कथा शीर्षक – जड झालेला रुपया
रोज खेळायला येणाऱ्या दत्तूचा अजून काही पत्ता
नव्हता आणि महादेव वाट बघून कंटाळला होता. दोघांना एकमेकांशिवाय अजिबात करमायचं
नाही. खेळायला असो की कुठे जायचं असो,
दोघे सोबत असणं हे ठरलेलंच
होतं. आज महादूने स्वतः बनवलेली टपोरी विटी कधी एकदा दत्तूला दाखवतो असे झाले
होते. उन्ह आता तिरपं झालं आणि काही वेळानंतर दत्तू नाचतच येताना दिसला. आला तसा
सदऱ्याच्या खिशातून एक रुपयाचं चकचकीत नाणं काढून महादेवला उत्साहात दाखवलं.
महादेवने आश्चर्याने त्याबद्दल विचारपूस केल्यावर दत्तू सांगू लागला, की
इकडं येत असताना त्याच्या समोरून एक गोरा साहेब बग्गीतुन चालला होता. त्या
बग्गीतून त्याने पैशाचा बटवा पडताना पाहिला, तसा
लगेच टांगा थांबवायला सांगून त्यानं तो इंग्रजाला परत दिला. गोरा साहेब तर जाम खुष
झालाच आणि वर दत्तूला चक्क एक रुपया बक्षिसी म्हणून दिला. महादेवनं हसून दत्तूच्या
आनंदाला दुजोरा दिला, मात्र आतून त्याला कसंसच वाटत होतं. कारण
महादेवच्या घरी जरी सुबत्ता असली,
तरी त्याचे आबा हातात
पावलीपण टेकवताना दहा प्रश्न विचारत. इथे मात्र त्याचा मित्र आज रुपया मिरवत होता.
विटीदांडूचा डाव सुरू तर केला पण महादेवच्या
डोक्यात मात्र तो रुपया घुमत होता. सूर्य त्याच्या तालाने हळू हळू कौलामागे नाहीसा झाला तसे अंधाराने ते दृष्य हळूहळू
पुसायला सुरुवात केली. आता जास्त वेळ खेळलो तर दत्तूला त्याची माय बदडून काढंल हा
विचार करून दोघांनी डाव थांबवला. दत्तू गडबडीने उड्या मारतच घरी गेला.
रात्र होऊ लागली तसे पौर्णिमेचं शुभ्र चांदणं
पसरू लागलं. अंगणाच्या मधोमध,
पोक्त पारिजातक
तुळशीवृंदावनावर छत्र धरून होता. महादेव उंबऱ्यावर उभा राहून, त्या
पारिजातकाभोवती फिरणाऱ्या काजव्याकडं पाहत स्वतःला हरवून गेला. तेवढ्यात दत्तू
शोधक नजरेनं खाली पाहत येताना दिसला. महादेवला कदाचित हेच अपेक्षित असावं. न
राहवून महादेवने विचारलं.
"काय
रं हुडकतोस? पडलंय का काही?"
"माजा
रुपाया पडलाय. मगाशी आपण खेळत हुतो तवा दाखवला होता ना."
"आरं
इकडे नाही रस्त्याकडं पडला असंल नीट बघ." दत्तू त्याच्याच विचारात होता.
त्यानं नुसतंच मुंडकं हलवलं.
बराच वेळ गेला पण रुपया काही सापडायला तयार
नव्हता आणि दत्तू आता रडकुंडीला आला होता. महादेवला मनातून कितीही आनंद झाला असला
तरी तो चेहऱ्यावर न दाखवता,
लाजंकाजं शोधू लागायचं नाटक
करू लागला.
"म्हादू...
जा आता घरात नायतर तुजी आय कावायची. मी हुडकतो हितं." आता मात्र दत्तूचे डोळे
भरून आले होते. आणि चांदण्या रात्रीत ते आणखी गहिरे दिसत होते.
