.post img {

Thursday, 11 June 2020

गुलमोहराचा झोका


आजचाही दिवस कसाबसा संपवला आणि खेळाचा पडदा पडल्यासारखा प्रकाशाने काढता पाय घेतला. गुलमोहर इवलीशी पानं मिटून झोपेची आराधना करू लागला. पण डोळा काही केल्या लागेना. ही आता रोजचीच कहाणी झाली होती. काळोखासोबत झोप हजर जरूर व्हायची, पण आल्या मार्गी दौडत परतायची. एकेकाळी बलदंड खोड आणि पिळदार फांद्यां लाभलेला सळसळता युवक. आता मात्र आयुष्यासारखीच शरीरातही पोकळता आलेली. मन तर नुसतंच भीरभिरायचं. 

काही वेळानं कुठूनतरी पिसासारखं हळुवारपणे गोंजारणारी वाऱ्याची झुळूक आली. मिटल्या पानांची झोपमोड न व्हावी, अशा अंगाईच्या लयीत गुलमोहराला झोका देऊ लागली. काजव्यांची टीमटीमती दिवटी मालवून लालभडक गुलमोहर काळ्याशार रात्रीच्या कुशीत शिरला. अंगाईचा प्रभाव दिसू लागला आणि रात्र अल्लद गडद होत असता रातकिड्यांच्या आवाजात तो घोरूही लागला. तरंगत तरंगत मनाच्या पैलतीरावर असलेल्या स्वप्नांच्या दुनियेत पोहोचला. स्वप्नात, कुणीतरी आपल्या पसरलेल्या बाहूच्या बेटकीला घट्ट झोका बांधलाय. नकट्या नाकाची आणि करवंदासारख्या डोळ्यांची छोटी परी धावत येऊन झोक्यावर स्वार झाली. थोडसं घाबरतच झोक्यावर उभी राहून, दोनचार झोके घेताच 'मी पडले तर माझे दातपण पडतील' ह्या विचाराने बाजूला येऊन हिरमसून बसली. गुलमोहराने तिच्यावर फुलांचा वर्षाव केला, फांद्या हलवून नाचून दाखवलं पण गाल फुगवून बसलेली ती ठमी उठायला तयार नाही. त्याने शक्कल लढवली आणि सारा बहर निथळून झोक्याखाली गालिचा अंथरला. परीने हळूच त्या मऊ दुलईवर पाय ठेवला आणि मग गुलमोहराची मज्जा तिच्या लक्षात आली. आता मात्र दोन्ही पाय झोक्यावर घट्ट रोवून, नाजूक हातांच्या मजबूत मुठी दोरीभोवती आवळल्या. पहिल्याच वेगवान झोक्याने गुलमोहर मोहरला. असं वाटलं की तिला कवेत घेऊन फांद्यांमधील फुलांमध्ये अलगद बसवावं. पण आता पूर्ण बहर तर तिच्या झोक्याच्या पायाशी होता. तिला झेलायला सत्वर तयार. ती तर झोक्यावर अशी बिनधास्त स्वार झाली की पुढच्या आवर्तनात एखादी चांदणीच मुठीत घेऊन परतेल की काय असं वाटावं. मुळात ती कधीच पडणार नव्हती पण त्या गालिचाशिवाय ती वाऱ्यावर स्वारही होणार नव्हती.

स्वप्नांच्या दुनियेत असतानाच कानात पक्षांची मंजुळ किलबिल प्रवेश करते आणि अजूनही झोपेत असणाऱ्या पापण्यांची कवाडे उघडू लागतात. पाहतो तर काय? रात्र फिकट होत त्याच्या अंगावरची चादर काढून घेत होती. कपाळी केशरी टिळा लावून डोंगर सजताहेत. पक्षांची किलबिल आता गोंगाटात बदलते आहे.. काही वेळ दंगा घालून ते आपापल्या मार्गी निघून जातात. 

वार्धक्यानं वाकून गेलेला गुलमोहर मात्र वाट पहातच राहतो. एकलेपणात हरवलेला. रोज खुललेला तांबूस बहर जमिनीवर विस्कटतो आणि त्याला निरस काळसर छटा येते. मात्र आज कर्रकर्र आवाज करत दोलवणाऱ्या आरामखुर्चीतून दाराबाहेर नजर रोवून बसले असतानाच मग रोज पडणारं स्वप्न एखाद्या दिवशी खरं होतं. छोटी परी धावतच येऊन त्याच्या फैलावलेल्या बाहूंच्या झोक्यात विसावते. तो पुन्हा बहरतो. बरसण्यासाठी.

******** समाप्त *********

लेखक - विशाल पोतदार
संपर्क - 9730496245

आपला अभिप्राय अमूल्य आहे


No comments:

Post a comment