एकच आठवड्यापूर्वी अतुलचं ट्राफिक पोलीसमध्ये हवालदार म्हणून सिलेक्शन झाले होते आणि तेही मुंबई मध्ये. स्वारी जाम खूष होती, कारण एवढ्या वर्षाच्या प्रयत्नाचे फळ मिळाले होते. घरचे तर खूष होतेच पण मित्रांनी तर दोन दोन वेळा पार्टी घेतली होती. पार्टीचं कारण हे की अतुल आता मालामाल होणार, वरची कमाई होणार. पण अतुलनं निक्षून सांगितलं होतं की आपण चिरीमिरी घेणार नाही आणि जे काही काम करू ते प्रामाणिकपणे करू हे भर पार्टीमध्ये घोषितच केलं होतं.
अतुलने ट्रेनिंग तरी एकदम चांगले पार केले. त्याच्या आयुष्यातली पहिली पोस्टिंग झाली ठाणे शहर आर टी ओ मध्ये. आणि अखेर तो एवढी वाट पाहिलेला जॉइनिंगचा दिवस आला. पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट घालायची वेळ शाळेनंतर पहिल्यांदाच आली. त्याला हा ट्राफिक पोलिसांचा युनिफॉर्म मुळी अवडायचाच नाही, पण आता आवड निवड करायचा ऑप्शनच नव्हता. पहिल्याच दिवशी इन्स्पेक्टर काटकर साहेबांनी त्याला हेड कॉन्स्टेबल जनार्दन पवारांसोबत थांबायला सांगितले. पवारहे त्याला हायवे पोलिसांची वर्किंग सिस्टीम समजावून सांगू लागले. ते जसं जसं सांगू लागले. अतुलला ट्रेंनिग मधलं सगळं आठवू लागलं. वाहतुकीचे नियम, वाहतूक नियंत्रण, वाहतुकीशी संबंधित कायदे आणि दंड, इमर्जन्सी परिस्थिती हाताळण्याचा प्रोटोकॉल हे सगळं ते सांगत होते.
"हो बरोबर, ट्रेनिंग ला शिकवलं होतं हे आम्हाला."
"आत्ताचं कसलं आलंय ट्रेनिंग लेका, मुळमुळीत पोरं तुमी. एकदा का चौकात ट्राफिक कंट्रोल साठी उभा राहिलं की सगळं ट्रेनिंग बिनिंग विसरून जात्यात लोक. शिट्टी मारून मारून पोटातली हवा निघून जात्या. हिकडणं एका फोर व्हिलर वाल्याला थांबवलं की दुसरा 2 व्हीलर वाला नाक बाहेर काढतो. हे..हे..हे.. ट्रेनिंग म्हणं."
"पण सर मग आत्ता तुम्ही सगळे नियम सांगितलेच की. आणि तुम्हीच म्हणता याची गरजच नसते."
"आरं सर बीर म्हणायला मी काय कमिशनर लागून गेलो काय. सगळे पवारच म्हणतात मला, तू पण तेच म्हण. आणि हे नवीन जॉईन झाल्यावर नियम सांगायची पद्धत आहे, म्हणून सांगतोय. पुढं ट्राफिक कंट्रोल करताना रोज नवीन नियम तूच तयार करायला लागशील."
"बर बर... चालेल... आता मी काय करु मग? म्हणजे ड्युटी कुठे असेल माझी?"
"एवढा आठवडा तुला माझ्यासोबत ड्युटी दिली आहे. ठाण्यातल्या मेन सहा ठिकाणचे ट्राफिक एरिया आपल्याला कव्हर करायचे आहेत."
"आता कुठं मग?"
"आता, तीन हात नाका. नॉन स्टॉप."
