.post img {

Automatic Size

Saturday, 5 January 2019

मावळत्या क्षितिजावरची पहाट (कथा)

एक सत्तर वयाच्या आजीबाई बंगल्याच्या गेटमधून बाहेर आल्या. डोळे सुजल्यासारखे आणि हिवाळ्यात गुडघे आखडल्यामुळे पाय लंगडत होते. गेटला अडकवलेल्या लेटर बॉक्स मध्ये एक पत्र दिसलं. आजकालच्या जगात पत्र कुणी पाठवेल? त्यांनी पटकन एका अधाश्या सारखं ते पत्र बाहेर काढलं. गळ्यातला बांधलेला चष्मा घालून वाचायचा प्रयत्न केला. मजकुराची सुरुवात वाचूनच पायाखालची जमीन हलली, आणि डोळ्यात पाणी भरलं. गेट बाहेरच्याच जीर्ण वडाच्या जमिनीपर्यंत आलेल्या पारंबीला पकडून कट्टयावर बसल्या. कधी एकदा ते पत्र वाचून काढतेय असं त्यांना झालं होतं.

"प्रिय वसू....
हे माझं दुसऱ्या जगात गेल्यानंतरचं पहिलं पत्र.. तुझ्या मनात काहूर माजलं असेल, कपाळावर आठ्या पडल्या असतील. पण अगं तुला एवढ्या सहजा सहजी सोडेन का मी? आपल्या आयुष्यातील ५० वर्ष इरिटेट केलं तुला आणि मी जगातून गेलो म्हणून तो स्वभाव का सोडू? आणि वसू खरं तर इतक्या वर्षाच्या संसारात मला काही शब्द सुचलेच नाहीत पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मात्र शब्दांनी साथ दिली. तूच टोमणे मारायचीस ना एका लेखिकेचा नवरा इतका शब्द शत्रू कसा? शब्द शत्रू नव्हतो मी, पण तुझ्या शब्दांनीच हृदय भरून जायचं बघ माझं. शेवटच्या महिन्यात मात्र आता आयुष्याच्या क्षितिजावरचा तांबूस असा मावळणारा सूर्य स्पष्ट दिसतोय. मला माहित आहे की मी गेल्यावर तू मात्र ढासळून जाशील. तूच विचारायचीस ना एवढं बरं नसताना ही काय लिहितोस एवढं. मग त्यातलीच ही पत्रं (प्रेम पत्रं) तुला वेळोवेळी मिळत जातील. आणि हो, लगेच नेहमींसारखं डिटेक्टिव्ह होऊन ते कुठून येतात याचा माग घेऊ नकोस. फक्त एवढं समज की पुरुषाच्या मनात भावनेचा बांध घातल्या मुळं काही गोष्टी आयुष्यभर मांडता येत नाही.आयुष्याच्या मावळत्या क्षितिजावर पूर्ण प्रवासाच्या आठवणी, घरट्यात जाणाऱ्या पक्षासारख्या कल्ला करतात. पण पुढची येणारी पहाट अटळ असते. तेव्हाही तीच पाखरं नवीन आठवणी तयार करण्यासाठी घरट्याबाहेर पडतात. आपल्या दोघांच्या ५० वर्षांच्या आठवणी या सर्व पत्रात आहेत.

आता पहिली गोष्ट एक कर म्हणजे माझ्या कप्प्यात एक नवीन डायरी आणि पेन आहे. ते घे आणि तुझी अर्धी राहिलेली कादंबरी पूर्ण कर. Sorry.. तूला आवडत नाही तरी मी ती चोरून वाचली. आपल्या प्रेमाची कथा तुला लिहावीशी वाटली ते खूपच भावलं मनाला. कादंबरी ला नाव मात्र मी सांगेन तेच दे... "प्रेमाची पहाट".

पुढचं पत्र लवकरच मिळेल.

तुझाच दिनकर."

पत्र संपल्यावर मात्र चेहऱ्यावर एक हसू उमटलं आणि त्यांच्याकडून आपसूकच कपाट उघडलं गेलं आणि डायरीवरचं नवऱ्याच्या हस्ताक्षरातील नाव वाचलं, "लेखिका वसुधा रानडे"...

प्रेमाची पहाट आत्ता कुठे सुरू झाली होती.


टीप: कथा वाचल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास जरूर कळवा आणि शेअर करा.

2 comments:

  1. प्रेमाचा शेवट असा दोघातून एखाद्याने निघून जाण्यात नसावा .कुठे तरी मागे पुढे ते प्रेम त्या आठवणीत उरलेलं असतंच ... छान लिहलय 👏

    ReplyDelete
  2. तुमचं मत अगदी बरोबर आहे.. असे कुठलेच प्रेमी दुरावू नये.. दोघातल्या एकाने जाने प्रकृती नियमच आहे.. आणि मागे राहणाऱ्याला ते सहन करावे लागते.. पण आपण एवढ्या सुखद आठवणी तयार करून ठेवायला हव्यात कि आपल्या साथीदाराला ती पुरचुंडी आयुष्यभर पुरेल...

    ReplyDelete