.post img {

Monday, 20 July 2020

पृथ्वीचे पत्र

दादा,

कसा आहेस रे? तशी तुझी किरणं वरवरची खबरबात सांगतातच. पण मनातल्या गोष्टी स्वतःच सांगायला हव्यास ना. नाहीतर, तुझ्या मनात काय चाललं असेल याचे तर्क लावत बसते आणि मन भूतकाळातल्या पापूद्र्यात हरवत जातं. काळाच्या पडद्यामागे, एकेठिकाणी बालपण गवसलं आणि हुरहुर वाटू लागली बघ. बालपणीच्या आठवणींनी मन दाटून येतं.

तसे सृष्टीचे निर्माते आपल्याला आईबाबा म्हणून लाभले. पण माझ्या नखऱ्यांनी मात्र आईबाबांच्या किती नाके नऊ आणले होते ना. आधी तर किती तरी वर्ष तापटच होते मी, आगीचा गोळाच जणू. जरा काही मनाविरुद्ध झालं की नाकावर ज्वालामुखीच जागृत व्हायचा. आई नेहमी म्हणायची, "दादा बघ कसा शहाण्यासारखा वागतो. स्वतः कितीही त्रासात असला तरी तसा दाखवत नाही. उलट दुसऱ्याला जगण्यास चालना देतो." या सुचनांमुळं सुरुवातीला राग यायचा, पण हळूहळू तू जसा कळायला लागलास, तेव्हापासून तुझा आदरच वाटला. आता तू म्हणशील, "इतकं आभार प्रदर्शन करतेयस, माझ्याकडून काही हवंय का?" पण नाही रे. तू आमच्यासाठी आजपर्यंत जे काही केलंस. ते बोलावसं वाटलं. नऊही लहान भावंडाचं आयुष्य स्वतःच्या प्रकाशाने उजळणारा तू. प्रत्येकजण कितीही दूर असला, तरी तूझ्याशी एका अदृष्य धाग्याने बांधला गेलाय. नाहीतर आम्ही अंतराळात कुठल्या कुठे गुडूप झालो असतो. तुझे केवळ आभार मानून चालणार नाहीच, आमचं आयुष्यच सदैव तुझ्या पायी अर्पण आहे.

आज तुझे आभार मानावे वाटले कारण मी आता अनुभवतेय की आपल्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाला सांभाळणे म्हणजे किती तारेवरची कसरतच असते. जे, आई बाबा आणि तुही केलंस. हल्ली माझा व्याप भयंकर वाढलाय रे. तुझी भाचेकंपनी आता खूपच अवकळ झालीये. लहानपणी मुलं बरी असतात. आपल्यावर अवलंबून असली तरी निरागस असतात. पण मोठेपणी मात्र निरागसता हरवून एक क्रूर व्यावहारिकता येते. मानवाचं अगदी असंच झालंय. बाकी सगळेजण शिस्तीत वागतात पण हा हुशार, शहाणा म्हणत आता खूपच स्वार्थीपणे वागतोय. झाड मात्र अगदी तुझ्यासारखं आहे बघ. दुसऱ्यांसाठी जगत राहतं. मानवाला मात्र, सगळं विश्व आपल्या मालकी हक्काचं असावं असं वाटतंय. कधी शिक्षा केलीच तर अजून उफाळून उठतो. कळतच नाही, याला समजवावे तरी कसे. तसा तो वाईट नाही रे. मायाळूसुद्धा आहे, सुंदरतेची दृष्टी आहे. पण ऐशोरामात राहावं या महत्वकांक्षेने इतका पछाडलाय की त्याला आपल्या भावंडांना इजा पोहचलेली देखील जाणवत नाही. असो, मागच्या काही वर्षापासून तू जरा तापून बोलतोयस, तेव्हापासून महाराज ताळ्यावर येत आहेत. तुझी दटावणी नेहमीच कामी येते. बघू आता मानवात काय बदल घडतात का?

अरे हो.. वर्षामावशी अजूनही नेहमीसारखी चार दिवस का होईना दिलखुलास राहून जाते. तिचं ते गडगडाटी हसणं अजूनही तसंच आहे. येताना कधी मोकळ्या हाती आली तर शपथ! मला अगदी हिरवा शालू, नद्या-तलावांच्या दागिन्यांनी नटवते आणि


काही क्षणांसाठी मी पुन्हा एक अवखळ छोटी मुलगी होऊन जाते. तिचा ओलावा काळजात ठेवूनच जाते.

हे तुझी नेहमीच आठवण काढतात. मानवाच्या नवनवीन यंत्रांच्या प्रदूषणामुळे त्यांची तब्येतही बिघडत चाललीय. प्राणवायू म्हणून मुलांच्या तनामनात वावरत, आयुष्यभर फक्त त्यांच्यासाठीच जगले ना रे ते. अजून काय काय सोसायचे. झाड मनापासून त्यांची काळजी घेतेय. पण मानव जर जबाबदारीने वागला तर त्यांची सगळी काळजी दूर होईल.

आता प्रकर्षाने असं वाटत राहतं की.. तुला भेटावं, मनसोक्त गप्पा माराव्या... भांडावं.. आणि रडत पुन्हा तुलाच मिठी मारून मनातली सुख दुःख सांगावी. पण निसर्गाने वेगळ्याच चक्रात अडकवले ना रे आपल्याला. कधीकधी असे भास होतात, की माझ्या सृष्टीचा विनाश होऊन सगळं भयाण झालंय. मी एकटीच आहे. तुझा हात सुटून मी अंतराळात कुठेतरी दूर दूर चाललीय. आणि तू दिसेनासा झाला की मन भानावर येते. का होत असेल रे असं?

माझ्या बाळांसाठी मला कितीही संघर्ष करावा लागला तरी करेनच. पण कधी असं अघटित घडलंच तर.. काठोकाठ भावनांनी भरलेल्या मनाने जीवाची पर्वा न करता तुझ्याकडे धाव घेऊन तुझ्यातच विलीन होऊन जाईन. त्यावेळी ही पृथ्वी तुझाच अंश


असेल. तीच असेल माझी तुझ्याप्रती कृतज्ञता.

आता लिहिवत नाही. इथेच थांबते. स्वतःची काळजी घे. उत्तराची वाट पाहते.

तुझी,

पृथ्वी********* समाप्त **********

©विशाल पोतदारNo comments:

Post a comment