पवारांनी बाईक काढली. अतुलला, तिरके काळे पांढरे पट्टे, समोर स्पीडो मीटर च्या इथे एक काच असलेली ट्राफिक पोलिसांची बाईक खूप आवडायची. आणि आता तर स्वतः तो ट्राफिक पोलीस मध्ये आला होता म्हणजे काय मज्जाच होती. पण पवारांनी वर्णन केल्याप्रमाणे परिस्थितीची कल्पना करून त्याच्या अंगावर काटाच उभा राहिला. तीन हात नाक्याला जाताना पवारांनी मधेच बाईक एका चहाच्या टपरीवर थांबवली. दोन कटिंग चहा सांगितले आणि अतुलला घेऊन एका कोपऱ्यात उभे राहिले. थोड्याश्या बारीक आवाजात सांगू लागले.
"ऐक, आता आपली एका वेगळ्या कामाची सिस्टिम सांगतो. हे जे प्रायव्हेट बसवाले दिसतायत ना, पॅसेंजर घेऊन जाणारे. त्यांची एक वेगळी लिस्ट आहे आपल्याकडं, प्रत्येकानं हप्ता दिलाय का नाही हे आता तू बघायचं. पाहिलं १-२ महिने तुला लिस्ट बघायला लागल, पुन्हा सगळ्या गाड्यांचे नंबर, ड्रायव्हर आणि बसमालक सगळं पाठ होईल तुझं. सकाळी ११ पर्यंत आणि रात्री ६ ते ९ त्यांची वाहतूक चालू असते."
अतुलचे पाय कापायला लागले. मन घाबरं घाबरं होऊ लागलं. हप्ता?? नाही नाही, फाईन म्हणायचं असेल का यांना? एवढं उघडपणे लाच घेण्याबद्दल थोडीच बोलतील.
"म्हणजे...... अं... किती फाईन असतो त्यांना?"
त्याने बाजूच्या झाडाकडे बघत आणि चहाचा घोट घेत, थोडा विचार केला.
"अवैध प्रवासी वाहतूक केली तर २००० रुपये फाईन आहे ना?" अतुल.
पवार डोक्यावर हात मारत रागावतच म्हणाले, "आरं बाबा, माझं बोलणं ऐकू आलं न्हाई की न समजल्यासारखं करतोयस. हा.हा..हहहा.. समजलं समजलं. तुला वाटायचं की तुझ्या मनात काय आहे ते बघायचं असेल आम्हाला. पण हितं घाबरायचं काम नाही, वरून ते खाली पर्यंत सगळ्यांना हा हप्ता वाटला जातो."
"वाटला जातो?" अतुल अवाकच झाला.
त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती, डोकं ठणकायच्या मार्गावर होतं. पवारांनाही वाटलं नव्हतं की पोरगं एवढं अडाणी असेल. एखाद्या नवीन कॉन्स्टेबलला, ही हप्त्याची सिस्टिम समजावून सांगायची म्हणजे एक धर्मसंकटच असायचं आणि ती जबाबदारी काटकर साहेब त्यांच्यावरच टाकायचे. आजकाल बऱ्याच पोरांना जॉईन व्हायच्या आधीच हे माहिती असायचं पण जी पोरं छक्क्या पंज्यातली नाहीत त्यांना समजावणं त्यांच्या जीवावर यायचं. जर काही चुकीचे शब्द वापरले आणि ते पोरगं कुठं बरळत गेलं तर ३ वर्षाच्या राहिलेल्या सर्व्हिस चा बट्ट्याबोळ व्हायचा असं त्यांना नेहमी वाटायचं. आणि अश्या बाबतीत साहेब लोकं कशी हात वर करतात हे सुद्धा त्यांनी एवढ्या वर्षाच्या सर्व्हिस मध्ये पाहिलं होतं. त्यांना कळलं की ह्या पोराचा पिंड जरा वेगळा आहे.
"अरे, पाच पांडवात जसा एक तीळ सगळ्यात वाटून खाल्ला होता तसाच."
"पण ह.. हप्ता?? म्हणजे लाच घ्यायची? म... म... मी नाही घेणार."
पवारांनी डोळे मोठ्ठे केले आणि गंभीर झाले.
