.post img {

Automatic Size

Monday 30 October 2017

वन बाय टू ..

कथा शीर्षक : वन बाय टू
लेखक : विशाल पोतदार

आश्लेषा आज पुन्हा त्या तलावाजवळ आली होती. तो तलाव म्हणजे त्यांच्या प्रेमाचा एक अविरत भागच झाला होता. तलावाकाठी काही छोटी छोटी झुडुपं होती. त्यात आवडण्याजोगं असं काही नव्हतं. पण आश्लेषाला त्या झुडुपातुन लपून छपून बाहेर आलेली, आणि समोरच्याकडे टवकारून पाहणारी छोटी फुलं खूप आवडायची. फुलांचा रंग पिवळा धमक आणि पाकळ्यांच्या कडांना लाल रंगाची छोटी बॉर्डर उठून दिसायची. रानफुलंच ती, त्याला ना कुठलं नाव ना गाव, पण त्या फुलातला सुंदरपणा आणि नाजुकपणा अगदी गुलाबालाही लाजवेल असा होता. रोहन तिला नेहमी म्हणायचा कि आपल्याला आयुष्यात भलेही प्रसिध्दी ना लाभो, पण प्रत्येकाला आनंद देण्याचा सुंदरपणा आपल्या स्वभावात हवा. त्या फुलाच्या बाबतीत ते तिला खरंच वाटायचं. तो अधून मधून असं काही फिलॉसॉफीकल बोलायला लागला कि खूप cute वाटायचा. ती मग त्याच्याकडे पहातच बसायची. 

आठवड्यातून एक तरी सूर्यास्त आपण इथं पहायचा असा त्यांचा अलिखित नियमच बनला होता. तिथल्या चहाच्या टपरी पासून मस्त वाफाळलेला चहा घेत घालवलेली प्रत्येक संध्याकाळ तिच्या हृदयात कोरली होती. ३ वर्षं लगच्या लगेच  कुठं पळून गेली तिला कळतंच नव्हतं. कदाचित त्यांची प्रत्येक भेट त्या तलावातच शंख शिंपले बनून राहिली असतील किंवा मग ती रानफुले झाली असतील. रोहन आता आला असता तर तो म्हणाला असता, 'अरे व्वा मॅडम काव्यमय बोलायला लागलात'. 

पण येणार आहे का तो??

अलीकडच्या ३-४ महिन्यात, त्या दोघांना तिथे येता आले नव्हते. आज तिलाच कळलं नव्हतं की तिची पावलं कशी तिकडं वळली. तिच्या नजरेने त्या रानफुलांचा माग घ्यायचा प्रयत्न केला. त्या फुलांची झाडे दिसत नव्हती. त्या जागी कुणीतरी एक नवीन कॅफे सुरू केला होता. मनात थोडंसं वाईट वाटलं, पण त्या माणसाला पोट भरण्याच्या मार्गापुढं फुलांची सुंदरता कुठून दिसणार. त्याला ते कदाचित फक्त झुडुपच दिसलं असेल. 

मनोमन तिचा तिळपापड होत होता. मनस्ताप होत होता सगळ्या बदलांचा. का नाही सगळं जसंच्या तसं रहात. सगळ्या गोष्टी का बदलायलाच हव्यात. आपलं एखाद्या गोष्टीवर मन बसायला लागेपर्यंत ती गोष्ट बदललेली असते. तिने त्यांची नेहमीची चहाची टपरी पाहिली तर नवीन कॅफे आणि हॉटेल च्या मध्ये ती अगदी दिसेनाशी झालेली. ती त्या टपरीजवळ आली. टपरीवले काका मात्र तिला नेहमीसारखे हसतमुख दिसले. त्यांना पाहून तिच्या मनाला थोडं  बरं वाटलं. पहिल्यापासून तिथं बसण्यासाठी ठोकलेल्या फळ्या आहे अश्या होत्या. जिथून सूर्यास्त दिसायचा, त्या त्यांच्या नेहमीच्या जागेवर मात्र आता दुसरं एक जोडपं बसलं होतं. तिच्या मनाची चलबिचल झाली. उभा राहूनच तिने काकांना चहा मागितला, "काका, एक स्पेशल चहावन बाय टू." पण तिचं लक्ष त्या जागेकडंच होतं. अचानक ती म्हणाली, "नाही, हाफच द्या." चहावाल्या काकांना जाणवलं की पोरीचं आज काही तरी बिनसलं आहे. आणि म्हणाले "कशाचं टेन्शन घेतलंयस पोरी, रोहन वर रागवलीस काय?" आश्लेषा ला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, "काका आम्ही ४ महिन्यात आलो नाही इकडं मग तुम्हाला अजून आमची नावं लक्षात आहेत?" चहावाले काका हसले, "अगं, माझ्या टपरी वरचा चहा पिता पिता तुम्ही एकमेकांना पसंद केलंत. लग्नानंतर तुम्ही जेव्हा चहा घ्यायला यायचा ना तेव्हा पण तुम्ही वन बाय टू चहा मागवायचा, आणि तू जेव्हा रोहन वर रागवलेली असायचीस तेव्हा मग त्याने कितीही आग्रह केला तरी चहा घ्यायची नाहीस. तुमची जोडी मला माझ्या मुलगा आणि सुनेसारखी वाटते. मग का राहणार नाही लक्षात. पण तुम्ही तलावाकाठी बसून जाताना मात्र तुझा चेहरा फुललेला असायचा. आणि जाताना खुशीत चहा घेऊनच जायची. तुमचं प्रेम म्हणजे या वन बाय टू चहासारखं आहे बघ, एकाच जीवाची दोन शरीरं असली तरी पण गोडवा तेवढाच. बर रोहनदादा कुठेय? येतोय न तो?." 

