जेव्हा माझ्या मनानं मेंदूपासून सवतं राहायला सुरुवात केली. तेव्हाच खरा उपद्व्याप चालू झाला. उपद्व्याप कसला.!! उच्छादच.!!
नजर जाईल तिकडे याचा विचार चालू. त्या गोष्टीची या गोष्टीशी तुलना, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करत राहते. दुर्दैव म्हणजे सरतेशेवटी बाकी कधी शून्य रहातच नाही. कारण बाकी शून्य राहिली तर विषय संपेल आणि विषय संपल्यावर चघळायला काही नसतं.
या मनात दिवसरात्र मंथन चालूच असतं. अंतःपटलावर चित्र घोळत राहतं. विचाराला विषय मिळतो. विषयाला धुमारे फुटून काहीतरी तोडके मोडके शब्द फुलतात. पण प्रश्न राहतोच की पुढे येईल त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा का? की मनाला स्वतंत्र होण्यापासून रोखावं. पण मानवी अंश असण्याचं ते एक धडधडीत लक्षण नव्हे का? म्हणून मनाला वेगळं होण्याआधीच त्याला हाकलावं आणि पिटाळून द्यावं वाऱ्याच्या दिशेनं. खाली गेलं तर तळ गाठावा, वर गेलं तर दिगंत धुंडाळावं आणि इथेच राहिलं तर जागृत रहावं. जाणीव जिवंत ठेवून, विचार वाढावा इतकंच!
या विचारातल्या पसाऱ्यातून दोनचार शब्द उचलले की तयार होतेच की लेख, कविता, कथा वगैरे वगैरे.
©विशाल पोतदार
No comments:
Post a Comment