"ये बाबा... काय नाव तुझं? हा... अतुल देशमुख... येड घेऊन पेडगाव ला जाऊ नको. आजपर्यंत गाडी घेऊन फिरला त्यावेळी ट्राफिक पोलिसाला काय म्हणला नाही का साहेब शंभर रुपय घेऊन मिटवा ? पाचशेे ची पावती फाडण्यापेक्षा लोक शंभर रुपये देऊन खूष होतात. ते बी खूष आपण बी खूष. देताना कधी घाबरला नसशील मग आता घेताना का घाबरतोस."
अतुलला आता राग पण येत होता आणि भीती पण वाटत होती. त्याची पवारांशी डोळे मिळवायचं पण धाडस होत नव्हतं.
"मला काहीच उमजत नाहीये. मी पावती प्रमाणेच पैसे द्यायचो. "
मग मात्र पवार चांगलेच भडकले. त्यांनी मग पोलिसी बडगाच दाखवायला सुरुवात केली.
"हे बघ. असं म्हणणारे भरपूर आले पण जाताना मात्र ह्या सिस्टिम प्रमाणं बनुनच गेले. मला म्हणलास इथपर्यंत ठीक आहे, दुसऱ्या कुणाला हे बोलू नकोस. नायतर बसशील ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात बदली होत. एवढा आठवडा तुला हे काम सांगत नाही पण पुढच्या आठवड्यात हे करावंच लागल."
त्यांचं रौद्र रूप पाहून त्यानं थोडंसं नमतं घ्यायला सुरुवात केली. त्याची कितीही प्रामाणिक राहायची इच्छा असली तरी पाण्यात राहून सुसरीशी वैर करून चालत नाही हे न समजण्याइतका तरी तो वेडा नव्हता. त्याने हो म्हटलं नाही, पण नाहीही म्हटलं नाही. बाईक वरून जाताना, रस्त्याला दिसणाऱ्या प्रत्येक ट्राफिक पोलिसांकडे बघून तो हाच विचार करायचा की हा तरी लाच न घेणारा पोलीस असेल का? कुणीच एकदम प्रामाणिक नसेल का?
थोड्या वेळाने पवार सौम्य होऊन त्याला समजावू लागले, कमी पगार पोलिसाला वरचे पैसे मिळणे किती महत्वाचे आहे हे सांगू लागले. राजकारणी लोक हजारो करोडचे घपले करतात, मग पोलिसांनी शे दोनशे रुपये घेतले तर बिघडलं कुठं हा त्यांच्या मते मोठा पॉईंट होता. तरी पण अतुलसाठी अजूनही लाच नकोच होती. ते तीन हात नाक्याच्या चौकात आले. एक प्रायव्हेट बस नाक्यावर आली आणि प्रवासी भरू लागली. पवार ड्रायव्हरला हात करून खुणावू लागले, आणि त्यानं एक चिट्ठी काढून दाखवली. ती चिट्ठी पाहून पवार गप्प बसले आणि ट्राफिक कसं सांभाळायच हे त्याला शिकवू लागले. बाकीचे दोन हवालदार त्याची मस्करी करू लागले.
"पवार, सगळं शिकवलं नं देशमुख ला? शिष्टीम सांगितली का?"
"होय तर. शिकल हळू हळू."
पवारांनी अतुलला खुणवुन सांगितलं की तो काय एकटाच यात नसणार आहे. पवारांची नजर एकदम भारी होती, समोरचा ड्रायव्हर कितीही तोऱ्यात येऊदे, पैज लावून ते सांगायचे की यांच्याकडे लायसन्स आहे की नाही. एक दोघांना बरोबर थांबवलं आणि एकाला पाचशे रुपयाच्या जागेवर तीनशे रुपयात बिना पावतीमध्ये मिटवलं. दुसऱ्यानं मात्र पोलिसात असलेल्या त्याच्या चुलतभावाच्या मावसभावाला फोन लावून पवारांकडे दिला. मग मात्र त्याला् बिना पैसे सोडून दिलं. अतुलला एवढं तरी माहीत होतं की पोलीस खात्यात हा एक समझोता असतोच. त्याला अजून एक समजलं की लाल दिव्याची गाडी, किंवा गाडीवर "Police", "Press" असं लिहिलं असेल त्या गाड्या कधी अडवायच्या नाहीत. त्याला पटलं की खरं ट्रेनिंग आत्ताच कुठे सुरू झालं होतं.