आश्लेषाच्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या. ती तळ्याकाठच्या बाकावर जाऊन बसली. का कुणास ठाऊक, पण तिच्या मनात घुसमट वाटत होती. तिला सगळं आठवत होतं. ३ वर्षापूर्वी ती दोघं पहिल्यांदा इथेच भेटली होती. दोघांच्याही घरच्यांनी आग्रह करून 'एकमेकांना फक्त भेटून तर बघा, तुम्ही हो म्हणाल तेव्हाच आम्ही लग्नाची पुढची बोलणी करू' या वाक्यावर तयार केले होते. तिला याचं आश्चर्य वाटलं होतं कि एवढा आय टी कंपनी मध्ये जॉब ला असणाऱ्या मुलाने तिला भेटण्यासाठी चहाच्या टपरीवर बोलवले होते. तिनं विचार केला होता कि एक तर हा मुलगा कंजूस असेल किंवा, फक्त बघायची Formality करायची म्हणून इथे बोलावलंय. तो जेव्हा भेटायला आला तेव्हा त्याने 'वन बाय टू ' चहा मागवला आणि मग बोलायला सुरुवात केली. त्यामागे त्याचं तत्वज्ञान हे होतं कि चहाच्या टपरीवर माणूस जे मनापासून बोलू शकतो ते त्या पोष कॅफे मध्ये नाही. तिला वाटलं हा खूपच तत्ववादी मुलगा दिसतोय. पण नंतर जेव्हा त्याने गप्पा मारायला सुरुवात केली, तेव्हा तिचे विचार कुठे गायबच झाले. त्यादिवशी त्यांनी गप्पा मारताना २ तास कसे गेले ते कळलेच नाही. जणू काही ते जुने मित्रच होते. पहिल्या दिवसातच ती त्याच्या प्रेमात पडली होती. 

पण आज मात्र तिचा रोहनवर राग राग होत होता. तिला त्याच्यावर खूप ओरडायचं होतं, पण तोच समोर नाही. सूर्यास्त झाला होता. ती चहा घेऊन तलावाकाठच्या कट्ट्यावर बसली. मंद आणि थंड हवा तिच्या हातांना स्पर्श करत होती. येवढ्यात एक वाऱ्याची झुळूक आली आणि तिच्या केसांशी खेळायला लागली. त्याचबरोबर तिला अलगद रोहनच्या हाताचा स्पर्श जाणवला. गालाला अलगद टिचकी मारून त्याचा हात तिच्या केसांशी खेळायला लागला. आश्लेषा ला राग आला आणि तिने तो स्पर्श झटकला. मागे वळून पाहते तर खरंच रोहन उभा होता. ती जागेवरून उठली आणि त्याच्यावर एकदम तीक्ष्ण कटाक्ष टाकला.

"मला आजिबात हात लावू नकोस. मला साधी बोलायची पण इच्छा नाही तुझ्याशी. आणि नेहमीची मस्का पॉलीशी आज नाही चालू देणार मी. ३ महिन्यापासून तुझी वाट पाहतेय. असं न सांगता न कळू देता असाच निघून गेलास? एवढा प्रेम करतोस ना माझ्यावर. मग का असं जीवाला लागेल असं का वागलास."

