेलं, डोळ्यात शून्य भाव उभा राहिला. समोर एक ४-५ वर्षाची चिमुरडी मुलगी पडली होती आणि तिची आई बाजूला टाहो फोडत होती. आईच्याही पायातून रक्त येत होतं. आणि बाजूला एक मुलगा विव्हळत पडला होता. जवळच त्याची स्पोर्ट्स बाईक पडली होती. त्या गाडीची लाईट मुलीच्या इवल्याश्या निस्तेज शरीरावर पडली होती.  त्याला जी शंका होती तेच खरं निघालं होतं. त्यानं थोड्याश्या लाचे साठी सोडलेल्या बाईकनंच या माय लेकीच्या आयुष्यावर घाला घातला होता. अतुलला वाटत होतं की हे फक्त एक भयानक स्वप्न असावं, थोड्या वेळानं ताई झोपेतून उठवेल आणि म्हणेल की घोड्या उठ आता सूर्य डोक्यावर आला.  पण तसं होतच नव्हतं. ताई.... आत्ता तिची खूप गरज होती.. सगळं मन धबधब्यातल्या पाण्याप्रमानं मोकळं करावं तिच्याजवळ... सांगावं तुझा अतुल एका न सुटणाऱ्या कोड्यात सापडलाय... त्याला सुटायचंय यातून..

काही मिनिटापूर्वी केलेली चूक सुधारायची आहे... मिळेल का संधी? नाही मिळणार संधी... ही काही मिनिटापूर्वीची चूक नाही तर पिढ्यानपिढ्या ची चूक आहे... लाच या गोष्टीला 'चहा-पाण्या' इतकं सोप्या करू देणाऱ्या सिस्टिम ची होती...

हे बघ एका लाचार प्रवासाची विषारी मंजिल... 

हेच सत्य आणि हाच शेवट होता. ही जखम आयुष्याच्या शेवटपर्यंत हृदयाच्या खोलपर्यंत राहणार होती.

जर..... तर....... आणि भूतकाळाचा काहीच उपयोग नव्हता....पण भविष्य त्याच्या हातात होतं... लाच नावाची लाचारी स्वतःच्या आयुष्यात पुन्हा डोकावू देणार नव्हता आणि पुढील काळात त्या सिस्टिमविरुद्ध उभं ठाकायला तो खंबीर होणार होता.

*********** समाप्त ************

टीप - खालील कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.नामोल्लेख फक्त कथेचा भाग आहेत आणि खऱ्या व्यक्ती नाहीत. पण यात मांडलेली प्रवृत्ती मात्र खरी आहे, रोजच्या समोर दिसणाऱ्या कटू सत्यावर केलेलं भाष्य समजावं. एखादं साहित्य वाचण्यासाठी वेळ देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ती वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचे चांगले किंवा वाईट अभिप्राय हेच या कथेला दिलेला सन्मान आहे.

एप्रिल २०१७ मध्ये सुनील टोके या कॉन्स्टेबलनी हाय कोर्ट मध्ये एक जनहित याचिका जाहीर केली होती,  ज्यामध्ये ट्राफिक पोलीस मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचा लेखा जोखा पुराव्यानिशी जाहीर केला होता... त्यासंदर्भात आलेल्या बातमीची लिंक....

https://www.hindustantimes.com/mumbai-news/corruption-in-mumbai-traffic-police-additional-director-general-to-oversee-case/story-3lbqu7LTST0T2yPZR95S7H.html


Image credits : Hindustan Times