*********** २ *************
घाबरून असो किंवा मजबुरीनं, अतुलला पाण्यातल्या सुसरीशी मैत्री करावीच लागली. पवार मात्र याला कसं बदलायला लावलं या खुशीत कॉलर टाईट करून होते. हे वरचे मिळणारे पैसे कसे विनिमय करायचे याचं पण एक तंत्र होतं. हे पैसे बँक मध्ये चुकून पण ठेवायचे नाहीत. त्या पैश्यामधून काही मोठी वस्तू विकत घ्यायची असेल तर कॅश मध्येच व्यवहार करायचे. काही अपघाताच्या केसेस मध्ये पंचनामा बदलण्यासाठी पण मोठे पैसे मिळायचे. असे मोठे घपले पचवण्यासाठी घरातल्या कुणाच्या नावावर काही बिझिनेस दाखवून त्यातून हे उत्पन्न दाखवलं जायचं. काळा रंग चढलेला पैसा एखाद्या फालतू एजंट कडून क्षणात पांढरा व्हायचा.
गटात न बसणाऱ्या माणसाला इकडे जगणं मुश्किल होतं म्हणून अतुलनं शरणागती पत्करली. तो ही या सिस्टिमचा भाग बनला. आठवड्याचे चार ते पाच हजार रुपये पगारा व्यतिरिक्त मिळत होते. पण कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात त्याला वाटायचं की हा आपला पिंड नाही, काहीतरी चुकतंय, कुठेतरी पाय वाकडा पडतोय. पण दुसरं मन म्हणायचं की, विरोध करून कुणाचा आणि किती जणांचा करणार. सगळ्या जगाला हे दिसतंय आणि अगदी तहान लागल्यावर जसं माणूस पाणी पितो एवढ्या सहजतेने ते घडतंय. मी नाही म्हणालो तर मला कुठेतरी दूर फेकलं जाईल आणि माझ्या जागी दुसरा कुणी तरी येऊन हे पैसे घेईल.
कधी कधी तो विचार करायचा की गावी गेल्यावर त्याच्या ताईशी डोळ्याला डोळा मिळवता येईल का? या पैशाने तिच्यासाठी काही खरेदी करताना मनाला चटका बसेल का? लाच या शब्दाचा नामोल्लेख जरी झाला तरी तिची आग मस्तकात जायची. तिला कदाचित कळेल म्हणून हल्ली तो तिच्याशी बोलणं टाळायचा. आयुष्यात इतके आप्तेष्ट नातेवाईक किंवा मित्र असतात, पण एखाद्याच व्यक्तीशी हृदयाची तार इतकी जुळते की ते नातं सुरेल बनतं. आयुष्यात त्या व्यक्तीची आपल्याकडे बघण्याची नजर हीच सर्वात मोठी पावती असते. ती जागा त्याच्या हृदयात फक्त आणि फक्त ताईची होती.
म्हणता म्हणता दोन महिने झाले, सहा महिने झाले आणि तो या दुनियेत सेटल झाला. रेग्युलर प्रायव्हेट बसवाले, माल वाहतूक करणारे ट्रान्स्पोर्टर ओळखीचे बनले. वाहतूक नियंत्रण करतानाही त्याचं कामात थोडं दुर्लक्ष व्हायला लागलं होतं.
