.post img {

Automatic Size

Thursday 21 May 2020

#WorldCinema Postmen in the Mountains (1999)

चित्रपट- Postmen in The Mountains (1999)
दिग्दर्शक- Huo Jianqi
कथा - Jianming Peng
कलाकार- Liu Ye, Teng Rujun
भाषा- मँड्रीन

********************************************


सध्या हिंदी, इंग्रजी आणि मराठी या पलीकडे जाऊन जगातल्या वेगवेगळ्या भाषेतले सिनेमे पाहण्याची खटपट चालू आहे.

त्यातच 'Postmen in Mountains (1999)' हा Mandrin (चीनमधील) भाषेतला चित्रपट पाहण्यात आला. 

आयुष्यभर रोज चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर कापत आपलं काम प्रामाणिकपणे करणारा पोस्टमन गुडघेदुखीमुळे रिटायर होतो. त्याच्यानंतर तो जॉब करण्यासाठी त्याचा मुलगा तयार होतो. खरं तर त्या मुलाला, ह्या जॉबला हाताशी धरून पुढे पोस्ट ऑफिसर व्हायची इच्छा असते. पहिल्याच दिवशी मेल रूट दाखवण्यासाठी नेहमी सोबत असणारा कुत्रा 'राऊल'ला मुलासोबत पाठवण्याचा त्याचा मानस असतो. पण कुत्रा काही आपल्या धन्याला सोडून, मुलासोबत जायला तयार होत नाही. मग त्याला स्वतःच मुलाला पूर्ण 160 km चा मार्ग दाखवण्यास निघावं लागतं. मग त्यांच्यासोबत राऊल ही दौडत निघतो. इथूनच सुरू होतो या चित्रपटाचा सुंदर प्रवास.



खरे तर उभ्या आयुष्यात कुटुंबाला अगदी नगण्य वेळ देऊ शकलेल्या त्या बापाला मुलासोबत वेळ व्यतीत करण्याचा मौका मिळालेला असतो. पण इतक्या वर्षात त्यांच्यामध्ये आपसूकच आलेल्या दुराव्यामुळे, संवाद काय साधावा हा प्राथमिक प्रश्न दोघांपुढे उभा असतो. पण जसा जसा तो डोंगरातील मार्ग सरकू लागतो तसे त्यांच्यात संवाद घडू लागतो. कामाच्या पलीकडे जाऊन, आपल्या वडिलांनी इतक्या वर्षात डोंगरातल्या लोकांसोबत किती हळुवार नाती जपून ठेवली आहेत ते मुलाला कळू लागते. आणि बाप मुलाच्या नात्याची नव्याने उकल होत राहते. 

चित्रपटात ट्विस्ट, कॉमेडी, ड्रामा नाही. अगदी मोजकेच प्रसंग, आणि तेही संथ लयीत येणारे. दोन पिढीतील विचारांचे अंतर,  दोघात होणाऱ्या छोट्याशा वादातून दिसतात. इतकी वर्षे कुटुंबापासून दूर राहून प्रामाणिकपणे  काम करूनसुद्धा पोस्टाकडून न मिळालेल्या कौतुकाची जाणीव तो मुलगा जेव्हा करून देतो तेव्हा तो बाप व्यथित होतो. पण लोकांचं कमावलेलं प्रेम त्याच्यासाठी मोठं असतं. 

दोघांचा अभिनय अगदी नैसर्गिक. वडिलांचं काम करणारे Teng Rujun यांचं निखळ हास्य आणि प्रत्येक गावात आपल्या मुलाची ओळख करून देताना त्या हसऱ्या चेहऱ्यात असलेला अभिमान सुखावून जातो. मुलाच्या आईचे प्रसंग मोजकेच असले तरी त्या कथेत भावनेचा अजून एक कोपरा दाखवतात. चवीपुरत्या मिठासारखे.



चीनच्या हुनान भागातील डोंगरदऱ्या, हिरवीगार शेती त्या भावनिक प्रवासाला अजून ओलावा देते. अगदी साधी काळवंडलेली घरं त्यांच्या गरिबीची साक्ष देतात. 

त्यातील दोन प्रसंग मनात अगदी घर करून बसले. एकट्या राहणाऱ्या वृद्ध स्त्रीला तिचा नातू शहरातून फक्त पैसे पाठवत असतो पण तिला हवे असतात ते मायेचे शब्द. मग हा पोस्टमन इतकी वर्षे तिला पैश्याच्या पाकिटासोबत पत्रदेखील आहे असे खोटेच सांगून तिला ते नसलेले पत्र वाचून दाखवत. आणि पुढेही मुलाला ते सुरू ठेवायला सांगतो. आपल्या कामच्याही दोन पावलं पुढे जाऊन माणुसकी जपण्याचा हा प्रसंग. दुसऱ्या प्रसंगात, इतकी वर्षे घर आणि गावापासून नेहमी दूर असणाऱ्या आपल्या वडिलांना तो मुलगा गावात कुणाशी कसे वागावे, तसेच कोण कसे आहे हे समजावून सांगतो. त्यावरुन वडिलांच्या नकळत मोठा झालेला मुलगा दिसून येतो. आणि आता दोघांचाही आयुष्यातला रोल बदलणार असतो. अजून असे खूप सुंदर प्रसंग या कथेत पेरले आहेत.

थोड्याबहुत फरकाने घरोघरी हेच घडत असतं. कामाच्या धावपळीत आपल्याला पत्नी, मुलं यांच्याकडं नीटसे लक्षही देता येत नाही. पण वेळ सेकंद, मिनिट, दिवस आणि वर्षात कधी सरकून जातो कळतही नाही.
सर्वांनी जरूर पहावा असा चित्रपट.


No comments:

Post a Comment