काळाकुट्ट रस्ता इतका तापलाय की डांबरबी आता पाघळून जाईल. पाच दिवस झालं हायवे तुडवत चाल्लूय. पुलिसांच्या भ्यानं कुटलंच व्हान थांबना. रस्ता मागं सरतूय तसं माज गाव जवळ येतंय. हायवेला झाड किंवा एखाद्या दुकानाची सावली घावती विरंगुळ्याला. पण दोन-तीन तास झालं एकादं झाडबी दिसलं नाय. छकुली माझ्या खांद्याव दोन्ही बाजूला पाय टाकून आणि गळ्याभोवती मुटकुळा मारून गपगार बसती. हू का चू नाय.
"छकुले.... डोक्यावचा टावेल काडू नको.. ऊन लय लागतंय.. आता मिळल बग पुढं जेवाया."
सकाळपासून भूक लागली आसल माज्या छकुलीला. तिला इचारल्यावर 'नाय लागली भूक' आसंच म्हणती. बारक्या पोरास्नी भूक लागलीली कळत नाय म्हणत्यात. छकुलीलाबी कळत नसल की 'कळती' झाल्यागत भूक लागलेली दावत नसल. मुंबईत आसताना गोळ्या बिस्किटासाठी मागं लागणारी छकुली आता एवडी समजदार झाली. पर बापालाबी पोरीचा चेहरा वाचता येतूया. काल राती पेट्रोल पंपाभाईर, कुणीतरी दिलेलं केळ खाउन झूपली व्हती . मग आता पोटात कावळं हैदोस घालत नसतील काय? आपलं काय, कामाच्या जोमात भूक मारायची सवय आदीपासूनच हाय. पण तिनं हे सोसायला नगो.
फकस्त घर डोळ्याफुडं ठिउन चालतुय. लोक आमाला यडे म्हनत आसतील. पण आमाला दुसरा काय पर्याय व्हता. शहरात आमी रोज दोन येळच्या जेवणाइतकं कमावतो. जितं गर्दीमधी श्वासपण उसना घ्यावा लागतुय तिथं पैसा साठवायला कुटनं मिळणार. आन काम बंद तर खायाचं तरी काय. त्यात छकुलीची आय दोन दिसासाठी म्हणून गावी गेली असता तिथंच आडकून बसली. इकडं तिकडं जानं बंद. चारी बाजूनी त्या रोगानं थैमान घातलेलं. पोरीची आबाळ नगो म्हणून आसा निगालो बगा. आपल्या पोरीला तिच्या आईशीजवळ पोचवल्याव बरं वाटल. म्हणून ही पायपीट. शेकडो मैल.
आता थोडं फूडं गेल्याव कायतरी मिळल असं म्हणत म्हणत सूर्य डोक्याव आला. त्यवढ्यात एक निवारा दिसला. तात्पुरता मंडप घातलेला. ती सावली दिसल्याव पळतच पोचलो. ती देवमाणसं पाणी देऊन जेवणबी वाडत हूती. पत्रावळी फुडं आली आणि माझी छकुली इतकी गोड हासली म्हणून तुमाला सांगू. माझी भूक तिथंच भागली.
चार दिसात फकस्त केळी, काकड्या, वडापाव आसं कायतरी मिळायचं. पण आज भात, वांग्याची आमटी, भाकर. तेही पत्रावळी भरून. वांगं तिला लय आवडतं. मी तिच्याकडं पत्रावळी सारली आणि खा म्हणलं. छकुलीनं पयला घास उचलला आन माझ्या तोंडाकडं आणला. बापाच्या डोळ्यातनं पाणी कसं काढावं हे माझ्या शान्या लेकराला ठाऊक. माजं कोकरू ते. ह्यो प्रवास तिला लय काय शिकवल. देवा फकस्त तुजा हात असू देरं डोसक्यावर, मग काय आसच हासत हासत पोचू बगा गावाला.
© विशाल पोतदार (मोबाईल- 9730496245)
फोटो स्रोत -अज्ञात
आजची अतिशय विदारक स्थिती आणि त्यात होरपळणारा मजुरांचे आत्मकथन ...निःशब्द करणारे लेखन ....👌
ReplyDeleteखूप आभार👍
Deleteखुप विदारक परिस्थिती मांडली . मजुराना खुप भोगाव लागतय . अशा कितीतरी छकुली सद्य स्थितीत उपाशापोटी जगत असतील .
ReplyDeleteKhup sundar chitra kelay mulagi ani vadil ya baryach dolyat pani aal
ReplyDelete