*********** ३ *************
आज अतुल आणि हवालदार कांबळे ची ड्युटी वंदना चौकात होती. रविवार असल्यामुळं मार्केट मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या टू व्हिलरची जास्तच गर्दी होती. अशावेळी दोन कामे असत, एक म्हणजे ट्राफिक कंट्रोल करणं आणि दुसरं म्हणजे नियम तोडणार्यांना पकडणं. दोघे ते काम आलटून पालटून करत. ठराविक लोकांचे दंड पावती मधून द्यायचे तर बाकीची विनापावती दंडरक्कम त्यांच्या खिशात यायची. अतुल नियम चुकवणाऱ्यांच्यावर घारीसारखी नजर ठेवून होता. दोन बिना लायसेन्स, एक ट्रिपल सीट असे नमुने आल्या आल्याच पकडले. थोड्यावेळाने सिग्नल लागला होता, तेवढ्यात कांबळेची नजर चुकवून एक दुचाकी स्वार सिग्नल तोडून निघाला होता, अतुलने लगेच त्याला ताडले आणि आडवे होऊन त्याला अडवला.
"अय... भाई... कुठं चालला गडबडीत.. च्यायला आजकाल पोलीस समोर असले तरी बाईकवाले पंटर असलं डेरिंग करत्यात..."
त्या मुलाची चांगली स्पोर्ट्स बाईक होती, अंगावर टी शर्ट, जीन्स आणि किमती जॅकेट असल्यामुळं हे मोठ्या घरातलं बिघडलेलं कारटं वाटत होतं. अतुल त्याच्या जवळ गेला तेव्हा त्याला जाणवलं की हे नवाब कुठून तरी भरपूर मदिरा प्राशन करून आले आहेत. डोळे लालेलाल आणि बाईक सुद्धा आवरता आवरत नव्हती.
"ये दिवसाढवळ्या तराट पिऊन गाडी चालवतो, आणि सिग्नल पण तोडलाय चल काढ ३००० रुपये. पावती फाड." अतुल.
"हवालदार एवढ्या.... टायमाला सोडा, थोडं अर्जंट काम होतं म्हणून पार्टी मधून एकटाच.... नी.. निघालो... "
अतुल काही बोलणार एवढ्यात त्याला त्या पोराच्या सॅक मध्ये बाटली सारखं काहीतरी दिसलं. त्यानं पटकन बॅग काढून दाखवायला सांगितली. त्यानं बॅग ची तपासणी करायला सुरुवात केली तर त्यात व्होडकाच्या दोन बॉटल होत्या. ती हातात घेताच त्या पोराच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आणि त्याची दारू पण झटक्यात उतरली. त्या पोराचा चांगलाच राग आला होता, त्यालाही काय करावं सुचत नव्हतं. ट्राफिक पोलिसांना अश्या गोष्टी मध्ये पडण्याचा प्रसंग मुळात फारच दुर्मीळ. पण ही गोष्ट किती गंभीर होती हे सुद्धा जाणून होता. त्याला वाटलं की कांबळे ना विचारावं पण ते ट्राफिक कंट्रोल मधून जागचे हलू शकत नव्हते. मग त्याने विचार केला की इथल्या ट्राफिक पोलीस फोर्स चे आद्य गुरू पवारांना फोन करावा. तो फोन करायला कानाला लावणारच तेवढ्यात तो मुलगा पायाच पडायला लागला.
" सर.. सर.. कोणाला फोन नका करू.... ही बॅग माझी नाही मित्राची आहे...."
"ये भावड्या... बापाला शिकवतो का रं तू? नाही, एवढा दूध खुळा तर वाटत नाहीस तू... चल लायसेन्स काढून दे पोलीस चौकीत जायला लागल.."
"साहेब, एक मिनिट निवांत बोलू ना.. जरा शांत व्हा.. काही तरी मिटवून घेऊ ना.. "
हा पोरगा डायरेक्ट पैश्याबद्दल बोललेला पाहून अतुलला आश्चर्य वाटलं.
"ये काय पैशे चारतो का रे मला?? चल बिल झालं आता तुझं.. गाडी लाव साईड ला... जामीन चांगलाच १०,००० चा तरी नक्की लागेल."