महादू त्याला खोटा दिलासा देऊन घरात आला. पण
आत येताना त्याचा पाय उचलत नव्हता. सुरुवातीला दत्तूची घालमेल पाहून जो आसुरी आनंद
वाटला होता तो मात्र त्याच्या डोळ्यात पाहिलेल्या अश्रूंनी धुवून काढला.
दत्तू मनगटाने डोळे पुसत शोधकाम करत होता.
तितक्यात जाईच्या झाडाजवळ काहीतरी चमकल्यासारखं दिसलं म्हणून सरसर पावलं उचलत
निघाला. पण पारिजातकाच्या आडाला बसलेल्या कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडला आणि कुत्र्याने
त्याचा पाय कचकचून पकडला. कुत्र्याचे दात खोलवर रुतले होते, तशातच
त्याने उडी मारून पाय सोडवायचा प्रयत्न केला आणि पुढे बांधकामासाठी ठेवलेल्या
दगडांवर जाऊन आदळला. हनुवटी एका मोठ्या दगडावर आपटली. असह्य कळीने त्यानं एक
जोरदार आरोळी ठोकली. चांदण्यातल्या किर्र रात्री अशी आर्त आरोळी ऐकून महादेवाच्या
घरातले सगळे पळतच बाहेर आले. पाहतात तर दत्तू बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात
पडला होता. चेहरा रक्ताने माखला होता. सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. पटकन
दत्तूच्या मायला कुणीतरी बोलावलं. ते दृष्य पाहून तर तीची दातखिळीच बसली. बैलगाडीतून
दत्तूला गावातल्या गोऱ्या सायबाच्या दवाखान्यात नेऊ लागले, पण
जाताना कुणीतरी म्हटलं,
"लय मार लागलाया. देव करो अन
पोरगं हाताला घावुदे रे बाबा."
ते वाक्य ऐकताच महादूच्या अंगात त्राणच राहिला
नाही. अंगणात आता तो एकटाच होता. मघापासून हातात दाबून ठेवलेला रुपया बाहेर काढला
आणि त्याकडं पाहून ढसाढसा रडायला लागला. खेळताना दत्तूच्या खिशातून पडलेला रुपया
त्यानं मोठ्या हिकमतीने लपवला होता. पण आता मनात आलेला विजयाचा आवेश आता गळून
पडला. स्वतःची अतीव घृणा वाटू लागली. हातातला रुपया आता कैक पटीनं जड वाटत होता. रागानं
तो रुपया अंधारात भिरकावला आणि तिथल्या एका भगदाडात कायमस्वरूपी गाडला गेला. मात्र
हृदयाच्या आतल्या कोपऱ्यात ती सल खोलवर कोरली गेली होती.
******************************************
आज चिल्लरपार्टी आंब्याचं झाड लावायचं म्हणून
अंगणातली माती उकरत होते. त्या सगळ्यांत शिरीष थोरला होता. तेवढ्यात 'तात्या' म्हणजे
त्यांचे पणजोबा घरातील पूजा आटोपून घरापाठीमागच्या विठ्ठल मंदिरात जाऊ लागले. मुलांकडे
नजर टाकली आणि मंदिरात निघून गेले. मुलांना नेहमी वाटायचं की आपले तात्या कधीच
मनमोकळं हसत का नाहीत. पण तात्या पहिल्यापासूनच असे होते.
तेवढ्यात मुलांना तात्यांचा मित्र तिकडे
येताना दिसला. खरं तर त्या बाबांना बोलता यायचं नाही, पण
सुंदरश्या हास्यातून संवादाची उणीव भरून काढायचे. त्यांनी अंगणात पाऊल ठेवलं तसे
मुलं गलका करून त्यांच्या भोवती जमा झाली. त्यांनी आपल्या खिशातून आणलेली चॉकलेट्स
पोरांना वाटून टाकली आणि राहिलेलं एक चॉकलेट स्वतः मटकन खाऊन टाकलं. 'हुप्प' असा
अभिनय करून त्यांचा तुसडा पणजोबा कुठेय हे विचारलं. मुलांनी विठ्ठल मंदीराकडे बोट
केलं.