रोहनचा चेहरा तिला पुसट पुसट दिसत होता. तिला वाटलं डोळ्यातल्या पाण्यामुळे तसं दिसतंय. त्याने तिचा चेहरा त्याच्या दोन्ही हातात अलगद घेतला. त्याचे हात पिसासारखे हळुवार व रात्रीच्या हवेसारखे थंडगार वाटत होते. रोहन म्हणाला, "अगं माझी रडुबाई. मी काय केले आता. माझी चूक काय झाली हे तर कळू दे."

"This is unbelievable. एवढं करून वर काय केलं हे विचारावं? तू मला फक्त मिटिंगनिमित्त जातोय एवढं सांगून गेलास. एका आठवड्यात परत येण्याचं promise करून गेला होतास. दुसर्या दिवासापासून तुझा फोन हि बंद. रोज मी ५०-६० वेळा तरी वेड्यासारखे calls करत होते. प्रत्येकवेळी वाटायचं आता तुझा फोन चालू झाला असेल. खूप काही वाईट वाईट विचार येत होते मनात, पण तुला काय रे त्याच. नंतर न राहवून मी तुझ्या कंपनी मध्ये विचारल्यावर त्यांनी तुला USA मधली assignment दिल्याचे सांगितले. तुला बायकोची जरा पण कीव करावी वाटली नाही? तू माझा रोहन नाहीयेस, तो एवढा रुष्ठ कधीच नव्हता. आपलं पिल्लू रोज बाबा बाबा म्हणून बोलावत असतं. माझं ठीक आहे मी घेईन समजावून, पण त्याचे काय? ते बिचारे तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असते. मला खरं खरं सांग, मी आवडेनाशी झाली होती का रे?"

रोहन ने तिच्या खांद्यावर हात टाकून जवळ घेतले. "अगं आशु. तू आवडेनाशी कशी होशील. माझ्या स्वप्नातली तू परी आहेस ना. मला जावं लागलं, कारण आमच्या कंपनी मध्ये आर्मी इंटेलिजन्स ची एक assignment माझ्या देखरेखीखाली पूर्ण होणार होती. एका terrorist organization कडून अशा काही धमक्या दिल्या की आर्मी ने आम्हाला एका सुरक्षित आणि गुप्त ठिकाणी युनिट स्थापन करून दिले. एका आठवड्याचे काम ३ महिन्यांवर ढकलले गेले. गुप्तता पाळण्यासाठी प्रोजेक्ट मध्ये काम करणाऱ्या चौघांच्या घरी तुला संगीतलं तेच कारण सांगण्यात आलं. माझा जीव फक्त तुलाच पाहण्यासाठी धडपडत होता. तुझा आणि पिल्लूचा आवाज ऐकण्यासाठी, स्पर्श करण्यासाठी आसुसलो होतो. त्यावेळी मला कैक प्रकर्षाने तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव झाली.  आणि बघ मी बऱ्याच वेळा तुला सांगितलं होतं की नाही? सदैव कुणी कुणाच्या आयुष्यात नाही राहू शकत. प्रत्येकाला कधी ना कधी एकट्यानं आयुष्य दवडावे लागतेच. तू का नाही मनाला समजूत घालत करून घेत. काही वेळा हे नशीब आपल्या आयुष्यावर स्वार होतं, आणि ते चौखूर उधळलं की आपली पण त्यासोबत फरफट होते. पण मला तुझी फरफट नाही होऊ द्यायची. तू एकटं राहायची सवय लावली पाहिजेस. आपल्या पिल्लुला पण छान मोठं करायचं आहे ना. मी असो वा नसो."

रोहन अश्या गोष्टी का बोलत होता ते तिला कळतच नव्हतं. नवऱ्यापेक्षा त्यानं तिच्याशी मित्राचं नातं जास्त सांभाळलं होतं. तिच्या प्रत्येक श्वासाचा वेध घ्येण्याइतकं त्याचं तिच्यावरच प्रेम होत.  आश्लेषा च्या डोळ्यातील अश्रू आता थांबेनासे झाले. त्याला कधीही न जाऊ देण्यासाठी, तीन त्याला घट्ट मिठीत घेतलं. तीचा आणखीनच ऊर भरून आला. 

रोहन म्हणाला, "प्रत्येक वेळी माझ्यावर रागवतेस, आणि शेवटी स्वतःच रडतेस ना. माझी cute cute बायको. You are brave girl ना?"

तीन मानेनेच नाही म्हटल.

"मला बाकी काहीही माहित नाही. तू आता कुठेही जायचं नाहीस म्हणजे नाहीस. कळाले?"