"साहेब, पैसे चारण्याऐवढा मी मोठा नाही लागून गेलो.. तुम्ही मला पकडलं यातच तुमचं काम झालं. आता तुम्ही मला पोलिसात नेणार, जबानी वगैरे देणार, मग तिथे मॅटर सॉर्ट करण्यासाठी तिकडे पैशे देणार, त्यापेक्षा तुमच्या सारख्या चांगल्या पोलिसांना चार पैशे गेले म्हणून बिघडलं कुठं.. जास्त नाही ५००० रुपये कॅश आहे माझ्याकडं मिटवून टाकू. ते म्हणतात ना, 'रात गयी.. बात गयी..'.."
मनात थोडी भीती होती, पण का कुणास ठाऊक , त्याला वाटलं की असंही या पोरासाठी मोठा गंभीर मॅटर आहे. त्यानं वळून कांबळे कडे पाहिले तर त्याचं अजिबात इकडं लक्ष नव्हतं. त्यानं मन घट्ट केलं, आता चिखलात हात बुडलाच आहे तर फायदा तरी करून घेऊ. या पोराला ही अद्दल घडेल.
"बर चल काढ पैसे..."
त्या पोराला जरा हायसे वाटले. आणि खिशात कॅश असल्याचा अभिमान वाटला. त्याने तसेच पाकिटात पैसे मोजले, ५००० रुपये काढले. तळ हातात पकडून हात उलटा पकडला, आणि अतुल ने त्या उपड्या हातातल्या नोटा अलगद घेऊन एकदम वेगानं खिशात ठेवल्या. काम फत्ते..
"चला साहेब... ओळख ठेवा...."
पोराने गाडी स्टार्ट केली आणि काही क्षणात टॉप गियर वर पोहोचला आणि डोळ्याआड पण झाला. अतुलला पटतच नव्हतं की त्याने एवढा मोठा सौदा एकट्याने केला. आणि ते सुद्धा एवढ्या सोप्या रीतीनं. खिसा मस्त गरम झाला होता. १५ मिनिटांनी ड्युटी चं टायमिंग संपणार होतं, त्यानं कांबळे ना हात करूनच लवकर निघतो म्हणून खुणावले. आणि तो निघाला.
*********** ४ *************
अतुल ड्युटी संपवून घरी परतला, येतानाच तो मस्त हॉटेल मध्ये जेऊन आला होता. रात्रीचे ९.३० झाले होते. रूम पार्टनर गावी गेल्यामुळे तो एकटाच होता. दिवसभर उभा राहून कंटाळा आला होता. एकदाचा फ्रेश झाला आणि त्याला मोकळं मोकळं वाटू लागलं. बेड वर बसला आणि टी व्ही लावला. चॅनेल बदलत बदलत मराठी न्यूज चॅनेल वर आला. सध्या ठाण्याच्या लोकल निवडणुकी मुळं रोज तेच तेच राजकीय आखाडे रंगलेले असतात, त्यातलीच एक बातमी चालू होती. ती बातमी संपल्यावर एक विलक्षण बातमी झळकली, बातमी सोबतच त्याच्या चेहरयावरचे भाव बदलले होते. झटकण जागेवरून उठला, कपडे बदलले आणि बाईक स्टार्ट करून वेगानं कुठंतरी निघून गेला.