विठ्ठलाच्या पायरीशी येताच तात्या आपल्या
मित्राला हात द्यायला पुढं आले. त्याच्याकडं पाहून तात्या नेहमीप्रमाणे म्हणाले,
"अजून
काही तुझं लहान मुलासारखं खाण्याचं वेड गेलं नाही बघ." तो नुसतंच हसला.
खरे तर त्या दोघांना कधी संवाद साधायला
शब्दांची गरज पडायची नाही. अगदी एकमेकांच्या मनातलं कळण्याइतपत त्यांच्या मैत्रीचा
धागा घट्ट विणला होता.
तेवढ्यात शिरीष तात्यांना हाक मारत पळत येताना
दिसला. तात्यांना काळजी वाटून ते पायरीपर्यंत आले. तर त्याने खिशातून एक नाणं
काढून त्यांच्या हातावर टेकवलं.
"तात्या..
हे पहा आम्हाला खड्डा खोदताना नाणं सापडलं. बघा ना किती जुनं आहे."
तात्यांनी त्या नाण्याकडं पाहिलं आणि विचारात
बुडाले. नजर न हटवताच म्हणाले,
"हो
रे... मी साफ करून पाहीन किती जुनं आहे
ते.. जा तू झाड लावायला."
शिरीष तसाच पळत निघून गेला. पण इथे आता
तात्यांची नजर त्या नाण्यावरून हटत नव्हती. मनात अगदी कोलाहल माजला. वनराई मध्ये
गर्द धुकं दाटून यावं आणि आपल्या हातावरच्या अंतरावरचंही स्पष्ट दिसू नये तशी
त्यांची मनोवस्था होती. हळूहळू त्यांच्यापुढं उभी होती एक चांदणी रात्र, मोठं
अंगण, दोन मित्र आणि 'रुपया'.
त्यांच्या सुरूकतलेल्या डोळ्यांच्या कडा
पाणावल्या. मागे वळून आपल्या जिवा भावाच्या मित्राकडे पाहिलं आणि दाबून धरलेला
आवंढा अश्रूरूपे बाहेर आला. त्यांच्या मित्राला कळत नव्हते की कधीच कुठलीही भावना
चेहऱ्यावर न दाखवणारा हा तात्या आज चक्क धाय मोकलून रडत होता. तात्यांनी जवळ येऊन
तो रुपया त्याच्या हातात ठेवला आणि पायाशी बसले.
"दत्तू.....
दत्तू...हा तुझा रुपया.. मी चुकलो रे... मी चुकलो... एवढ्या वर्ष नाही रे बोलू
शकलो पण मला माफ करशील का ....?? लहानपणीच्या
त्या एका क्षणाच्या मत्सराने मी आयुष्यभर जगूनपण मरत होतो रे........"
आपल्या मित्राचा पश्चाताप आणि आक्रोश पाहून
दत्तूचेही मन हेलावून गेले. डोळ्यात पाणी आणि ओठांवर करडे हसू होते.. लहानपणी त्या
अपघातात जिभच गेल्याने,
ईच्छा असूनपण आपल्या
मित्राला "माफ केलं रे म्हादू.." असं बोलू शकत नव्हता. ते दोन्ही जीव आज
अश्रूंनी आपली सत्तर वर्षांची मैत्री आठवत होते. आणि त्या हातातल्या रुपयाचं ओझं
सुद्धा पश्चातापात विरून गेलं होतं.
*********************************** समाप्त
*********************************
लेखक – विशाल पोतदार
पत्ता
– मु पो – वाठार, तालुका-
कराड, जिल्हा – सातारा
मोबाईल
क्रमांक – 9730496245
इमेल
ID – vishal6245@gmail.com
No comments:
Post a Comment