रोहन ने पण तिचे डोळे पुसले आणि म्हणाला, " नाही ग जाणार. आणि गेलोच तरी माझ्या या गोड बायकोवाचून मला थोडीच लांब राहू वाटते. ही थंड हवेची झुळूक बनून तुझ्या आसपास रेंगाळत राहीन."

आश्लेषा च्या ओठी खूप छान हसू फुटले.

टपरी वाले काका मघापासून तिच्याकडे बघत होते. ती इतकी का रडत होती हेच त्यांना कळत नव्हते. ते तिला विचारायला जाणार, तेवढ्यात एक तिशीतली स्त्री तिथे आली आणि mobile वरचा फोटो दाखवत विचारू लागली, " काका इथे ही , तूम्ही या मुलीला पाहिलं का हो इथं? साधारण अर्ध्या तासापासून?"

काकांना समजेना नक्की काय झालंय, "अहो ही तर आश्लेषा ना? मघाशीच आली आहे इकडं. त्या तिथं बाकावर बसली आहे बघा. चहाचा ग्लास घेऊन तिथे कट्ट्यावर बसली. मघापासून पाहतोय, एकटीच रडतेय, आणि बडबडतेय. काय झालंय मला सांगाल का हो, माझ्या सुनेसारखी मानतो मी तिला."

ती स्त्री आश्लेषाकडे शून्य नजरेने पाहत म्हणाली, "काका, मी आश्लेषाची मोठी बहीण. काका, नियती कधी प्रेमाचा आणि सुखाचा वर्षाव करते तर कधी वाळवंटा मध्ये पण जितका रुष्ठ पण नसेल इतकं रुष्ठ वागते. तसच झालं यांच्या संसाराचं. तीन महिन्यापूर्वी रोहनची कंपनी एका राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रोजेक्ट वर काम करत होता. ती काळजी करेल म्हणून त्यानं त्यातलं आश्लेषाला काहीच सांगितलं नव्हतं. आर्मीने त्यांना एका सुरक्षित स्थळी हलवलं होतं. पण प्रोजेक्ट पूर्ण करून परतत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. रोहनच्या खांद्याला २ गोळ्या लागल्या व एक गोळी त्याच्या डोक्याला घासून गेली. तो वाचला खरं आणि तेव्हापासून तो कोमात आहे. तो कधी शुद्धीवर येईल हे डॉक्टर ही सांगू शकत नाहीयेत.
त्या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम होत कि त्याची ती अवस्था पाहून तिच्या मनाचा समतोल ढळला. ती बिचारी त्याच्या शुद्धीवर येण्याची प्रत्येक क्षण वाट पाहतेय हो. इतर वेळी नॉर्मल असते पण मग कधी कधी तिचा समतोल ढळतो आणि एकटीच त्याच्याशी कल्पनेत भांडत बसते. खूप रडते. पण माहिती नाही काआज या तलावा काठी तिचा चेहरा फुललेला दिसतोय. तिला असं हसताना पाहून खूप छान वाटतंय."

आश्लेषा ने तिच्या ताईला आलेले पाहिले आणि अचानक शुध्दीवर आली. पुसट दिसणारा रोहन आता दिसेनासा झाला. हवा आणखीनच थंड झाली होती. त्या हवेचा स्पर्श तिला रोहनच्या स्पर्शासारखं वाटत होता. तिला कळतंच नव्हतं हा तिचा भास होता की खरंच रोहन दोन क्षण तिच्या जवळ आला होता.  ताई जवळ आली आणि तिच्या शेजारी बसली. तिच्या गालावरून हात फिरवत तिला मिठीत घेतलं. 

आश्लेषा हसून म्हणाली, " ताई मी प्रॉमिस करते. मी आता नाही रडणार. मला माहिती आहे रोहन माझ्यापासून कितीही दूर गेला ना तरी त्याचं प्रेम माझ्या आसपासच रेंगाळत राहिल. मला हसवत राहील." 


ताई ने तिला घट्ट मिठी मारली आणि नकळत दोघींच्या चेहऱ्यावर हसू आले. चहावाल्या काकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. एवढ्या चांगल्या लक्ष्मी नारायणासारख्या जोडीची हि अवस्था व्हावी हेच पटत नव्हत. पण त्यांना हे मनापसुन वाटलं कि ती दोघं एक दिवस एकत्र हसत येतील कुठल्यातरी एका संध्याकाळी. वन बाय टू चहा घ्यायला.




No comments:

Post a Comment