*********** ५ *************
बातमी मध्ये सांगितलेल्या नेहरू चौकात आला तर त्याला गर्दी जमली होती. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते, डोकं दुखायला लागलं होतं. जी शंका मनात होती, तसं नसावं या साठी मन प्रार्थना करत होतं. जिवाच्या आकांताने गर्दी बाजूला सारत समोर आला आणि जे काही पाहिलं तसे त्याच्या पायातलं अवसान निघून गेलं, डोळ्यात शून्य भाव उभा राहिला. समोर एक ४-५ वर्षाची चिमुरडी मुलगी पडली होती आणि तिची आई बाजूला टाहो फोडत होती. आईच्याही पायातून रक्त येत होतं. आणि बाजूला एक मुलगा विव्हळत पडला होता. जवळच त्याची स्पोर्ट्स बाईक पडली होती. त्या गाडीची लाईट मुलीच्या इवल्याश्या निस्तेज शरीरावर पडली होती. त्याला जी शंका होती तेच खरं निघालं होतं. त्यानं थोड्याश्या लाचे साठी सोडलेल्या बाईकनंच या माय लेकीच्या आयुष्यावर घाला घातला होता. अतुलला वाटत होतं की हे फक्त एक भयानक स्वप्न असावं, थोड्या वेळानं ताई झोपेतून उठवेल आणि म्हणेल की घोड्या उठ आता सूर्य डोक्यावर आला. पण तसं होतच नव्हतं. ताई.... आत्ता तिची खूप गरज होती.. सगळं मन धबधब्यातल्या पाण्याप्रमानं मोकळं करावं तिच्याजवळ... सांगावं तुझा अतुल एका न सुटणाऱ्या कोड्यात सापडलाय... त्याला सुटायचंय यातून..
काही मिनिटापूर्वी केलेली चूक सुधारायची आहे... मिळेल का संधी? नाही मिळणार संधी... ही काही मिनिटापूर्वीची चूक नाही तर पिढ्यानपिढ्या ची चूक आहे... लाच या गोष्टीला 'चहा-पाण्या' इतकं सोप्या करू देणाऱ्या सिस्टिम ची होती...
हे बघ एका लाचार प्रवासाची विषारी मंजिल...
हेच सत्य आणि हाच शेवट होता. ही जखम आयुष्याच्या शेवटपर्यंत हृदयाच्या खोलपर्यंत राहणार होती.
जर..... तर....... आणि भूतकाळाचा काहीच उपयोग नव्हता....पण भविष्य त्याच्या हातात होतं... लाच नावाची लाचारी स्वतःच्या आयुष्यात पुन्हा डोकावू देणार नव्हता आणि पुढील काळात त्या सिस्टिमविरुद्ध उभं ठाकायला तो खंबीर होणार होता.
*********** समाप्त ************
टीप - खालील कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.नामोल्लेख फक्त कथेचा भाग आहेत आणि खऱ्या व्यक्ती नाहीत. पण यात मांडलेली प्रवृत्ती मात्र खरी आहे, रोजच्या समोर दिसणाऱ्या कटू सत्यावर केलेलं भाष्य समजावं. एखादं साहित्य वाचण्यासाठी वेळ देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ती वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचे चांगले किंवा वाईट अभिप्राय हेच या कथेला दिलेला सन्मान आहे.
एप्रिल २०१७ मध्ये सुनील टोके या कॉन्स्टेबलनी हाय कोर्ट मध्ये एक जनहित याचिका जाहीर केली होती, ज्यामध्ये ट्राफिक पोलीस मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचा लेखा जोखा पुराव्यानिशी जाहीर केला होता... त्यासंदर्भात आलेल्या बातमीची लिंक....
https://www.hindustantimes.com/mumbai-news/corruption-in-mumbai-traffic-police-additional-director-general-to-oversee-case/story-3lbqu7LTST0T2yPZR95S7H.html
एप्रिल २०१७ मध्ये सुनील टोके या कॉन्स्टेबलनी हाय कोर्ट मध्ये एक जनहित याचिका जाहीर केली होती, ज्यामध्ये ट्राफिक पोलीस मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचा लेखा जोखा पुराव्यानिशी जाहीर केला होता... त्यासंदर्भात आलेल्या बातमीची लिंक....
https://www.hindustantimes.com/mumbai-news/corruption-in-mumbai-traffic-police-additional-director-general-to-oversee-case/story-3lbqu7LTST0T2yPZR95S7H.html
Image credits : Hindustan Times |
No comments:
Post a Comment